आर्या
ज्याची शक्ति अगाधा कीर्तिसुधाप्राशनीं सदा शिव दे ।
तारो जगा सदाशिव भक्तजनीं सर्वदा सदाशि वदे ॥१॥
हा, हा, कितीतरी आनंद -
पद ( चाल - तृणपर्णाहि०)
शांतिसुखाचें स्थान मनोहर श्रुतिस्मृतीचें आगर तें ।
धर्मनीतिचें मंदिर सुंदर वैराग्यमृत ये वरतें ॥
सरस्वतीचें आरामस्थल विषयवासना ये न मना ।
दधीचि मुनिचें तपोतेजबल लावी स्वर्गा यन्नमना ॥
यज्ञयागविधि सुधीजनाच्या आनंदचि दे चित्ताला ।
कामकोप हे सोडुनि असती तुच्छ मानुनी वित्ताला ॥१॥
काय तरी पुण्यस्थलाचा प्रभाव ! दधीचि मुनींचें आश्रमस्थान कधीं पाहीन ही, उत्कंठा भारीच लागली होती. काय हें गुरुकुल, मला तर -
पद [ चाल - सदर ]
गाई चाटिति व्याघ्राला । सिंहिण खेळवि गजबाला ॥
वृक हे हरिणीसह क्रिडती । सर्पा नकुल देत शांति ॥
मांजर उंदिर खेळाला । पाहुनि हालवे न डोळा ॥
द्वेष-राग हे दग्ध जाहले मित्रभाव जडला ।
लोकां ठाव न वैराला ॥२॥
शाबास, काय हे तरुगण, आणि या लता -
साकी
फलपुष्पांहीं आलंकृत या वृक्षवल्लरी दिसती ।
मयूर वायस आनंदानें स्वानंदामृतीं रमती ॥
बंधुभाव वि्मला ! सद्गुण स्वातंत्र्यीं रमला ॥१॥
काय हें ! वृक्षावर मनुष्याप्रमाणें बोलतात ते कोण ? हं, हे पहा, राघू आणि मैना. काय ! कर्म श्रेष्ठ कीं ज्ञान श्रेष्ठ यावर वाद करीत आहेत ! बरें, विचारुं तर यांना. काय ग मैनाबाई ! तूं कर्म कसें श्रेष्ठ म्हणतेस ? कोण हा भट्टोबा ? या ब्राह्मणांना सभ्यता म्हणून कळतच नाहीं. ब्राह्मणवर्य ! तुला काय समजलें / कर्माच मर्म विश्वकर्म्यालाहि अगम्यच आहे. बरं तर, राघूदादा ! तूं ज्ञान तरी कसें श्रेष्ठ म्हणतोस ? हा कोणी गांवढळसा दिसतो. विप्रोत्तम ! ज्ञानवान् म्हणूनच ब्राह्मण श्रेष्ठ. राघू ! उगीच बडबड करुं नकोस. ब्रह्म म्हणजे ज्ञान, कर्माच्या स्वाधीन आहे. "ब्रह्मकर्मसमाधिन:" मैने ! अज्ञानपणानें केलेल्या कर्माचें फळ फळत नाहीं का ?
साकी
नकळत लागे अग्नि तरी का देहा त्रास न होती ।
अज्ञ जनाचें अमृतप्राशन व्यर्थ होय का जगतीं ॥
कर्माचें फळ तें । सौख्यीं दु:खीं फळ कळतें ॥१॥
बाई मैने ! बाबा राघू ! तुम्ही उगीच वाद घालूं नका. ज्ञान हा पुरुष आणि कर्म हें स्त्री, असें म्हणतात. हीं उभयतां एकत्रच असलीं पाहिजेत. काय, भट्टोबा ! स्त्रियांना अज्ञान म्हणतोस ?
