विश्वाचे चक्र सारें धरुनि निजकरीं चालवी गुप्तरुप ।
माया ज्याची अगाधा जगतिवरति दे अज्ञ लोकां हुरुप ॥
पृथ्वीसूर्याग्निरुपें प्रकट दिसवि जो स्वकृती हे निसर्गी ।
देवो तत्शक्ति लोकां अभिनव सुख तें सर्वदा मोक्षमार्गी.

अग, ए वैजयंती ! वैजयंती ! काय बाई कोठें ओदेखील देत नाहीं. इच्यबरोबर येणें हाच माझा आधीं मूर्खपणा. काय, किती वेळ मी इच्या शोधांत राहूं ? नाहीं. गेलीच वाटतें स्वर्गावर. अग ए वैजयंती ! देवी ! आलें ग आलें. (स्वगत) अलंबुषा देवीच ! काय हा उतावळा स्वभाव ! जरा म्हणून विसावाच देत नाहीं. ए वैजयंती ! कोठून तरी आलें म्हणते, डोळ्यांस तर दिसत नाहीं. वैजयंती मोठी चंचल बाई. देवी ! आलें ग आलें (स्वगत) उगीच नाहींत म्हणत दुसर्‍याच्या ताब्यांत कधींच राहूं नये म्हणून. खरंच तें.

दिंडी

नरकवासाहुनि पारतंत्र्य खोटें ।
सत्य वदती ते बुद्धिमान मोठे ॥
सोडुनीयां स्वातंत्र्य वसति लोका ।
मृताहुनि ते मृत बोलती विवेकी ॥१॥

आम्ही तर स्वर्गीच्या देवांगना; म्हणजे पूर्ण स्वातंत्र्याची कामना; या अलंबुषा देवीची वंचना कोण घेईल ? आतां ही वैजयंती आहे तरी कुठें ? ए वैजयंती ! कोठून तरी आलें म्हणते, वायुमंडळांतून का मेघमंडळांतून ? ए .....
(स्वगत) ही अलंबुषा मला समजते तरी कोण ? देवेंद्राच्या विनवणीनें मी इच्याबरोबर आलें तें कां ? मी माझें स्वातंत्र्य विवाहहोमांत का भस्म करुन आले ? आमच्या अप्सरस शांतींत स्वातंत्र्याग्नि तर नि:शंक पेट घेत असतो, हें नाही का इला ठाऊक ? वैजयंती ! कुठं ग होतीस इतका वेळ ? मी तुला किती ग शोधलें !

हें सरस्वतीचें वाळवंट सारें हिंडून फिरुन थकले. बरं जरा ये बैस. उगीच इकडेतिकडे फिरुन हैराण होऊं नकोस. हा मृत्युलोक आहे. अलंबुषा देवी ! तुला सांगितलें होतें ना, आर्यावर्ताच्या चित्रपटास जरा रंग भरावयाचा आहे; तो सारखा करतें आणि येतें म्हणून. इतक्यांत किती ग फिरलीस ? हा मृत्युलोक झाला म्हणून आम्हांस काय मृत्युचें भय आहे ? बरं, झाला का पट तयार ? पाहूं या तरी आपलें कौशल्य. हा पहा आर्यावर्ताचा चित्रपट; रंग जरा ओला आहे हं. वैजयंती, खरीच चित्रलेखा ! बरं, सांग पाहू, काय काय तें. बरं तर; आधीं उत्तर दिशेकडूनच येऊं. या आर्यावर्तात, नव्हे सार्‍या पृथ्वींत अति उंच म्हणतात तो हा हिमालय पर्वत. हाच ग हिमाचल ? पार्वतीदेवीचा जनक. फार नामी रेखलास. महादेव शंकराने येथेंच ना तपश्वर्या केली ? स्थल तर उत्तमच शोधले. विकट कानन म्हणतात तें हेंच ना ? हो, इथंच आपल्या मदनाची आहुती पडली. छे ! वैजयंती ! भलतेंच काय बोलतेस ? आम्हां स्त्रियांचा पंचप्राण तो पंचप्राण, त्याच्या विपरीत बोलणें हें आम्हांला कसें शोभेल ?
अलंबुषादेवी ! बोलणें वाईट आणि करणें चांगले. देवेद्राच्या वसंतोत्सवांत, पार्वतीपरिणय नाटकांत, शंकराची भूमिका तूंच ना सजविली होतीस आणि मला मदनवेशांत तूच ना भस्म केलेंस ? ते तुझे शंकरस्वरुपाचे डोळे आठवून आतांदेखील भय वाटत आहे; त्या भव्य जटा, आणि ते खदिरांगासारखे डोळे पाहून शचीदेवीदेखील निऊन उठल्या. पण, वैजयंती ! त्या नाटकांतील हिमालयाचा देखावा इतका साधला नाहीं. अग, तो कल्पनेनें काढला होता, आणि हा प्रत्यक्ष पाहून काढला. प्रत्यक्षांत आणि तर्कात भारीच अंतर असतें. पण देवी ! मी एक विचारते; मदनराजाला शंकरानें कशाकरतां ग भस्म केलें ? त्यानें असें कोणते पातक केलें होतें ? शंकरपार्वतीचा संसार थाटण्यास गेला आणि आपला संहार करुन घेतला. पण, वैजयंती ! यांत गौरीहराचे लग्न झालें कीं नाहीं ? देवी ! त्यांचे लग्न झालें, पण रतीबाईच्या सौभाग्यांत मात्र विघ्न आलें. मोठ्यांच्या मध्यस्थींत छोट्यांनीं पडूं नये म्हणतात ते खोटें नाहीं. वैजयंती ! त्या दैविक गोष्टी आहेत; देवांच्या कार्याकरतां त्याच्या भक्तांनीं प्राण खर्ची घालावे लागतात. होय ग देवी ! देवांच्या कार्यार्थ मदनाचें दहन आणि दैत्य करतात रतीचें संगोपन. अग, अदितिदेवीला तरी रतीबाईची यादस्ती यावयास पाहिजे होती कीं नाहीं ? असूं दे ग त्या गत गोष्टी. सांग पाहूं. ही कसली ग पर्वताची ओळ ? देवी ! हेच ते हिमालयाचे भाग.

साकी

कांचनगंगा गौरीशंकर धवलगिरी हा पाहें ।
नंदादेवी नंगा पर्वत गगना चुंबित राहे ॥
तरुवर हे भारी । अडविति सूर्याची स्वारी ॥१॥
भूमीभागावरती आहे उंच अर्ध योजन हा ।
सैरावैरा कसा धांवतो सरितागण हा पाहा ॥
आर्यावर्ताला । रक्षक गिरिवर हा पहिला ॥२॥

शाबास. मोठी बाई वैजयंती. हिमालय पर्वताची उंची देखील मोजलीस, आणि हें पुढें ---
हें पहा, देवी ।

आर्या

मानस सरोवराच्या पुलिनीं हे राजहंस कीं फिरते ।
कैलास पर्वताची छाया याच्यावरी सदा पडते ॥१॥
पाहें ही गंगोत्री, हा पाहें बदरिनाथ कैलास ।
यमुनाहि शोणभद्रा जेथें शंकर करी सुखें वास ॥२॥

बरी बाई, वैजयंती, तुझी चित्रकला. स्वर्गात गेल्यावर, देवादिकांना हा चित्रपट पाहून दुसरा विषयच रुचणार नाही. इतकेंच नाहीं, देवी ! याला तेथें विद्युत्प्रकाश दिला पाहिजे. तेंहि करणार, वैजयंती ! मग देवादिकांना आमचा विसरच पडणार. बरं, पुढचें पाहूं. हें पहा -

साकी

गोदावरि ही पाहें कृष्णा कावेरी शरयू ती ।
महा नर्मदा तापी पाहें पंच नदी जलयुती ॥१॥
सिंधु नदी ही कशी वाहते ब्रह्मसुता अघनाशी ।
तीर्थराज हा प्रयाग पाहें, गया, मोक्षदा काशी ॥२॥

