निरंजन माधव - यतिनृपतिसंवाद
निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.
राया तूं विभवें विराजसि अह्मीं विद्यामहावैभवें ।
आहों पुष्ट, तुह्मासि सेविति सदां अर्थी महा गौरवें ॥
विद्यार्थीजन सेविताति अमुतें, कक्षीण आशा तुला ।
आह्मी निस्पृह योगयुक्त अमुची येना नृपाळां तुळा ॥१॥
आम्हीं तुष्ट सुवल्कलें नृप तुम्हीं शालादुकूलें धरा ।
आम्ही वन्यफळीं भरुं उदर हें, तुम्हीं सदन्नें हरा ॥
संतोषें निशिवार वर्तत अम्हीं, तृष्णा नृपा वाढते ।
आम्हीं वैभववंत, राजकुळिचें दारिद्र्य ते भोगिते ॥२॥
तुम्ही सेजपलंग त्यावरि करा निद्रा महा आवडीं ।
आम्ही शीतळ शाब्दलीं सुपुलिनी कीं देउळीं चावडी ॥
उत्तुंगी शयनीं तुम्हासि अरिच्या भेणें सुनिद्रा नये ।
आम्ही स्वाप धरातळीं करितसों सानंदलों निर्भयें ॥३॥
बाला त्या अमरीसमान तुमचे पादाब्ज संहानिती ।
आम्हा शांतिविरक्तिमुक्ति वनिता या सर्वदां अर्चिती ॥
तुम्हीं तों विषयीं मदांध, मद तो जाळोनि आम्ही असों ।
देशीं एक निवास भूपति तुम्हां, सर्वत्र आम्हीं असों ॥४॥
तुम्हां चामर वीजिताति वनिता मंदे सुगंधानिळें ।
आम्हीं चामरवंत, त्या वरुषती वल्लीच लाजाफुलें ॥
तुम्हां नागरिणी सतोष तरुणी लाजा शिरीं वर्षती ।
आह्मां शाश्वत संपदा नृपतिच्या संक्षीण त्या दीसती ॥५॥
गाती भाट यशें क्षितीश तुमचीं घेवोनियां वेतनें ।
गाती सज्जनवृंद तोषविशदें आम्हासि ते सन्मनें ।
आहे दूर तुम्हांसि ईश्वर, सदां राहे अम्हांसन्निधीं ।
देखों सर्व जगीं, मदांध तुमच्या दृष्टी पडेना कधीं ॥६॥
माया मोह मदाभिमान ममताहंता दुराशा बळी ॥
कामक्रोध असंख्य लोभ भय त्या दैन्यादिकांची फळी ।
तुम्हां पीडितसे निरंतर, अम्ही निर्मुक्त आहों यती ।
आम्हां किंकरसाम्य सर्व दिसती हें निश्चयें भूपती ॥७॥
ज्यात्यश्वायुत सद्रथी वळघतां तुम्ही अम्ही जाण कीं ।
पंचप्राण मनाश्च योजुनि बसों कायारथीं कौतुकीं ।
मोठे दिग्गजसे करींद्र तुमच्या द्वारीं मदी तिष्ठती ॥
आम्ही स्वानुभवाख्य मत्त करिच्या पृष्टीं बसों भूपती ॥८॥
सेना हे तुमची सुदृप्त निवटूं जाणे अरीचीं दळें ।
आम्हीं इंद्रियसैन्य जिंतुनि असो ते कालमृत्यू बळें ॥
तुम्हां ते करदान नित्य करिती सामंत राजे भयें ।
आम्हां ते तरुराज अर्पिति फळें शाखाकरें निर्भयें ॥९॥
श्वेत छत्र तुम्हांशिरीं विलसतें मुक्तास्त्रजें शोभलें ।
आम्हीं अद्वयबोध छत्र मिरऊं सन्मुक्त माळाकुलें ।
आम्हीं चिन्मयवर्मवेष्टित असों, या अश्मसारें तुम्हीं ।
वर्मातें धरितां प्रशक्ति धरितों माया जयाची अम्ही ॥१०॥