साकी
ज्ञानजलाची तटिनि स्वयंभू सरस्वती स्त्री आहे ।
उपासनेचें कर्म करोनी पुरुष सेविती पाहें ॥
बुद्धि शुद्ध नारी । देह हा पुरुष कर्मकारी ॥१॥
ब्राह्मणवर्य ! ही मैना भारी चंचल आणि असभ्य; दुसर्याला मान देण्यांत धन्यता आहे, हें तिला अगदीं कळत नाहीं. हो, पण राघू ! अज्ञानपणानें मान न दिल्यास, अपमान होत नाहीं. पक्षिणी म्हणजे स्त्रियाच, त्या चंचलत्वांत प्रसिद्धच आहेत. अहो, भटजी ! भट म्ह्टल्यास अपमान झालासा वाटतो, तर म्हणतें, हे विप्रोत्तम ! आम्ही पक्षिणीच का चंचल ? तर -
पद [चाल-मम सुत भरत०]
लक्ष्मी चंचल हें म्हणती । तिज कां सर्व लोक पुजिती ॥
जियेची व्हावयास प्राप्ती । पातकराशी जगिं घडती ॥
कोणी मानिति निजपत्री । ठेविति कोंडुनि कुणि यत्नीं ॥
सेवा हेवा करिती कोणी देवांना पुजिती । कोणी तपती एकांतीं ॥१॥
बरं बाई, मैने ! तुम्ही पक्षिणी आणि देवी लक्ष्मी या एकाच पंक्तीच्या तर. ब्राह्मणवर्य ! तुम्ही वर्णगुरु आहांत, नैसर्गीक ज्ञानवंत म्हणवतां, तर आम्हां पक्षिणींपेक्षां लक्ष्मी कशी श्रेष्ठ म्हणता ? आम्ही चंचल झालों तरी आपल्याच जातीच्या पक्ष्यांशी स्नेहसंबंध ठेवीत असतों, आणि लक्ष्मी ही
पद (चाल-मम सुत भरत०)
चांडाळाला वश होते । विप्रां पायीं तुडवीते ॥
कधिं ही क्षत्रिय पति म्हणते । वैश्या वेश्यांशीं रमते ॥
मूर्खचे मानव तो इजला । स्पर्शू देइ न सुज्ञाला ॥
सरस्वतीशीं वैर मांडुनी, तद्भक्तां छळिते । लोकीं अनीतिपथ रचिते ॥१॥
आणि पहा, आम्ही पक्षिणी एकाद्या पिंजर्यांत घातल्यास पळून जात नाहींत, आणि आपली लक्ष्मी वज्रपंजरांत नव्हे सात बंकाच्या कोठडींत कोंडून ठेवली तरी कोणास न कळत पळून जात असले कीं नाहीं ? आणि सांगा, आपलें मनहि चंचळच कीं नाहीं, बरें. शाबास बाई मैने ! चंचल मनाशीं आपलें काय कर्तव्य आहे ? विप्रोत्तम ! आपण असें कसें म्हणतां ? मोक्षाला आणि बंधनाला मनच कारण आहे. " मन एव मनुष्याणां कारणं बंधनक्षयो: " हें आपलेंच ना ? आणि पहा, सर्वात मनाचाच वेग मोठा असतो कीं नाहीं ? राघूदादा ! आपण इतकें ज्ञान कोणत्या गुरुंकडून शिकलां ? विप्रोत्तम ! आपण ब्राह्मण, वर्णदृष्या ज्ञानी, तर ही अज्ञानाची पांघुरणी काय म्हणून घेतां ? निसर्गासारखा गुरु स्वर्गांतदेखील मिळणार नाहीं. गुरुत्वाची दृष्टि सारी सृष्टींतच भरली आहे. पहा तर -
पद [ चाल-सार्थचि ते वदती ०]
तरुगण हा सगळा । गुरुवर आहे अखिल जगाला ॥
निर्लोभत्वें फल दानाला । देउनि करि तो तृप्त जनाला ॥
मारी तारी या उभयांला । छाया द्याया उशिर न त्याला ॥१॥
आणखी -
परोपकारां निज तनु झिजवी । लोकहितार्थी देहा चिरवी ॥
सुवासगंधे जग हें भरवी । शत्रू मित्र हा भेद न ज्याला ॥२॥
राघू ! हा पुरुष जातीचा पक्षपात नाही का होत ? खरोखर जगाचें गुरुत्व आम्हां स्त्रियांकडेसच आहे. ह्या पहा, लता आणि वल्लरी -
साकी
परम सुवासिक कुसुमें निपजुनि लोकशिरी ठेवाया
निष्कामत्वें परोपकारीं इच्छा तनु शिणवाया ॥
सूत्रा देवशिरीं । पुष्पें नेती निर्वैरी ॥१॥
मैने ! परोपकार शिकवणारे गुरु तर खरोखर पर्वतच आहेत -
दिंडी
लोहशस्त्रें जरि पीडिती तयांला ।
देति रत्नें निष्काम कांचनाला ॥
अग्निज्वालें जरि देह तापवीला ।
धान्य फळतें अर्पिती अधिक त्यांला ॥१॥
राघू ! नद्यांसारखा गुरुत्वगुण कोणामध्येंच असणार नाहीं.