वैजयंती ! ह्या पांढर्‍या आणि काळ्या जलाच्या नद्या कोणत्या ? देवी ! श्वेतवर्णाची भागीरथी आणि श्यामवर्णाची यमुना, यांचा हा संगम, आणि तेथेंच हा तीर्थराज प्रयाग. वैजयंती ! खरंच सांग, हे लहानसे पर्वत ग कोणते, आणि त्यामधून वाहणारी ही सुंदर नदी कोणती ? देवी ! मानस सरोवराजवळ असलेले हे नारायण पर्वत आणि वसु पर्वत, आणि त्यांमधून झुळुझुळ वाहणारी ही आपली सरस्वती नदी. ही पहा इथं अलकनंदेस आनंदाने आलिंगन देत आहे. आणखी पहा. त्याजवळ ही मनोहर गणेशगुंफा आणि त्यांत पूजलेली गणपतीची मूर्ति. शाबास, वैजयंती. गणपतीची मूर्ति भारीच सुरेख रेखलीस, पार्वती देवी जर पाहील तर चुंबनच घेईल ... आणि सांग, वैजयंती ! हा येथें सोनेरी रंग काय म्हणून दिलास ? देवी ! हें आपण तर्कानेंच ताडल्यास खरें. हं. येथें सोन्याच्या खाणी असतील, हेंच ना ? सांग तर, याला काय म्हणतात ? हें पहा -

गीत

मलयगिरी हा वसतो जेथें । कावेरी नदी वाहत तेथें ॥
महिषासुर-पुर भूभागातें । सुवर्णखनि असती ॥१॥

वैजयंती ! आणि इकडे असलेले हे हिमालयासारखें पर्वत ग कोणते ? देवी ! हे पहा -

साकी

विंध्य आणि सह्याचल मोठे गिरिवर सुंदर जगतीं ।
तापनाशिनी तापी जेथें, करी नर्मदा वसती ॥
सिंधुस आलिंगन द्याया । जाती सर्पाकृति बाया ॥१॥

वैजयंती ! यापुढें कुसुंबी रंगानें रेखलेलें हें ग काय ? देवी ! सह्याद्रीच्याखाली वसलेलें, हें आपले गोमंतक. याला रंग देण्यास मला बराच वेळ लागला. हें गोमंतक ? पण वैजयंती ! आपलें म्हणजे ग कसें ? देवीं ! समुद्राच्या उदरांतील भूमि म्हणून हीस रत्नाकरात्मजा असें म्हणतात. आम्हीहि अप्सरा समुद्रोद्भवाच; मग ही आपली बहीणच झाली तर; वैजयंती ! सांग तर येथला भाग. देवी ! पहा -

पद (चाल - उरला भेद न ज्या०)

गिरिवर चंद्रनाथ पाहें । गौरीशंकर जिथ राहे ॥
गोमांचल हा स्थिर झाला । मांडवी स्नान देत त्याला ॥
संगम नदिची रमणियता । वर्णिती अघनाशनिचरिता ॥
कुशावतीची सरि नच कवणा । स्वच्छजला वाहे ।
ऋषिवन सन्निध ज्या आहे ॥१॥

बरं पुढें ... देवी ! ओझरतेंच काय पाहतेस ? हा पहा सह्याद्रीच्या पायथ्याशीं दूधसागरचा धबधबा, जणूं काय शंकराच्या जटेंतून भागीरथीचाच ओघ. भली बाई, वैजयंती. खूप शर्थ केलीस ! दूधसागरच्या जलावर संध्यारागाची लकेरीसुद्धा दाखवलीस. आपलेपणा असल्यावर असेंच घडतें. देवी ! आपलेपणाचे म्हणून नाहीं. सार्‍या आर्यावर्तात इतकें सुंदर आणि रमणीय स्थल मला दिसलेंच नाहीं. उगीच नाहीं वेदांत वर्णन केलें आहे तें. काय ! गोमन्तकाचें वर्णन वेदांत ? अग, स्त्रियांनीं वेद ऐकू नयेत. हो ! बृहस्पतीच्या शिष्यांकडून त्या ऋचा मी अगदी तोंडपाठ करुन ठेवल्या आहेत. ह्या पहा -

"आनो गोमन्तम्‍ अश्विना सुवीरं सुरथं रयिम्‍ ।
                    (ऋ.मं. ८, ५-१०.)
"सहिष्मा जरितृभ्य आवाजं गोमन्तम्‍ इन्वति ।
                    (ऋ. मं. ९, २-२.)

वैजयंती ! या ऋचांचा अर्थ काय असेल कोणास ठाऊक. वेदांचा अर्थ व्यास ऋषींसदेखील कळला नाहीं असें म्हणतात. अग, पण आपल्या त्या व्यास ऋषींनीदेखील, गोमन्तक हें भारीच रुपवान्‍ म्हणून वर्णन केले आहे. हें पहा -

"गोमन्ता मंदका: संडा विदर्भा रुपवाहिका: " - महाभारत.

वैजयंती ! भली बाई तुझी पाठशक्ति ! देवी ! पण तूं काय म्हणालीस ? स्त्रियांनी वेद श्रवण करुं नयेत ? कां ? वेदांतदेखील भेद ? वेद मात्र स्त्रियांचे स्तवन करतात. स्त्रियांना रत्नाची उपमा देतात, त्यांस कवि रत्न म्हणतात. वैजयंती ! कोणत्या ग स्त्रियांचे वेदांत स्तवन आहे ? स्त्रियांना यंत्राची मात्र रचना शोभणार आहे. स्त्रीरत्नें ! देवी ! सारा ऋग्वेद, अदितिदेवी, उषादेवी, पृथ्वीदेवी यांच्याच स्तवनानें भरुन गेला आहे. हं, वैजयंती ! त्या स्त्रिया आणि त्यांच्या सरीच्या आम्ही बाया ! बरं, मग पुढे पाहूं या. देवी ! हा पहा आर्य महासागर.

साकी

अपरपार हा सागर पाहें प्रभंजनें खवळविला ।
लहरीसरसा घालिल वाटे उदरीं सह्यगिरीला ॥
धन्य आर्यभूमी । रक्षक रत्नाकर नामी ॥१॥

वैजयंती ! तसेंच म्हणतात खरें.

हरिहरप्रियकर जाणुनि रक्षिति तत्श्वशुर आर्यधरणीला ॥
तीनहि भागा सागर, हिमनग तो अचल उत्तरे गणिला ॥१॥

देवी ! आर्यभूमीस असेंहि म्हणतात -

साकी

सागरवसना पर्वतकुचधर हरिहरप्रियकर रमणी ।
स्वातंत्र्यामृत-तटिनी जेथें वाहति अभिनव करणी ॥
आगर धर्माचें । बोलति सुज्ञ जगीं साचें ॥१॥

वैजयंती ! तूं आधीं काय म्हणालीस ? गोमन्तकभूमि समुद्राची आत्मजा ती कशी ? देवी ! तुला नाहीं का ठाऊक, परशुराम नामक ब्राह्मणानें, समुद्राच्या उदरांतून घेतलेली भूमि, ती .... ? देवी ! आहे तर तुला माहीत ! सागरराजा मोठा उदार दाता, ब्राह्मणाला दान देता, अगदीं द्विजांच्या शब्दाचीच प्रतीक्षा करीत होता ! वैजयंती ! काय ग बोलतेस, सागरानें दान दिली ही गोष्ट खोटीच का ? देवी ! दानानें दिली का बाणांनीं घेतली ? पर्वताचे पर्वत पोटांत गडप करणारा सागर मोठाच उदार ! भक्तीचें दान कीं सक्तीचें आधान ? चार भाग पृथ्वी घशांत पडली तरी आशा अधिकच वाढते आहे; लोकांनीं याचें पूजन करावें, हेमरत्नें अर्पावीं, यानें तीं खुशाल पोटांत सांभाळावीं; हेंच धर्मशास्त्र. देवी ! खरें ना हें ? भार्गवरामाच्या धनुष्याचा झणत्कार झाला तेव्हाच दानाचा सत्कार उडाला. शराच्या संधानावांचून दानाचें अनुसंधान कधीं उठत नाहीं. वैजयंती ! उगीच कां ग सत्याची हत्या करतेस ? सागरानें लक्ष्मी सारखी रत्नें देवास अर्पण केली तीं का बाणासच भिऊन ? देवी ! माझ्या तोंडून वदवून घेतेस का ? तूं जाणतेसच की, देव आणि दैत्य हे सावत्र बंधु, मत्सराचा बिंदु सोडून एकमन झाले, तेव्हांच सागराचे मंथन चाललें; आणि रत्नाचें दानहि तेव्हांच घडलें एरवीं ब्रह्मदेवासारख्यांनीं शतश: वंदन आणि चारहि मुखांनीं स्तवन केलें असतें तरी एकाहि रत्नाचें दर्शन त्याच्या नयनांस झालें नसतें, हे खास समज. ते असूं दे ग, वैजयंती. व्यक्ति तितक्या प्रकृति. उपकार करावा त्यांनी अपकार गणावा, हीच जगाची रीत. पण मी एक सांगतें, सागरराजा हा आमचा जनक, त्याला दूषण देणें हें आम्हांस भूषण नाहीं, देवी ! जनक असो किंवा रजक असो, सत्य बोलण्यास कोणाच्याच जनकाचे भय नाहीं. पुरे ग, वैजयंती, एका शब्दावर अर्बुदाच्या कोटी. बरं, मी एक विचारतें, तूं हिमालयाची उंची दाखवलीस पण समुद्राची खोली मात्र तुला मोजतां आली नाहीं. देवी; तूं हा चित्रपट विहंगमदृष्टीनेंच पहात आहेस. सागराजवळ काय लिहिलें आहे तें पहा.  बरं, वैजयंती ! तूंच सांग वाचून. पहा तर, देवी -