आम्हां अक्षय बाण तूण विलसे वेदांतवाक्यें बरा
ओंकाराख्य शरासनें करितसों संहार भेदांकुरां ।
लक्षीं लक्षितसों चिदात्मपदवी, इंद्रादिकांच्या पदा
आम्हीं तों न गणूं, सदाभिलषिती ते आमुची संपदा ॥११॥
हातीं तत्वमसी असी धरुनियां छेदूं भवाचीं शिरें
आतां काय आम्हांपुढें प्रबळ तो अज्ञान शत्रू उरे ।
भेरीसज्जयघोषयुक्त जगती एकारवें दाटली
आतां पूर्णसुखानुभूति कमला सर्वत्र कोंदाटली ॥१२॥
जे तापें त्रिविधें सदा डहुळते भेदें सदां वर्तते
माया मोह मदें प्रलोभ कपटें संपूर्ण आंदोळते ।
जे एकाचि पळांत नाश वरिते निर्नाम ते पावते
ऐशी कुच्छित हे क्षितीशपदवी ते निच्छिती जाणते ॥१३॥
आशा ज्यासि मनीं विशाल, म्हणिजे त्यातें दरिद्री जनीं
ऐंद्री संपति हीं असोनि सदनी तृष्णा प्ररुढे मनीं ।
जो संतुष्ट नसोनि एक कवडी त्याला धनी बोलिजे
आधिव्याधि तया न बाधिति कदां निश्चिंत सौख्या भजे ॥१४॥
आम्हा सिंधु चुलोदकासम गमे, खद्योत वाटे रवी ।
मेरु ढेकुळसाम्य कल्पविटपी तो काष्ट मानू जिवीं ।
चिंतारत्नमनी खड्यासम गणूं राजा गणूं भृत्यसा
देहा भार म्हणूं यतीश्वर अम्हां तृष्णा नये मानसा ॥१५॥
तो पृथ्वीपति सार्वभौम म्हणिजे देवेंद्रही तो गणा
तो वित्तेश्वर संपदापति तरी याच्या पुढें ठेंगणा ।
ज्याला तोष अखंड पूर्ण विलसे शांतीस जो पावला
त्याची साच नये कदां हरिहरब्रह्मेंद्रदेवा तुला ॥१६॥
जो संतुष्ट तयासि देव पुजिती सिद्धी तया पावती
द्वारीं लोळति नौनिधी सकळही ऋद्धी तया वंदिती ।
ना पाहे तिकडे अलिप्त मनसें निश्चिंत तो सर्वदा
संन्यासी परि तुष्ट त्यासि म्हणिजे नेच्छिच कांही कदा ॥१७॥
झालीं फारचि गोधनें बहुधनें धान्यें द्वारीं करीचीं गणें
हा रत्नाकर सुप्रसन्न घडला दे रत्नरासी जरी ।
या संतोषधनापुढें सकळ तें भूपाळ धूळीपरी ॥१८॥
आहे कीं उदयाचळावधि पुन्हां अस्ताद्रिपर्यंत तें
मोठें राज्य करीं करी सकळ हीं स्वछंद साम्राज्य तें ।
जें कोट्यर्बुद पद्मसंख्य विलसे भांडार गांठी जरी
आहे मृत्यु यथार्थ काय करिजे हे सर्व राया तरी ॥१९॥
यासाठी अभिमान टाकुनि धनीं आशा करोनी दुरी ।
हो निश्चिंत तदां नृपाळ घडतां नैराश्य तें अंतरीं
संतोषें अति शोभसील सुजनीं वैदेहभूपापरी ।
जीवन्मुक्ति वरील जाण तुजला निर्बाध ते सुंदरी ॥२०॥
नैराश्यासम दूसरें सुख नसे साम्राज्य ऐसें नसे
नैराश्या सम वस्तु आणिक नसे माहात्म्य ऐसें असे ।
सर्वांमाजि नरासि उन्नत पदा नैराश्यता देतसे ॥२१॥
इति निरंजनमाधवयोगीविरचित यतिनृपति संवाद:
N/A
References : N/A
Last Updated : February 28, 2018
TOP