गीत.
व्याघ्र गाइ हा भेद न ज्यांला । जीवनदात्या अखिल जगाला ॥
बंधन घेउनि निज तोयाला । लोकां सुखवीती ॥१॥
ऊर्ध्व मूळ हें ज्यांचें असुनी । शाखा येती सागरजिवनीं ॥
परब्रह्माचें सद्रुप सुजनीं । इष्टचि वंदाया ॥२॥
निज उदकानें तरु वाढविती । त्यांच्या नौका नच बुडवीती ॥
मस्य-कच्छ-मकरांसहि देती । निज उदरीं ठावा ॥३॥
मैनाबाई ! यथार्थ वर्णन केलेंस. राघूदादा ! तुम्ही म्हणतां तें अगदी बरोबर आहे.
साकी
निष्कामत्वें परोपकारीं झिजविति निज देहाला ।
उपदेशचि हा उक्त दाविती निज कृतिनें जगताला ॥
समता सर्व भुतीं । धन्यचि ते गुरु या जगती ॥१॥
आम्ही सचेतन मनुष्यांनीं, अचेतन वृक्ष, पर्वत, नद्या, लता यांकडूनच गुरुत्व संपादन केलें पाहिजे. बरं तर, आपला निरोप घेतों. विप्रोत्तम ! आम्हां अज्ञान पक्ष्यांना, आपला आशीर्वाद योग्य होत नाहीं का ? फार उत्तम वेदसंहितेनेंच आपणास आशीर्वाद देतों.
"देवाभागं यथा पूर्वे संजानानामुपासते ।
"संगच्छध्वं संगदध्वं सं वो मनांसि जानताम्" ॥
--- ऋग्वेद मं. १०-१९१.
पक्षी हो ! तुम्ही एकचित्तानें, एकमतानें आनंदांत रहा, हाच माझा तुम्हांस आशीर्वाद आहे. ब्राह्मणवर्य ! आपला आशीर्वाद आम्हाम्स शिरसावंद्य आहे. पण तो अर्ध आपण स्वकृतीनें जगास दाखवला पाहिजे; आपल्या आचरणाचें इतर जन वळण घेऊन आपले चरण धुऊन पाणी प्राशन करतील. आपण वर्णगुरु आहोत. आपला सुवर्नगुण, गुणहीनासहि वरती उचलून घेईल. विप्रोत्तम ! वाणी आणि करणी यांचा सावत्र संबंध आहे असें म्हणतात. राघूदादा ! भारी सरस. मैनाबाई ! येतों बरं का. ब्राह्मणवर्य ! आपल्या आशीर्वादानें आम्ही पुनीत झालों; पण आमची अज्ञान पक्ष्यांची नि:पक्षपाती विनंति आहे: आपण ब्रह्मज्ञानी ब्राह्मण, सरस्वतीचे पति आहांत, आपण एक मति, ऐक्य कृति, शुद्ध रीति वर्तन कराल तर जगाची अधोगति कल्पांतींहि होणार नाहीं; आणि आपल्या वेदमूर्तीची, केवळ संघशक्तीनेंच, त्रिलोकांत अजरामर कीर्ति गाजून राहील. मैनाबाई ! फार आभार झाले. राघूदादा ! येतो हं. ब्राह्मणमहाराज ! आम्हांस नमस्काराचा अधिकार नाहीं. आपणास वेदांचा अधिकार आहे, आपण जगाचे आधारस्तंभ आहांत, म्हणून आम्हीं अज्ञ जनांनीं साभार सत्कारच करणें इष्ट आहे; महाराज, रागावूं नका. आपण पृथ्वीवरचे देवच आहांत. भूदेवांत हेवा उत्पन्न झाल्यानें नीचतर सेवा करण्याचा प्रसंग येतो असें बुद्धिमंताचें शुद्ध प्रतिपादन आहे. काय ह्या पक्ष्यांचे उच्च विचार ! दधीचि मुनीच्या आश्रमांतील पक्ष्यांची