साकी

भास्करकर दशगुणित खोल हें आप आपगापतिचें ।
गणिता करितां कुंठित होइल सत्य चित्त वाचस्पतीचें ॥
अप्सरा सुधन्या जगत्रयसुज्ञांना मान्या ॥१॥

वैजयंती ! उगीच का ग आम्हां अप्सरांची प्रौढी गातेस ? आर्यावर्तात आम्हांसारख्यांना अति निंद्य वेश्या म्हणतात. देवी ! पण स्वर्गांत आम्हांस देवांचे किरण म्हणतात. मैत्रायणोपनिषदांत
"वा अप्सरसो भानवीयाश्च मरिचयो: "

असे आहे म्हणून बृहस्पतीच्या तोंडून पुष्कळदां ऐकलें आहे. आणखी काय म्हटलेस, आर्यावर्तातील वेश्या अति निंद्य, तर देवाद्य जगद्वंद्य शंकर, आत्मसमाधीचा ब्रह्मानंद सोडून महानंदेच्या रंगमहालांत कशाला ग दंग झाले ? अग, ती भक्तीची भावना. परमेश्वराला भक्तीपुढें याति, कुल कांहीच दिसत नाहीं. सर्वात परमेश्वराला भक्तीच प्रिय आहे. स्वर्ग गतीला भक्तीच फलदाती आहे, असें नाहीं का म्हणत ?  देवी ! तसंच म्हणतात; प्रेमळ गायन हरिहरांना हरिणाप्रमाणें वश करीत असतें. आणि याच गुणानें गायन-कलावती, कलानिधि चंद्रमापेक्षां उत्तमोत्तमा मानतात. देवांचे तीलतील घालून निर्माण केलेली तिलोत्तमा वेश्याच नव्हती का ? वैजयंती ! कांही आपलें महत्व बोलावयाचेंच; पण लोक काय बोलतात याकडे लक्ष दिलें पाहिजे. आम्हां अप्सरांना स्वर्वेश्या म्हणतात. देवी ! कुत्सित लोकांचे बोलणें तुच्छच मानलें पाहिजे. सुजाण लोक आम्हां अप्सरांना स्वर्गाचें भूषण मानतात. तें असो, वैजयंती ! सांग बरं, आर्यावर्ताच्या चित्रपटास इकडून तिकडे, ऋषीसारखीं चित्रें कशाला ग काढलींत ? देवी ! हेंच आधीं विचारावयाचें. पहा -

साकी

शंभर कोशांवरती मजला एक एक ऋषि भेटे ।
सप्तऋषींना वंदन करुनी आलें मी बहु नेटें ॥
आर्यावर्ताचें । मापन शुद्ध हच साचें ॥१॥

मोठी बाई, वैजयंती; बरं पण तुझा हा चित्रपट पाहून मला असें वाटतें -

पद (चाल-मम सुत भरत०)
हिमनग घेउनियां उशिला । आर्यावर्त सुखें निजला ॥१॥
सिंधुनद करितो अभिषेका । स्नाना गंगा दे उदका ॥२॥
मलयगिरि चंदनास लावी । काशी धर्मदीप दावी ॥३॥
आर्यलक्ष्मी संरक्षाया, निकट सिंधु वसला ।
भीति दावि महाकाला ॥४॥ हिम०

देवी ! भारीच नामी उत्प्रेक्षा केलीस. देवी ! हा पाहिलास ना, बदरीकेदार आणि या ऋषींच्या तपश्चर्या. फार उत्तम रेखलेस. वैजयंती ! तुला आहे ना ठाऊक -  

साकी

ऋषिवर मोठे निज यज्ञाचा हविर्भाग देवोनी ।
स्वर्गीए करिती अमर सुरांना स्वयं तपा सेवोनी ॥
विबुध सुखी होतां । घन ते देती जल जगता ॥१॥
देवी ! हें पहा पुढे ..... अग, इतक्यांतच सचिंतशी काय म्हणून दिसलीस ? आम्हां स्त्रियांचा स्वभावच तसा लहरी; क्षणांत आनंदाचें नंदनवन, तर क्षणांत चितेचें नरकभवन. अलंबुषा देवी ! ऋषींच्या चित्रांत काय ग भित्रा प्रकार दिसला ? वैजयंती तूं बाई, आर्यावर्ताचा चित्रपटांत रंगून गेलीस, आणि मलाहि पण त्यांतच गुंगून सोडलेंस. आपलें हेंच का कर्तव्य ? देवी ! आणखी काय कर्तव्य तें सांग. जन्मांत न पाहिलेला, देवांगनांना अगम्य, असा आर्यावर्त सहजासहजी पाहाण्यास मिळाला; त्याची ती निसर्गरचना, सृष्टिदेवीचें कौतुक, पर्वतांची सर्पाकृति ओळ, त्यांवर घनदाट वृक्षांची किर्र झाडी, त्यांवर विविध पक्ष्यांची फिर्र झुंडी; समुद्राचे आंदोलन, आणि त्याला प्रभंजनाचें मीलन,तसेंच गंगा नदीनें त्याला सहस्त्र मुखांनीं दिलेले चुंबन, हें सर्व पाहिलें म्हणजे, स्वर्गावरील नंदनवन तुच्छ वाटून भूक आणि तहान हीं कधींच भान सोडून पळतात. खरं कीं नाहीं, देवी ? वैजयंती हेंच सौंदर्य पाहण्यास का आम्ही इकडे आलों ? स्वर्गापेक्षां जर आर्यावर्त सुंदर तर स्वर्गापेक्षां वरती नेऊन परमेश्वरानें कां ठेवले नाहीं ? देवी ! तुझ्या मतें, वरचे श्रेष्ठ आणि खालचें कनिष्ठ असेंच ना ? तराजूचें खालचें पारडें जड कीं वरचें पारडें जड ? डोळ्य़ांपेक्षां केस श्रेष्ठच म्हणणार तर; तें असो. नि:पक्षपातानें सांगतें, आर्यावर्तासारखें सौंदर्य, स्वर्गांत नव्हे, वैकुंठकैलासांत देखील मिळणार नाहीं. वैजयंती ! उगीच कां ग बरळतेस ? वैकुंठकैलासापेक्षा का क्षीरसागरांपेक्षा आर्यावर्त श्रेष्ठ ? देवी ! श्रेष्ठ्कनिष्ठ्पणाचा प्रश्न नाहीं, सृष्टिसौंदर्याचा वाद आहे. आर्यावर्त हेंहि स्वर्गाप्रमाणें देवनिर्मितच आहे. आर्यभूमीची स्तुति देव करतात. ते आपले भगवान्‍ विष्णु. महादेव-शंकर, गर्भावासासारखे त्रास भोगूनहि आर्यावर्तात मनुष्यजन्म घेऊन कशाला येतात ? वैजयंतीचे, आपल्या मनाप्रमाणें देवांचे विचार; महान्‍ महान्‍ देवांना भारीच लागली आहे. सौंदर्याची आणि शोभेची लालसा. साधूंचें परित्राण, दुष्टांचें दमन, धर्माचें संस्थापन याकरतां आर्यावर्तांत जनन घेतात, हें मात्र तूं ऐकलें नसेल ; सर्व जाणतें म्हणतेस आणि मूळ तेच चुकतेस. देवी ! मी मूळ तें चुकत नाहीं आणि सत्याला मुकत नाहीं. पण, आपण काय म्हटलें ? महान्‍ देव, लहान मानवाचा वेष घेऊन काय करतात, साधूचें परित्राण का दुष्टांचें दमन ? एका, दातृत्ववान्‍ राजाला कपटानें फसवून, त्याच्या मस्तकावर पाय देऊन पाताळांत घालणें हें कोठल्या कोटींतलें ? बळीराजा दुष्ट ना ? ती कथा आपण ऐकली नसेल; असेल तर असें बोलणारच नव्हतीस. देवी ! काय सांगूं. त्या बळीराजाची पत्नी भोळी, नव्हे अगदीं खुळी. मी जर तिच्या जागीं असतें तर त्या कपटपटु बटूच्या पायांचे मोज घेऊन मौजच केली असती, आणि त्याला खट्टूच करुन मागल्या पायांनी परत लावलें असतें. वैजयंती ! त्या बटूचे सामर्थ्य सामान्य नव्हतें; अदिति देवीचा कुमार आणि हरीचा अवतार .... देवी ! आहे ग ठाऊक. अदितीच्या पुत्रांचें अनीतीचें वर्तन सार्‍या कीर्तनकारांस विदित आहे. त्या कपटु बटूचें आणि त्या रणपटु भटूचें सामर्थ्य सर्वांस ठाऊक आहे. देवी ! ब्राह्मणधर्म म्हणतात मुख्य अहिंसा, असा वेदांचा आधार, तर हा भगवंताचा अवतार म्हणून, धनुष्याला टणत्कार देऊन, क्षत्रिय बाळांचा संहार कशाला ग करतो आहे ? वैजयंती ! उगीच कांहीं बरळूं नकोस, त्या अवतारी पुरुषांकडून भलतेंच कांहीं होणार नाहीं, त्यांत ब्राह्मण ..... हा, हा, देवी ! खासें बोललीस, ब्राह्मण म्हणजे शुद्ध आचरण. क्षत्रिय राजांना मारुन त्याचें राज्य ब्राह्मणांस दान केलें, आणि यांच्या विधवा राण्या ? काय ग बोलतेस, देवी ? शास्त्रें रचणारे ब्राह्मण, आचरण करणारेहि ब्राह्मण; क्षत्रियांचा निर्वंश झाल्यास ब्राह्मणांस प्रार्थून वश करुन संतति उत्पन्न करुन घ्यावी, हा महाशास्त्रार्थ ! पातकाचा लवलेश नाहीं ! ब्राह्मणा संतु निर्भय: आणि हेम विप्र सदा शुचि: वैजयंती काय बोलते तें तिलाच ठाऊक असणार नाहीं. देवांचे अंशभूत अवतार, त्यांवरहि शब्दांची तरवार. धर्मनीतीची पुरस्कर्ती श्रुति भक्तिभावानें ज्यांची स्तुति करते त्यांच्या विपरीत बोलणें, हें मंदमतीचेंच लक्षण आहे. देवीचे बोलणें मात्र भारी सरस; धर्माचें संस्थापन आणि अधर्माचें प्रोत्साहन. देवांचे अंश, महान्‍ लौकिकवान्‍ राजांचे वंश, तेच ना ते ? एका भावाला कपटानें मारुन, त्याचें राज्य, पत्नी, पुत्र दुसर्‍या भावास देणें, येथें धर्मनीतीचें अचल ठाणेंच असणार ! एका अबलेचा विश्वासघांत यासारखें अध:पात करणारें पातक जगांत दुसरें असणारच नाहीं. वैजयंती ! धर्मनीतीचें सूक्ष्म गतिज्ञान, आम्हांसारख्या अल्पमतींना थोडेंच कळतें आहे; ज्यांच्या कृतीची कविजन कीर्ति गातात, ज्यांच्या भक्तीनें मुक्ति प्राप्त होते, त्यांच्याविरुद्ध बोलणें हे शुद्ध अबुद्धीचें लक्षण, प्रमाणभूत आहे. देवी ! कविजन म्हणजे भाट बंदिजन. कपटाची कृति, अनीतीची सक्ति, अधर्माची रति, आणि त्यांची करावी लोकांनी भक्ति आणि लाभणार काय, सायुज्याची मुक्ति; अपकीर्तीची ज्यांना भीतीच नाही त्यांकडून सद्गति लाभणें हें वस्तुस्थितीला धरुनच असणार. वैजयंती ! भारीच जीभ लांब केलीस. पण तूं एक सांग, देवेंद्राचें म्हणा किंवा कोणाचेंहि म्हणा, पद किंवा राज्य हरण करण्याई इच्छा आणि प्रयत्न करणार्‍यावर परमेश्वराने पाय देऊं नये, तर काय निमूट पहावें ? परापहार करणार्‍यांवर हरिहरांनीं पादप्रहार करणें साधारच आहे. तसंच पहा, राजे लोक अत्याचार करुं लागले म्हणजे भगवंतानें ब्राह्मणरुपानें शस्त्र धारण करणें, हें का तूं अनीतीचें लक्षण मानतेस ? अतिताईचा अतिरेक झाला म्हणजे शास्त्र्यांनीं शस्त्रें घ्यावीच लागतात. हेंच धर्माचें तत्व. देवी ! हेंच धर्मतत्व, आणि कपटकृत्य हें नीतीचें महत्व. वैजयंती ! कपटकृत्य सत्याला बाधा करतें हें खरें, पण, शटेशु शाठ्यं, हेहि नीतीचें लक्षण आहे. अन्यायकार्य केल्यावर दुसर्‍याकडून सत्कार्य होणार कसें ? एका अबलेचा विश्वासघात ? अग आपल्या पतीचा प्राणघात करणार्‍या महापातकी पत्नीवर विश्वाचाच आघात होत असतो. येथें स्त्रियांचा पक्षपात नाहीं. देवी ! भारीच ग त्या असंगत गोष्टी. माझीच मति नाहीं आधीं स्थितीवर. बरं तर; देवी ! सांग तुझी मनस्थिति. वैजयंती ! आम्ही इकडे आलों, त्या कोणत्या कार्याला ? आम्हांला महेंद्राने पाठविल्या त्या अशा स्वछंद हिंडण्याफिरण्याकरितां नाहीं. देवी ! आहे ग ठाऊक. देवेंद्रानें आपल्या कार्याकरतां आर्यावर्तांत पाठवल्यां हे मला पूर्ण ठाऊक. देवेंद्रानें आपल्या कार्याकरतां आर्यावर्तात पाठवल्यां हें मला पूर्ण ठाऊक आहे. पण इकडेतिकडे फिरण्याची बंदी होती हें मात्र मला कळलें नव्हतें. अग, आम्हां अप्सरांच्या -

पद (चाल - बायांनो द्या सोडोनी०)

स्वातंत्र्यावरती कांहीं । देवांची अटकळ नाहीं ॥
स्वच्छन्द हिंडणे फिरणें । स्वेच्छेनें वस्तु वापरणें ॥
परपुरुषीं भाषण करणें । त्यांना नच वाइट कांहीं ॥१॥

नाहीं तर -

कोंडोनि ठेविती गेहीं । बोलाया सक्त मनाई ॥
परतंत्र विवाहित बाई । सौख्याचा लेश न पाही ॥२॥

वैजयंती ! गेलीच आपली दुसर्‍या विषयावर. देवी ! जरासें लक्ष दे, मी इकडून तिकडे फिरुन पाहिलें, या आर्यावर्तांतील स्त्रिया म्हणजे अगदीं अंधारकोठडींतील चोरट्या बाया, अग, त्यांना वायु आणि सूर्य हेदेखील परपुरुष, कोणत्या पातकाने त्यांना स्त्रीजन्मास घातलें हें ब्रह्मदेवासच विचारलें पाहिजे. मला तर त्यांची-आमच्या भगिनींची-भारीच कींव येत असते. देवी ! इकडे पहा तरी. वैजयंती ! आर्य भगिनींची मोठीच कींव करणारी तूं. देवी ! पहा तरी. अग त्यांच्या त्या मूर्ख नवर्‍यांना, त्यांच्याच शास्त्रांचीं वचनें कळत नाहींत. ऐक, जरा लक्ष दे.

साकी

पूजन होतें तेथ स्त्रियांचे रमति देवता तेथें ।
इष्ट मनोरथ सुफळायाला भार्यापूजन सुमतें ॥
लक्ष्मीवास गृहां व्हाया । इष्टचि स्त्रीपूजन कार्या ॥१॥

वैजयंतीनें शास्त्रें तरी कधी पाठ केली ? स्त्रियांचे पूजन म्हणजे काय मखरांत बसवून धूप, दीप, आरत्या ओंवाळणें आणि नैवेद्य, तांबूळ, मंत्रपुष्प घालून नमस्कार करणें ? काय तरी जिव्हा शिणतच नाहीं. देवी ! तें कसेहि असो. येथील पुरुषांनीं मात्र, स्त्रियांच्या पारतंत्र्यकार्यांत पातकाच्या राशी करुन ठेवल्या आहेत, आणि त्यांचे प्रायश्चित पारतंत्र्य नरक - त्यांना इथेंच प्राप्त होणार आहे. वैजयंती ! आर्यावर्तात स्त्रियांना किती मान मिळतो, हें सहज वरवर पाहणार्‍यांस कळणार नाहीं. देवी ! पहा तरी, मानापमानाचें अनुमान.