कक्षा भारीच आकांक्षा उत्पन्न करीत आहे. आतां त्यांचें निर्मल गुरुकुल अवलोकन करुन पातंजल मुनींना प्रेमळ हकिकत निवेदन केली पाहिजे ... हेंच तें गुरुकुल यांत बिलकूल संशय नाहीं; हें पहा त्यांचे कुलवान् शिष्यमंडळ, सूर्यमंडळ न्याहाळीत न्याहाळीत वेदमंडलाचा पाठ करीत आहे .... हा ! हा ! यांचा योगाभ्यास, व्यास ऋषीलाहि हव्यासच देईल. पहा -
पद (चाल-तृणपर्णाहि०)
यमनियमासन प्राणायामें प्रत्याहारा कुणि करिती ।
ध्यानधारणा धरुनि समाधि पूर्णत्वानें किति वसती ॥
आसन कुंभक मुद्रा नादा अनुसंधानी बहु तपती ।
हठयोगाची झाली वाटे येथ समाधी शुद्ध रिती ॥१॥
पण हा कोण, सरस्वती नदींत स्नान करुन इकडेसच येत आहे ? ब्राह्मण म्हणावा तर अंगावर यज्ञोपवीत कसें दिसत नाहीं ? बाबा ! तूं कोण ? महाराज मी जातीचा अंत्यज आहें ... काय ? अंत्यज ! चांडाळ ! आम्हां ब्राह्मणांजवळ ? अंत्यजाची छाया ब्राह्मणाला भ्रष्ट करते, तसेच ब्राह्मणाचे किरण अंत्यजाला शुद्ध करीत नाहींत काय ? भ्रष्टाभ्रष्टत्व जातीवर अवलंबून नाहीं; कृतीवर संभवून आहे. आतांशा ह्या अतिशूद्राचें स्तोम अतिशयच माजलें आहे. अंत्यजा ! महाशय दधीचि मुनीच्या आश्रमांत तूं कसा शिरलास ? गुरुमहाराजांना आतांच वंदन करुन आशीर्वाद घेऊन आलों. काय, दहीचि मुनि सनातन धर्माला मान देत नाहींत की काय ? तुझा छायास्पर्श त्यांना कसा मानवतो ? जगांत त्यांस सद्गुरुरज म्हणतात. ब्राह्मणमहाराज ! गुरुवर्यांना आम्ही रत्नापेक्षां श्रेष्ठ परिसाप्रमाणें मानतों. सरस्वती नदींत - काय ? सरस्वती नदीला स्पर्श केलास ? काय हें ? सनातन धर्माभिमानी नामशेष झाले काय ? तूं काय सत्यच बोलतोस ना ? (स्वगत) हा गुरुवर्यांना परिसाप्रमाणे मानतो. म्हणजे, परिसाच्या स्पर्शानें लोहाचें सुवर्ण होतें, असाच याचा भावार्थ दिसतो. विप्रोत्तम ! माझ्या जिव्हेस अमृत येतच नाही. सनातन धर्माची तत्वें सत्य, दया, परोपकार हींच आहेत. त्यांत स्पर्शास्पर्शाचा संबंध नाहीं. ईश्वरभक्ति ही मुख्य आहे. अंत्यजा ! आम्हां ब्राह्मणांस धर्मशास्त्र शिकवतोस कीं काय ? महाश्य दधीचि मुनि, वर्णाश्रमधर्माला कसा मान देत नाहींत, हेंच आश्चर्य आहे. आम्हीच ब्राह्मणांनीं यांस इतकें वर चढविलें आमचा आर्य धर्म, वैदिक धर्म, सनातन धर्म आम्हीच बुडवीत आहोंत. कामधेनूप्रमाणें आमची श्रुति या खाटिकांच्या हातांत देत आहों. अंत्यजा ! आम्ही ब्राह्मण, परमेश्वराचें मुख आहोंत. धर्माचें मूळ वेद; श्रुतिस्मृतींची उत्पत्ति आम्हांपासून आहे. ब्राह्मणमहाराज ! गुरुवर्याच्या कृपेनें आम्हांस थोडेसें कळतें आहे. विराट् स्वरुपाच्या वदनापासून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, उरुपासून वैश्य आणि चरणापासून शूद्र यांची उत्पत्ति आहे; आम्ही सर्व एकाच शरीराचे अवयव आहोंत. अंत्यजा ! ’सर्वेषु गात्रेषु शिर: प्रधान:’ हे कळत आहे ना तुला ? सर्वात ब्राह्मन श्रेष्ठ. विप्रोत्तम ! शरीरांत शिर प्रधान नव्हे राजाच असें समजा; पण पायांचा स्पर्श हातास, हातांचा स्पर्श मुखास होऊं नये, असें धरुन चालेल का ? भागीरथीची उत्पत्ति परमेश्वराच्या चरणापासून असली तरी ती जगद्वंद्य आहे कीं नाहीं ? आपल्या ब्राह्मणाच्या दक्षिण पायांत सर्व तीर्थे असतात, तीं अस्पृश्य कशीं होतील ? ईश्वराच्या चरणाचेंच ध्यान करावें असा आपला शास्त्रार्थ आहे ना ? महाशय दधीचि मुनीला सनातन धर्माचा, वर्णव्यवस्थेचा अभिमान नाही, हें पातंजल मुनींना आवडणार नाहीं. ब्राह्मणवर्य ! गुरुवर्यांना धर्माप्रमाणें नीतीचाहि अभिमान आहे. अरे, धर्म आणि नीति यांत अंतर काय समजतोस ? धर्मात आणि नीतींत भेदभाव कांहीच नाहीं. धर्म-नीतींत भेदभाव नाहीं, पण धर्मांतच द्वैतभाव आहे, आणि नीति अद्वैत आहे. नीतीचें तत्व नसल्यास धर्माला महत्व नाहीं. नीतीची महति नसल्यास धर्मकमाची स्थिति अधोगतीला पात्र होते. परमेश्वरालाहि तत्वरुपानेंच जाणलें पाहिजे. अरे, पण नीतीचें तत्व काय म्हणून समजतोस ? ब्राह्मणमहाराज ! आपण सूर्याप्रमाणें ज्ञानी असून अज्ञानतमाची पांघुरणी कशी घेतां ? नीतीचें तत्व म्हणजे ‘आत्मवत् सर्व भूतानि’ असेंच आहे ना ? आपण सर्व एकाच परमेश्वराची लेंकरें आहोंत, त्यांत भेदभाव त्यास कसा मानवणार ? आपणास दुसर्यानें केलेंले आवडत नाहीं तें आपण दुसर्यांशी करुं नये, हेंच धर्म-नीतीचें, समाजशास्त्राचें मूलतत्व आहे, असें गुरुमहाराज प्रतिपादन करतांना पुष्कळदां ऐकलें आहे. चातुर्वर्ण्यव्यवस्था प्रत्येकाच्या गुणकर्माप्रमाणें विभागली आहे, असें ते स्पष्ट म्हणतात. अरे, पण वर्णव्यवस्था कोणीं विभागली म्हणतोस ? पूर्वजन्मांतील पापपुण्यानें प्रत्येकाला जन्म मिळतो कीं नाहीं ? विप्रोत्तम ! पूर्वजन्माचें मर्म सोपें नाहीं. पूर्वजन्मांत आपण मनुष्यच होतों असें ना आपलें मत ? अरे, असें कसे होईल ? हजारों योनि फ्रिरतां फिरतां अवचित मानवजन्माची प्राप्ति होत असते. ब्राह्मणवर्य ! मनुष्यावांचून पापपुण्याचें ज्ञान इतर प्राण्यांस होत असतें