साकी

ठेविति अज्ञानाच्या पंकी विद्या शिक्षण नाहीं ।
शास्त्रें रचुनी पतिव्रतांचा धर्म सांगती पाहीं ॥
पति हा देवचि पत्नीचा । मोक्षचि बंदिवास साचा ॥१॥

वैजयंती ! आर्यावर्तातील स्त्रियांनीं फिर्याद मांडली का तुझ्याकडे ? देवी ! हेंच तें. ज्ञानावाचून मानापमान कळत नसतो. खरेंच सांगतें, मला आतां इथें, या स्त्रियांच्या-आमच्या भगिनींच्या उन्नतीकरतां एक अत्युत्तम शिक्षण-शाळा स्थापन केली पाहिजे. आणि त्या आमच्या अज्ञान समजल्या जाणार्‍या अबलांना ज्ञानदानानें स्वात्रंत्र्यामृताची गोडी लावून पुरुष वर्गाच्या खोडी मोडून टाकल्या पाहिजेत. देवी ! उगीच सचितशी कां ? चिंता अगदीं चित्तांत बाळगूं नये. मनाच्या उत्साहानें जनाचीं कार्ये अनायासें घडत असतात. वैजयंती ! तूं स्वर्गांतून येथें येऊन, येथल्या स्त्रियांची उन्नति करणार, की त्यांच्या धार्मिक दांपत्यप्रेमांत विष कालविणार ? आपल्यासारख्या स्वतंत्र अप्सरा बनवणार का त्यांना ? देवी ! तसें नाहीं मी म्हणत, पण शिक्षणावाचूंन मनुष्यपणा तरी त्यांना कसा कळणार ? वैजयंती ! राहूं दे ग त्या गोष्टी, आमचें कार्य आम्हीं पाहूं. देवी ! हेंच तें, आम्ही तुम्ही हा भेदभाव मनां बाळगूं नये. कितीही अज्ञान झाल्या तरी आम्हांसारख्या स्त्रियाच ना त्या ? जात्याभिमान हा सर्वांत सन्मान्य आहे. वैजयंती ! स्वर्ग कोठें, पृथ्वी कोठें, आम्ही कोण, त्या कोण, कसला ग जात्याभिमान, आणि कोण ग त्यांना विद्यादान करणार ? ज्याचें त्यास पाहतांनाच जीव नकोसा होतो; मला वाटतें, आम्हांपेक्षां सहस्त्र पटीनें आर्यावर्तांतील स्त्रिया सुखांत आहेत. देवी ! सुखदु:खाचें अनुमान, ज्ञानावाचून कसें लागेल ? गाईंना दाव्यानें सुख, शुकास पिंजर्‍यांत सुख, हत्तीस श्रृंखलेंत सुख आणि कीटकांना कर्दमांत सुख, सारीं सुखेंच. पारतंत्र्यांत आणि सुख ? मग दु:खानें विन्मुखच झालें पाहिजे. बरं तर वैजयंती. स्वर्गांत गेल्यावर देवांना सांगून त्या स्त्रियांची पारतंत्र्यातून मुक्तता करुं. हा, हा, देवी ! देव हे आपले पुरुषच ना ? ते पुरुष जातीचे पूर्ण अभिमानी; त्यांना स्त्रियांची कींव थोडीच येणार ! पशुपक्ष्यांचेंदेखील मन स्वजातीकडेच ओढा घेत असतें. पृथ्वीवरच्या पुरुषांना त्रास पडले तर मात्र देव धांवत येतात. वैजयंती ! देव येतात या पृथ्वीवर ? बरेंच आहे तर. देवी ! अज्ञानाचें पांघरूण घेतेस, का मला अज्ञान समजतेस ? आर्यावर्तांतील लोकांना, राक्षसांसारखे दुष्ट दुर्जन त्रास देऊं लागले म्हणजे आपले देव, कोणी वानराचा तर कोणी अस्वलाचा जन्म घेऊन त्यांस सहाय्य करीत असतात. हें तुला नाहीं का ठाऊक ? एका दैत्याला मारण्याकरतां भगवान्‍ विष्णुनें अर्धा देह् सिंहाचा आणि अर्धा देह मनुष्याचा असादेखील अवतार घेतला. त्या भयंकर रुपाला पाहून लक्ष्मीदेवीने किंकाळीच फोडली असें म्हणतात. आणि एका राक्षसाला मारण्याकरतां महादेव शंकर वानरच होऊन उड्या मार लागला पार्वतीदेवीला त्याचें पुच्छ पाहून कौतुकच वाटणार होतें. वैजयंती ! तसेंच खरे, आर्यावर्तांतील स्त्रियांना कोणी राक्षस त्रास देऊं लागले तर तसाच अवतार घेऊन येऊं, बरं. हा, हा, देवी ! आर्यावर्तातील स्त्रियांना त्यांच्या नवर्‍यापेक्षां आणखी त्रास देणारे राक्षस पाहिजेत ? काय ग भारीच बरळतेस, वैजयंती ? तुझी जीभ तुझ्या स्वाधीन नाहींसे दिसतें; महान्‍ महान्‍ देवांची थट्टा करतेस हें अगदी अप्रशस्त. देवांच्या लीला देवांना माहीत. थोडेंसें रुचतें आणि अधिक ते ओकतें, बरें. देवी ! मी काय अमृत बोललें ? तूंच खरें सांग, देवेंद्राला आणि दीनेंद्राला, वानर होऊनच आर्यावर्तात खेळखंडोबा घालण्याची मोठी हौस होती ? आणि आपले पितामह ब्रह्मदेव अस्वल तर झालेच, तेंहि सोडा, पण त्यांनीं, म्हातारपणीं एक वानरीच कां नवरी पसंत केली ? ब्रह्मदेवाचा कुमर नळ वानर म्हणतांच मन चर्र होते कीं नाही ? आपल्या त्या देवांना, नरांपेक्षा वानरांचें जनन मंगलकारक वाटतें ना ? वैजयंती ! भारीच बेताल सुटलीस. अग, देव अंतरसाक्षी आहेत. त्यांना हें तुझें बोलणें कळेल तर आमचें डुलणें येथेंच संपेल. देवी ! काय म्हणतेस, देव अंतरसाक्षी ? आणि महादेव सर्वसाक्षी, का भूतभविष्य जाणणारे तीन अक्षी ? पण आपल्या पुत्राचें शिरकमल एक राक्षस तोडून नेईल हें मात्र त्याच्या लक्षीं आलें नाहीं बिचार्‍या हत्तीची हत्या करुन बसला चुंबन देत. देवी ! उगीच कां काळजी करतेस ! वैजयंती ! भली बाई सांपडलीस सोबतीण. अग, आम्ही स्त्रिया निसर्गत: अज्ञान, त्यांनी देवांना-नव्हे पुरुषांना मानच दिला पाहिजे. श्रेष्ठ लोक आम्हां स्त्रियांना कमी प्रतीच्या उगीच नाहींत मानीत. काय, देवी ! आम्ही स्त्रियांना कमी प्रतीच्या उगीच नाहींत मानीत. काय, देवी ! आम्ही स्त्रिया अज्ञान अबला कोणी ठरवल्या ! पुरुषांनी ना ? पण मी स्पष्ट आणि सत्य सांगतें, पुरुष म्हणजे अगदीं मूर्ख आणी अविचारी. मनुष्यापेक्षां देव तर भारीच विचारशून्य. उगीच का पुरुष आणि भ्रमर एकाच कोटीतले म्हणतात ? आणि काय सांगूं देवी ! स्त्रिया जर अविवाहित राहतील तर पुरुषांपेक्षा श्रेष्ठ कृतीच्या ठरतील. वैजयंती ! पुरुष आणि भ्रमर एका कोटीतले कसे ग ? देवी ! पहा भ्रमराची रीति -

पद ( मम सुत भरत० या चालीवर)

चंपकलिकेला त्यजिती । पंकजीं गुंजारव करिती ॥
तेथें नच होई तृप्ती । शोधित आम्रकळी फिरती ॥
वासहीन त्या कण्हेरिच्याही पुष्पावरि घिरटी ।
घालित दिवसरात्र शिणती ॥१॥

मग, पुरुषांची आणि त्यांची कशी ग जोडी करतेस ? देवी ! पहा हे पुरुष कशा वर्तनाचे -

पद (चाल सदर)

अमृतसागर जरि मिळला । तृप्ति न होई चित्ताला ॥
कोठें शोधिति सरितांला । कूपीं प्रीति होइ त्यांला ॥
गढुळ नासके तलाव शोधिति व्यथित देह सगळा ॥
तृष्णा सोडि न परि त्यांला ॥१॥

वैजयंती ! असतील असे कोणी पुरुष, पण मनुष्यांप्रमाणें देवांना मानणें म्हणजे महापातक संपादणें, असे म्हणतात. अग, देव ! देवांपेक्षां मनुष्य भारी उत्तम; अग, खरें पहा, मनुष्यांना देवांचे भय असतें, पण हे निर्भय आणि निरंकुश. मनुष्यांनी पातक केलें तर. यमाचें बंधन आणि या महापातकी देवांचें पूजन, अर्चन.