का ? ज्ञानावाचून झालेल्या कर्माचें फळ कसें मिळेल ? वृक्ष, लता ह्यादेखील योनीच ना ? (स्वगत) येथें जरा अडचण येते खरी. (प्रगट) अरे, मी तुझ्याशीं वाद घालीत नाहीं. शास्त्रापेक्षां रुढि श्रेष्ठ आहे. ‘शास्त्रद्रूढिर्वलीयसि’ अतिशूद्र अस्पृश्यच मानले पाहिजेत. त्यांनी स्पर्श केलेलें पाणीदेखील अस्पृश्यच मानलें पाहिजे. ब्राह्मणमहाराज ! पाणीच अस्पृश्य का ? आमचे पाणि लागलेलें धान्यदेखील वाणी लोकांनीं अस्पृश्यच मानलें पाहिजे. सरस्वती नदी आमच्या स्पर्शानें पातकीच होणार का ? अरे, गंगेच्या स्नानानें महापापें नाश पावतात. ‘गंगा पापं, शशि तापं, दैन्यं कल्पतरुस्तथा’ असा शास्त्रार्थ आहे. आणि सरस्वती-गंगेला पातक ? विप्रोत्तम ! सरस्वतीला पाप नाहीं, तर् सरस्वतीच्या भक्तांना-सारस्वतांना-पातक कसें लागतें म्हणतां ? ‘यथा माता तथा सुत:’ असे म्हणतात ना ? तें असो; आम्ही ब्राह्मण, अंत्यजाचें भाषणदेखील श्रवण करीत नसतों. महाराज ! अंत्यजाचें भाषण श्रवण करीत नसाल, पण अंत्यज ग्रहांचे जप करतां, दानें देतां, वेध पाळतां, हें मात्र रसाळ आहे. आम्ही अंत्यज झालों तरी अनार्य मात्र नाहींत. आर्य धर्माचीच आम्ही उपासना करतो. आर्य देवतांचीच आम्ही पूजा करतों. अपराजिता चामुंडा देवी शिखाबद्धांत असते, तिचा आम्ही त्याग करीत नाहीं. [स्वगत] काय ? तिष्ठदेवी शिखाबद्धे चामुंडे अपराजिते’ हें मंत्रवचनदेखील यास कळलें ? श्रुतिस्मृति ह्या गुप्त रीतीनेंच ब्राह्मणांनीं रक्षिल्या होत्या. त्यांचा विक्रय आम्हीच करीत आहों. सरस्वतीचें पतित्व आम्हीच सोडलें, आम्हीच पतित झालों, या अवनीवर ब्राह्मणांची अवनति होण्याचा समय आम्हींच आणला. (प्रकट) अरे, गुरुमहाराज दधीचि मुनि कोठें आहेत ? आतां त्यांकडे या तुझ्या आचरणाबद्दल निराकरण केले पाहिजे. स्पर्शास्पर्शाचें प्रकरण आतांच निवारण न झाल्यास पुढें महारण माजण्याचा प्रसंग येईल. ब्राह्मणमहाराज ! इतके रागावूं नका. आम्हां दीन जनांशीं मारहाण कशाला ? आमचें पालन तुम्हींच केलें पाहिजे. आपण ब्राह्मण ज्ञानवान् आहांत, जगाचे आधार आहांत, आमचा उद्धार तुम्हींच केला पाहिजे. बरें तें असो. सर्व ऋषींची सभा भरवून याचा आतांच निकाल लावणें इष्ट आहे. नाहीं तर हे भ्रष्ट लोक सर्व सृष्टीला निकृष्टावस्था आणल्यांवाचून राहाणार नाहींत. पतंजल मुनीच्या कानांत हा ध्वनि घातला पाहिजे. विप्रोत्तम ! शांत व्हा. आपण ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण सर्व जगांत श्रेष्ठ आहांत, आम्हां दीन जनांवर रोष करुं नका, आमचा दोष आम्हांस कळतो आहे. आमच्या अस्पर्शास आम्हीच कारण आहोंत. आमचें ओंगळ आचरण, अभक्ष्यभक्षण, हेंच आमच्या अस्पर्शास मूळ कारण आहे. आपला न्याय आम्ही मानतों. पण मूळ तत्व सोडून नि:सत्व वादांत आपण हात घालतां हें मात्र जगांत घातक वाटतें. निर्मळपणा हा धर्माचा मूळ पाया आहे. आयुर्वेदाचें रहस्य यांतच साद्रस्य आहे. धर्माचें साधन सारें शरीर अवधानावर अवलंबून आहे; हें आम्ही सांगण्याचें प्रयोजन नाहीं. हो, हें जरा सत्य आहे. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं’ यांतच तथ्य आहे. निर्मळपणा हाच सर्व धर्माचा पाया आहे. गलिच्छ आचरण हेंच पापाचें कारण. बरं, महाराज. नमस्कार, नाहीं, क्षमा; नमस्काराचा अधिकार आम्हांस नाहीं; आम्ही लवूनच सत्कार करणें श्रेयस्कर आहे; एरवीं नमस्काराचा धात्वर्थ रुचिकारकच आहे; येतों महाराज. काय हा चमत्कार ! दधीचि मुनीच्या आश्रमांत पक्ष्यांनी तर गुरुत्वाची कक्षा पुरवली; आणि या अतिशूद्रानें त्यावर धर्माची मुद्रा बसवली. आतां ह्या लतालहरी कशी तंद्री लावतात ते पाहावयाचें आहे. हे पहा वेदांतकेसरी वत्स मुनि इकडेसच येत आहेत. वत्स मुनि ! कोत्स मुनी ! इकडेच का आहांत आपण ? महाशय, गुरुमहाराज सरस्वतीतीरावर आपली प्रतिक्षा करीत आहेत; आपण कोणत्या कामांत गुंतून उरलां तर इतका वेळ ? वत्स मुनी ! आज आपल्या शान्त आश्रमांत मला भारीच लाभ झाला. सूर्यनारायण किती वर् चढला, हेंदेखील कळलें नाहीं. काय, आपणास कसचा लाभ झाला ? आम्ही सारे स्वस्थ सरस्वती नदींत स्नान करीत होतों. आम्हां शिष्यवर्गात आपणास कोणीच भेटला असें दिसत नाहीं. अहो ! आपल्या आश्रमांत सारे गुरूच मला भेटले, मग शिष्यांची काय गरज ? येथें पशु, पक्षी, तरु, लता, नद्या, पर्वत सारे गुरुस्वरुपच आहेत. आपल्या पक्ष्यांनी तर गुरुत्वाची कमालच करुन सोडली. हं चंद्रप्रभा मैना भेटली का आपणास ? मोठी हुशार बोली; आणि रत्नकांत राघू पाहिला का? भारी उमदा भाषी. हो अगदीं बरोबर; उभय पक्ष्यांनीं माझी चांगलीच ओंवाळणी केली. बरं पण, महाशय दधीचि मुनि कोठें आहेत ? कोत्स मुनी ! गुरुमहाराज सरस्वतीच्या वाळवंटावर आहेत. वत्स मुनी ! पाहिलेंस ना ? ही पहा:-
पद [चाल - रजनिनाथ हा०]
बालरवीची सुंदर कांती । देत मनाला अनुपम शांती ।
दाहि दिशा ह्या उपवियोगें । चिंताग्रस्तहि रम्यचि दिसती ।
किरण रवीचे तिमिरा नाशुनि । शुभं प्रकाशा देती जगतां ॥१॥