पुरे ग, वैजयंती ! आपल्याच देवांचे आपण वंचन करणें, हें आम्हांस-त्यांच्या प्रजाजनांस-प्रशस्त नाहीं. आम्ही त्यांचे वंदनच करावयाचें. हेंच तें. देवी ! प्रजाजन काय कीं परिजन काय, सत्य बोलण्यास जर स्वतंत्रता नाहीं, तर स्वर्गवासापेक्षां नरकवास भारी उत्तम. आतां माझे हे सारे विचार स्पष्ट आणि शुद्ध भाषेंत, देवसमेत, प्रदर्शित करणार आहें. सत्य आणि स्वातंत्र्य या भाषणांत वाईट दिसून यमानें जरी मला लोह-स्तंभास बांधलें तरी कपटी, मूर्ख पुरुषांच्या आलिंगनापेक्षां आनंदांत राहीन. मग ते देव असोत कीं मानव असोत.

"स्वातंत्र्ये निधनं श्रेय: । पारतंत्र्ये भयावह: ॥"

हेंच जगाचें जीवनतत्व आहे. केवळ उदरभरण हें जीवाचें भूषण नाहीं. देवी ! काय सांगूं, माझ्या मालकीच्या य:कश्चित्‍ स्वतंत्र वस्तू पेक्षा मला परतंत्र सिंहासनहि आवडत नाहीं. वैजयंती ! तुझे मस्तक जरा तप्त झाल्यासारखें दिसतें. बोलण्याचा हेतु काय, मुद्दा काय, कांहीच संगति लागत नाहीं; बरं ये जरा, त्या सरस्वती नदींत स्नान करुन शांत होऊं. देवी ! सरस्वतीच्या स्नानानेंच मला सत्य आणि स्वातंत्र्य यांची गोडी लागली आहे. सत्य,स्वतंत्रता आणि सरस्वती यांनाच त्रिवेणीसंगम म्हणतात. वैजयंती ! भारीच उच्छृंखल झालीस तूं. देवांवरहि तोंडसुख घेतेस. देव आहेत म्हणूण जरा चालतें आहे. पति हा पत्नीचा देव आहे, पतीच्या आज्ञेत राहण्यांत जे भूषण आहे, ते भारी पुण्याईचे लक्षण आहे. धर्मपत्नीपद मिळण्यास पुष्कळ पुण्याई पाहिजे. अलंबुषादेवी ! काय ग तूं जाणूनबुजून देवांची तरफदारी करतेस. देवांचा ढळढळीत अन्याय, अविचार आणि मूर्खपणा तुला दिसत नाहीं असें मी मानीत नाहीं. हांजीहांजीपणा हा पाजीपणा आहे. सत्याचा अपलाप करुन देवांची प्रीति संपादन करण्याची तुझी जर इच्छा असली तर ती फार चुकीची आहे. वैजयंती ! देवांनीं इतकें तुझे काय वाईट केलें आहे ? देवी ! माझें व्यक्तिवाचकच का वाईट केलें पाहिजे ? देव अन्याय करतात, अधर्म करतात आणि मनुष्य लोकांना वाईट कित्ता घालून देतात; आमच्या भगिनी वर्गावर होणारा कहर आणि छळ न्याय्य मानतात. छे, बाई, आमच्या भगिनी वर्गावर कसला ग छळ आणि कहर होतो ? आर्य स्त्रिया आनंदांत असतात आणि तुला ग काय त्यांची चिंता ? काय देवी ! आर्य स्त्रिया आनंदांत असतात ? अज्ञान - नरकांत रुजतात, पारतंत्र्य-कर्दमांत रुळतात आणि काय आनंदसागरांत डुलतात ? पण आर्य स्त्रियांची अभिमानी आर्यधरणी आपल्या कन्यांना पारतंत्र्य रौरवांत पाहून स्वातंत्र्य -कुंकुम कसें लावते हेंच आश्चर्य आहे. वैजयंती ! तुझी स्थिति पाहून मला मोठी भीतीअ वाटत आहे. देव आपले अन्नदाते आहेत. त्यांच्याविरुद्ध कधींच बोलूं नये; त्यांना मूर्ख अविचारी म्हणणें म्हणजे कडक शिक्षेस पात्र होणें. देवी ! सत्याला कधींच भीति नाहीं, म्हणून पुनरेव सांगतें, मनुष्यापेक्षां देव महा मूर्ख, कपटी आणि विचारशून्य; इतकेंच नाहीं, तर ते आपल्या दुष्कर्माचें फळ भोगूनहि शुद्धीवर येत नाहीत. वैजयंतीचें मस्तक इतके कशानें बिघडलें ? वैजयंती जरा शांत हो ग. असें मस्तक भडकूं देऊं नकोस. चल, त्या सरस्वती नदींत स्नान करुन शांत होऊं. स्वर्गापेक्षां येथें जरा चंडकिरण संताप देत असतो. देवी ! संताप देतो म्हणूनच त्याची आर्य लोक पूजा करतात. बरं, तें असो. वैजयंती, पाहिलीस ना, तिकडे श्रीभगवान्‍ विष्णूची मूर्ति आहे ती. जाऊंया आधीं, सरस्वती नदींत स्नान करुन त्या देवास नमस्कार करुं, आणि त्या तुलसीवृंदावनास प्रदक्षिणा घालू. हा, हा, देवी ! मी सारें बोलत्यें त्याचें सारतथ्य याचे देवतेंत आणि त्या वृंदावनांत आहे. वैजयंती ! सरळच बोलतेस ना ? कोठें भगवान्‍ नारायण, कोठे तुलसीवृंदावन आणि कोठें तुझे संभाषण ? देवी ! माझे सारे विचार तूं लक्षांतच घेतले नसतील. त्याचे सारें बीज याच नारायणवृंदेच्या चरित्रांत आहे. वैजयंती !
कोठें भगवंताचें चरित्र, आणि कोठें तुझें बोलणें अपवित्र ! देवी ! जागी असून निद्रेचें सोंग घेतेस का ?

पहा यांचे चरित्र सुनिर्मल जालंधर-ललना । पतिव्रता जी सद्‍गुणखाणी सुकवि देति माना ॥
तिजशीं कपटा आदरिलें । धर्मनीचिचे बिरुद सर्वही कां ग लया नेलें ॥
परस्त्री भगिनीसम माना । लोकां सांगुनि अभिलाषिति हे नमिति लोक त्यांना ॥

देवी ! आणि सांग -

( पद चालू )

जगत्रयसुंदर लक्ष्मीला । सोडुनि कैसी दैत्यकामिनी
आवडली त्यांला ॥१॥

वैजयंती ! तुझे फारच झालें अं. आपलें शहाणपण भारीच ओततेस. देवी ! माझें मूर्खपण असो; सत्य भाषण मूर्खत्वाचें लक्षण. असेंच ना ? पण आपल्या भगवंताचें शहाणपण, या कपतकार्यांत आर्य लोकांनी वर्णावयाचेंच. वैजयंती ! (स्वगत) हिच्या बोलण्यांत तथ्य आहे खरें..  देवी ! तूं खरेंच सांग, वृंदेच्या सौंदर्यास सीमा नसली, किंवा भगवंताची इच्छा अनावरच झाली असली, तर इतकें कपटाचरण करण्याचें कारण नव्हतें. वैजयंती ! भगवान्‍ नारायणास शहाणपणा नाहीं ना ? देवी ! पहा, आपले भगवान्‍ -

साकी

किरिट कुंडलें अलंकारमय गरुडारुढ होवोनी ।
गेला असतां वृन्दा होती तल्लिन ना का चरणीं ? ॥
कपटा नाचरितां । होती प्राप्त दैत्यकांता ॥१॥

वैजयंती ! आपल्याप्रमाणे वृन्देला अप्सराच का समजतेस ? तिचें पातिव्रत्य किती जाज्वल्य ! वृन्दा किती पुण्यवान, रुपवान; तुला बोलतांना भानच उरत नसतें. देवी ! माझें बोलणें तुझ्या लक्षांतच येत नाहीं. अग, शहाणपणा कांही शिकवून येत नसतो. आणि अशा गुलाबी व्यवहारांत, गोडीगुलाबीनेंच कार्ये होत असतात. कपट पाप करुन शाप घेण्याचें, आपल्या नारायणास कारण नव्हतें. अग, त्यांनी त्या वृन्देस आळवून वळवून वश केली असती, तर देवांची इतकी नालस्ती झाली नसती. पुरुषांना स्त्री वश होत नाहीं, तर पौरुष तें कसचें ? वैजयंती ! काय तुझे हे प्राकृत विचार ! भगवंतांनी हें कृत्य कशाकरतां केलें, हें तुला समजण्यास बरेंच दूर जाण्यास पाहिजे. त्रिलोकास त्रास देणारा जालंधर दैत्य, याचा नाश करण्याकरतां भगवंतास असे करणें प्राप्त झालें; वृन्देच्या सौंदर्यास भुलून का भगवान तिकडे गेले होते ? जगद्रक्षणाकरतां अशींच कांहीं कृत्यें करावीं लागतात. देवी ! हेंच ते, जगाचे रक्षण, सत्कृत्याचें लक्षण. पण यांत देववर्याचें चातुर्याचें मात्र कार्य झालें नाहीं. वृन्देला वश करुन तिजकडूनच जर जालंधरवधाची युक्ति साधवली असती, तर त्या श्रेष्ठ व्यक्तीच्या गुणाची नालस्ती न होतां भगवंताची कीर्ति अजरामर झाली असती . देवी, तुला नाहीं का ठाऊक, आर्यावर्तातील एका वानरानें असें शहाणपणाचें कार्य केल्याचा पुराणांत पुरावा आहे, आणि त्याची पूजा करतात. ते पुण्यवान्‍ वानराच्या युक्तीपुढें नरांची बुद्धिशक्ति कांहींच उपयोगाची नाहीं हें वस्तुस्थितीला धरुनच आहे. वैजयंती ! किती ग बेताल सुटलीस तूं. तुला कितीदां सांगितलें, देवांचे दोष काढणें, नव्हे ऐकणेंदेखील पाप म्हणून. देवी ! अनुचित कार्य करणें पुण्य़कर्म, बोलणें अधर्म, संतत चातुर्मासांत लक्ष्मीदेवीला विरहताप पडतात म्हणून संताप वाटतो, देवांची दृष्टि सृष्टीहून भ्रष्ट मतीई असें ऐकलें म्हणजे मन कष्टी नाहीं का होत ? लक्ष्मीदेवीने केलें पाप, आणी आतां करते पश्चात्ताप. वैजयंती ! लक्ष्मीदेवीने कसचें ग पाप केलें, आणि पश्चात्ताप कसचा ग करते आहे ? माझ्याच कर्माचें पातक, आणखी काय ? देवी ! तूं इतकी शहाणी असून, कोणाला ग अज्ञानाची कहाणी सांगतेस ? तूंच पहा, ज्या लक्ष्मीदेवीनें देव, दानव मानवांस दूषणें देऊन, सारासार विचारी, अव्यभिचारी म्हणून ज्या श्रीहरीस, नवकमलांची माळ कोमल हस्तानें अर्पण केली, त्यानेंच तुळशीला माळ घातलेली पाहून, रमादेवीचे गुलाबी गाल लाल झाल्यास नवल तें काय ? वैजयंती ! मी जातेंच तर आतां स्वर्गावर, तुझे क्षुद्र विचार देवेंद्रास अभद्रच वाटणार; लोककल्याणार्थ, जगद्रक्षणार्थ अशीं कांहीं कृत्यें करावीं लागतात; देवांना आणि मानव स्त्रियांशीं पापवासना ? देवी ! अशा मानभावीपणानें तुझा मान अधिकच वाढणार, देवेंद्रास हें बोलणें अभद्रच वाटणार; भगवंताची करणी लोककल्याणार्थ, आणि देवेंद्राची करणी त्रिलोकहितार्थ; त्यांस सौंदर्याची लालसा नाहीं, पापाची वासना नाहीं, सारें पुण्य़कर्म; देवाकडून अधर्म कधीच व्हावयाचा नाहीं, असेंच ना ? वैजयंती देवेंद्रावरहि उपसली का तरवार ? चांअला विचार देवी ! खरेंच मनापासून सांग. कशी ग -

पद (चाल-उरला भेद न ज्या कांही.)

शचीहुनि गौतममुनि - जाया । होती सुंदर का जगिं या ॥
रंभा ऊर्वशि याहुंनियां । अहल्या वाटे सुरराया ॥
मुनीची उग्र तपोमुद्रा । ठाउक नव्हती देवेंद्रा ॥

कामेच्छेला बळी देउनी होमिति निज काया । शेवटीं जन्म होय वायां ।

वैजयंती ! अहल्येचें चित्रच जर तूम पाहशील तर -

हा, हा, देवी ! भारीच आरत्या ओंवाळीन. त्रिलोकसुंदरीच्या सरीस कोणीच मिळणार नाहीं. अरण्यांत वास, गोमयाचा सुवास, वल्कलांची पीतांबरें आणि त्याच्या गांठी तर कंठाशी, खासा पेहराव; इगुदी फळांचे तेल अंगास चोळले म्हणजे अनंगानें गुंगूनच जावयाचे.पतिव्रता तर, तरवारीची धार, बोलण्याला हुशार, मोठी लीलालावण्यवती म्हणूनच शिळा होऊन पडली. देवेंद्राचा मूर्खपणा म्ह्टल्यास आपली मुद्रा पळणार. काय करावयाचे होतें म्हणतेस ग, वैजयंती ! भगवंतास म्हणते शहाणपणा नाहीं; देवेंद्र मूर्ख; संगतीचा दोष आला माझ्या नशिबांत; देवेंद्रानें काय किरीटकुंडलें घालून यावयाचें होतें ? देवी ! इतकेंहि नको होतें. एखादें विमान पाठवून, तिला जर स्वर्गावर नेले असतें, तर

साकी

नंदनवनिंचे राजविलासी भोग भोगितां तिजला ।
घोर वनींच्या पशुंची ऋषिंची यादस्ती तरि मतिला ॥
होती काय कधीं ? । सागर चुंबित शुद्ध नदी ॥१॥

देवी । बोलणें असत्य असल्यास खोडून टाक. कपटाचें पातक महाघातक. खुशीचा व्यवहार, मोकळा बाजार, असें उगीच नाहीं म्हणत. वैजयंतीचें तोंड कोण बंद करीत्ल ? अग, यांतील इंगितें निराळींच असतात. हें देवेंद्रास कळल्यास परिणाम वाईटच होणार, देवांस सर्व श्रुत असतें, सत्य असलें तरी पथ्य दिसलें पाहिजे. खरंच ग, देवेंद्रास सहस्त्र नयन आहेत; तेणेंकरुन त्यांना सर्व दृश्य आहेच; दोषाचें दूषण, भूषणच झालें तर. वैजयंती ! देवेंद्रास सहस्त्र नयन आहेत; तेणेंकरुन त्यांना सर्व दृश्य आहेच; दोषाचें दूषण, भूषणच झालें तर. वैजयंती ! मी जाऊं का स्वर्गावर ? देवांची लीला देवांना माहीत, सामान्य लोकांत त्यांची का गणना करतेस ? त्यांच्या कृत्याचा अर्थ निराळाच असतो; त्यांच्या कोपानें तुझी जीभ भस्म होईल. देवी ! माझीच जीभ भस्म होईल का जगाचीही जीभ भस्म होईल ? विहिरीचें तोंड बंद करवेल, पण समुद्राला मात्र बांध घालावणार नाहीं. पापकृत्ये आकाशांत बोलतात. सोमराजाचा कलंक आंधळ्यासहि डोळस करतो कीं नाहीं ? नको नको म्हणतें तरी जिव्हा सत्यास सोडीत नाहीं. आपल्या चंद्रानें गुरुतल्पगामित्व स्वीकारलें तें पापवासनेंनें अगदींच नाहीं. जगाच्या कल्याणार्थ ! देवांनीं पापकृत्यें केलीं नसतीं तर पृथ्वी कधींच समुद्रांत बुडून गेली असती. वैजयंती ! आपले बृहस्पति असेंच का बोलतात ? देवी ! बृहस्पतीच्या मुखांत वेदाम्ची सूक्तें. त्यांत काय सांगू. इंद्र आणि चंद्र यांचीच स्तोत्रें. वैजयंती ! आलें ना ध्यानांत, मोठ्यांचीं दूषणें भूषणें मानतात. आपल्या सोमराजाचें लांछन, लक्ष्मीकारक समजतात, म्हणून आम्हीं लहान जनांनीं महाजनांचें वर्णनच करावयाचें. देवी ! तेंहि खरंच ग वर्णन. सहस्त्रनयन, कलंकितवदन, असें कविजन वर्णन करतात, आणि हे आपल्याशींच डुलतात. राजयक्ष्मा सोमराजाला मानवला; धन्वंतरीसारख्या वैद्यराजांना असाध्य दिसला; असेंच ना लोक बोलत ? आणि काय सांगूं. देवी ! तारादेवी गुरुपत्नी; केवळ माता आणि तिच्याशिही पापवासना ! आणि काय ती रुपाने चटकचांदणी, का अभिनव तारुण्याची कोंदणी ? अशीं लोकांचीं बोलणीं ऐकलीं म्हणजे कानाच्या वळणी उठतात. व्यभिचारासारखा दुराचार दुसरा असणारच नाहीं. वैजयंती ! या कथेचें बीज आम्हांसारख्यांना नाहीं ग समजत; उगीच जीभ शिणवूं नकोस. वैजयंती, भारीच प्राकृत आहेस; काय देवी ! मी प्राकृत आणि देव सुसंस्कृत. देवी ! कडक आणि बेधडक सांगतें, मी जरा जिव्हेस वीज देईन तर त्या महान देवींच्या देवत्वाचें बीजच नाहींसे करीन. बोलून दाखवूं का अनसूयेचा पाळणा ? एका साध्वी स्त्रियेशी नग्न होऊन अन्न वाढ म्हणणार्‍याशीं, धर्मनीतीनें लग्नच लावावयाचें. त्रिलोकाचे धणी आणि अधर्माची करणी.

वैजयंती ! कोठे ग मजल मारलीस तू ? मी जरा शांत ऐकतें, तितकें तुझे अधिकच वाढतें. या दैविक कथांतील रहस्यें रुपकात्मक असतात. आर्य विदुषी गार्गी हिनें देवमहिला परिषदेंत दिलेले व्याख्यान त्यां ऐकलें नसेल. आणि म्हणजे अ-त्रि अर्थात्‍ त्रिगुणरहित परमात्मा. अनुसया म्हणजे आदिमाया; इच्याशीं सत्व, रज, तम यांचा संगम. मला तरी तितकें ज्ञान कोठें आहे ? गणपतीच्या शुंडेचें तिने असें ॐकारात्मक रुकक केलें, कीं देवस्त्रिया अगदीं भांबावून गेल्या. आतां तुला तिजकडे घेऊन जाते, ती तुला सारखा अर्थ करुन सांगेल. चंद्र कोण, तारा कोण, अहल्या म्हणजे काय, इंद्राचें स्वरुप काय, मला तर तिच्याजवळ बराच वेळ घालवला पाहिजे. हा, हा, देवी ! भारीच मान्य, आर्य विदुषी गार्गी ना ? तिला तर वेदांचा पूर्ण अधिकार. मी तिला एकाच गुणाकरतां भारीच मान देते. गार्गीला गुणनिका उगीच नाहीं म्हणत. वैजयंती ! कसला ग एकच गुण ? मोठीच बाई गुणपरीक्षक. देवी, गार्गीने म्हणतात, आपलें सत्य आणि स्वातंत्र्य विवाहहोमांत भस्म करुन टाकिलें नाहीं. देवी ! मनापासून कठरवानें सांगतें, विवाहाची जिनें वज्रगांठ बांधली, तिची गांठ घेण्यास माझ्या काळजाची गांठ कंटाळत असते. भले विचारतरंग, वैजयंती ! लग्न करुंच नये, सार्‍या अप्सराच व्हाव्या ना ? डुकरासदेखील आपलें जिणें सुखकारक वाटतें असें म्हणतात. देवी ! माझें सत्य मत ऐकूनच घेत नाहींस; अग, पूर्ण अनुभवानें सांगते; हे आपलें लग्नाचे विघ्न जगांतून नाहीसें होईल तर यमाचें काम निम्म्याहून कमी प्रमाणावर येईल. देवीचें चित्त चिंतेनें भारीच मारुन टाकलें. देवी ! सांग तरी, तुझे कोणतें कार्य ? वैजयंती ! तुझेंच सारें व्याख्यान बोलून पुरे कर, दोन कानांत दोनशे शब्द कसे मावतील ? नाहीं ग, नाहीं, देवी ! सांग तुझें कोणतें कार्य अडले आहे तें देवेंद्राला आणि आर्यावर्तात कार्य ? वैजयंती ! सत्य आणि शांत रीतीनें सांगतें. अग, या वनांत दधीची नावाचा एक महान्‍ तपोनिधी ऋषि आहे. हा, हा, देवी ! ऋषींच्या गोष्टी ऐकाव्या तपस्विनी बायांनी. आम्हांला ग त्यांच्या दाढ्यांशी आणि जटांशी काय कर्तव्य आहे ? मला तर पावलोपावलीं दगडांसारखे ऋषि अडखळतात. वृक्षांचे अंकुर आणि हे जटासुर ओळखण्यास भारीच अडचण पडते. मेले रानावनांत जिकडेतिकडे पडलेले असतात; कित्येकांवर राउळांसारखी वारुळेंच मांडलेली दिसतात; अग, त्यांच्या त्या पाषाणदेहाला सर्पाचादेखील दंश बाधत नाहीं; अगदीं मांसाचे वृक्ष. वाघ पहात नाहींत आणि सर्प चावत नाहींत. वैजयंती ! शांत ऐकतें म्हणतेस तें हेंच ना ? त्या ऋषीचें सामर्थ्य तुला माहीत नाहीसें दिसतें, त्या ऋषींच्या तपोबळाला देवदेखील भीत असतात. उगीच कांही बोलूं नकोस, ऋषीच्या शापानें भस्म होऊन जाशील. काय देवी ! ऋषींच्या शापानें कोण भस्म होतात, मनुष्य ना ? राक्षसांच्या भयानें होककाष्ठें घेऊन पळणारे ऋषि, भगवंतास कितीदां ग अवतार घेण्यास लावतात ? लक्ष्मीदेवीला, सुखशांत आदिनारायणाचे पाय म्हणून चुरण्यास देतच नाहींत; म्हणून तर ती त्यांच्यावर सदोदित बोटें मोडीत असते. ऋषि म्हणजे ब्राह्मणचे ते; मोठे खट्याळ. ब्राह्मणाचे कल्याण कोणच मागणार नाहीं. वैजयंती ! तूं अद्याप ऋषींचें खरें रुप पाहिलेंच नसेल; ब्राह्मण आहेत म्हणून जग चालतें आहे सर्वश्रुत म्हणते आणि अद्भुत अपूर्व बोलते.  देवी ! मी ऋषींचें खरें रुप पाहिलें नाहीं खरें, पण ऊर्वशीताईच्या मागून लागलेल्या कुत्र्यांचे मात्र सुस्वरुप सार्‍या अप्सरांनीं पाहिले आहे. कोण ग ते देवी ? ब्रह्मर्षि केवढा प्रताप, " ब्रह्मदेवास दटावून क्षणमात्रें । प्रतिसृष्टि केली विश्वामित्रें" देवी, तेच ना ते ? आपल्या एका अप्सरेनें अर्ध्या दृष्टीनें भ्रष्ट करुन सोडले ! आम्हां अप्सरांची सर सरस्वतीलाहि येणार नाहीं. वैजयंती ! माझे कान कंटाळले, पण तुझे दांत शिणले नाहींत; जिव्हेला अगदीं स्वैर सोडलीस. आपलेंच गुणवर्णन आपणच करावें हें नीच कृत्य म्हणतात; आणि अधिक दोष असले म्हणजे अधिकच श्रेष्ठत्व दाखवावें असाहि नीच मनुष्यांचा स्वभावगुण असतो. देवी ! सत्याला लत्ताप्रहारच तर योग्य ना ? तें असो. वैजयंती ! बराच वेळ झाला. सूर्यनारायण अस्ताला गेला हेंदेखील कळलें नाहीं. आतां जरा सरस्वती नदीत स्नान करुन थोडासा फराळ करुं. फार सरस, पण देवी ! फराळाशी आणि स्नानाशी कोणता संबंध ? आहारांत आणि व्यवहारांत पूर्ण स्वातंत्र्य ठेवलें पाहिजे. लाज, भीड तर अगदी उपयोगाची नाही. "आहार व्यवहारेच त्यक्त लज्ज: सुखी भवेत्‍" वैजयंती ! पाहिलेंस का ?

पद ( चाल- हा सकळ देह०)

रजनिनाथ नभ प्रकाश सुखवि लोक सारा ।
नक्षत्रे शुभविलास करिति जगिं पसारा ॥
चंडकिरणतापानें । झाले जे व्यथित मनें ।
सुखवाया निद्रेनें । सुटत मंद वारा ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP