आर्या (गीति)

वर्णिति वेद जयाला अंत न लागे अनंत ज्या वदती ।
कीर्ति लिहितां सरल्या सरस्वतीच्या अनंत नव दवती ॥१॥

वत्स ! सूर्याधारणा-पाठ तयार झाला ना ? गुरुमहाराज, झाला साधारण, पहा -

"अग्नो प्रास्ताऽऽहुति: ...
आदित्याज्जायते वृष्टिर्वृष्टेरन्नं तत: प्रजा: "
                -- मैत्रायणोपनिषद्‍ ६-३७.

पुरे, वत्सा ! अर्थ आला का लक्षांत ? अर्थावांचून पाठांतर व्यर्थ. गुरुमहाराज ! अर्थ असा दिसतो: -

साकी

अग्नीमध्यें हवने करीं तें आदित्याप्रति पावे ।
तद्रस पर्जन्याच्या द्वारें भूमी वरि ओलावे ॥
मेघचि अन्नाचा । दाता जगता या साचा ॥१॥

वत्स ! यथार्थ भाषांतर केलें म्हणजे अध्ययनाचें सार्थक होत असतें. गुरुमहाराज ! वेदपाठ बोलूं का ? जरा थांब; कौडिण्य ! ब्रह्मदर्शन झालें ना ? हो, झालें, साधारण झालें, गुरुमहाराज. पहा -

"अग्निहोत्रं जिव्हानो लोभजालं भिन्नति"
                    ---मैत्रायणी उपनिषद्‍ ६-२८

बस्स, सान्वय अर्थ सांग पाहूं. कौडिण्य ! लाजूं नकोस. गुरुमहाराज अग्नि यस्य होत्रं, हा षष्ठि तत्पुरुष समास. कौडिण्य ! उपनिषदास व्याकरणाची आकारणी नको आहे. पदांचा स्पष्ट अर्थ लावला म्हणजे गोड पदार्थाप्रमाणें रुचि देत असतो. गुरुमहाराज ! अग्निहोत्रि, जुव्हाल्यानें, या प्रकारेकरुन, लोभजालें, त्या काळाचे ठायीं, भिन्नति म्हणजे भिन्नरुपी होत असतात. कौडिण्य ! अशा भाषेनें अर्थसादृश्य कसें होईल ? गुरुमहाराज ! तर याचा अर्थ जुळणारच नाहीं. कौडिण्य ! असें कसें होईल ? वाणी आणि अर्थ, अर्धनारीनटेश्वराप्रमाणें एकजीवच असलीं पाहिजेत. वत्सा, सांग पाहूं याचा अर्थ. पहा गुरुमहाराज.

साकी

अग्निहोत्रि जन लोभजाल तें टाकितसे तोडोनी ।
संमोहाला छेदुनि पाडी क्रोधा दूर करोनी ॥
षड्रिपु जो नाशी । अग्निपूजक अविनाशी ॥१॥

शाबास, बाळांनो ! अग्नि आणि सूर्य हे ते:जस्वरुपी आहेत; सर्व देवतांत, सर्व भूतांत, सर्व तत्वांत सूर्यदेवता ही सर्वश्रेष्ठ आहे. ग्रहमंडळांत सूर्य हा राजा आहे. आणि पहा -

दिंडी

रवीमध्यें स्थिर चंद्र सदा राहे ।
शशीमाजी अग्नि हा सत्व पाहे ॥
सत्वस्वरुपी परमेश विश्वकर्ता ।
अणूरेणूहुनि बोलती विधाता ॥१॥

गुरुमहाराज ! हें कशावरुन ? वत्स ! मैत्रायणी उपनिषदांत -

"अत्रहि सौर सोमाग्नि सात्विकानि "

असें वर्णन केलें आहे तें नाहीं का लक्षांत ?

हो, हो, गुरुमहाराज ! ग्रहमंडळांत सूर्य हा क्षत्रिय म्हणजे राजा असें म्हणतात ना? आणि पहा, ज्योतिषशास्त्रांत रवि हा पितृस्थान आहे. हो, वत्सा ! हे पहा -

साकी

द्याया लोकां सौख्य भूपती कर घेई त्यांकडूनी ।
सर्व जगाला जीवन द्याया रवि घे जल शोषोनी ॥
रवि हा नेत्राचे विश्वाचा । आत्मा चराचरा साचा ॥१॥

गुरुमहाराज ! सूर्यनारायणाच्या किरणांत जप केला म्हणजे महान्‍ व्याधींचा नाश होतों असें म्हणतात ना ? वत्स ! काय अध्ययनाचा अर्थच नाहीं का लक्षांत घेत ?

"सूर्याभिमुखं जप्त्वा महा व्याधिभयान्‍ प्रमुच्यते "
                        ---- अथर्वशीर्ष.

हो, हो, गुरुमहाराज ! तसें आहे खरें. वत्सा ! यमाचे दूत रोग, यमाच्या जनकाला कसे भिणार नाहींत ? हा आला कौडिण्य, पुराणकेसरी. हो, बा, चुकलों; न्यायशास्त्री आणि वेदांती, वैदिक आणि पुराणिक यांचा लंगडा झगडा सदोदितच चालू असतो. बाळांनो ! उगीच वाद घेऊं नका, स्वस्थ ऐका. सर्व भूतमात्रांचा अन्न हा प्राण आहे, अन्न प्रथमोत्पन्न आहे, अन्न हें औषध आहे.

"ज्येष्ठमन्नं भिषकस्मृतम्‍" असें उपनिषदाचें मत आहे. अन्नाची उत्पत्ति मेघापासून आहे. " अन्न पर्जन्यसंभव:" असें अथर्वशीर्षांत स्पष्ट सांगितलें आहे. गुरुमहाराज ! सूर्योपासना श्रेष्ठच तर. हो, वत्स ! ऐकलेंस ना ---

"सूर्ये तपत्या वरणाय दृष्टे: कल्पेत लोकस्य कथं तमिस्त्रा"
                            ऋग्वेद मं. १३.

आणि सांगतों, आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक शास्त्र सिद्धांतास, सूर्योपासनेसारखें अन्य साधन संमत नाहीं. हें सर्व आत्मज्ञानानेंच जाणलें पाहिजे. गुरुमहाराज, आत्मज्ञान म्हणजे काय ? वत्स ! आत्मज्ञान समजण्यास भारी दुर्घट आहे. आत्मज्ञानप्राप्तीस पुष्कळच विघ्नें येत असतात; दुराचरणी लोक सदाचरणी लोकांस मोहपाशांनीं अडकवून आत्मज्ञानाच्या सिद्धीस विघ्नें आणतात. गुरुमहाराज ? दुराचरणी लोकांची ओळख कशी पटावी ? वत्सा ! मैत्रायणीयोपनिषदाम्तील "ज्ञानोपसर्ग" पाठ बोल पाहूं. हा पहा गुरुमहाराज -

"मोह जालस्येव वै योनिर्यदा स्वर्गे:  -- मै. उ. ७-६.

पुरे, शुद्ध शब्दार्थ सांग पाहूं ? गुरुमहाराज ! अर्थ असा दिसतो " शूद्राचे शिष्य बनलेले, शूद्र असून शास्त्रें जाणणारे, दुष्टबुद्धि, जटाधारी, नट, भांडखोर, बहुरुपी अशा प्रकारचे दुष्ट प्राणी, जगांत पुष्कळ असतात, या नीच लोकांच्या संगतीस कधींच राहूं नये. हे स्वर्गगतीस अपात्र असतात." वत्स ! स्वल्पच भारी आहे. तात्पर्य

"भ्राम्यलोको न जानाति वेदविद्या ततंतुयात्‍" --- मै.उ.

असो. पण थोडक्यांतच सांगतों. जगांत खर्‍यापेक्षां खोट्याचा भरणा अधिक असतो, साधूंपेक्षां दुर्जन पुष्कळच असतात, ते अधोगतीस जातात, इतकेंच नाहीं, त्यांच्या संसर्गानें सज्जनदेखील पुष्कळदां मुक्त स्थितीस मुकत असतात. गुरुमहाराज ! अधोगतीला जाणार्‍या जीवांची सोय परमेश्वरानें कांहीच केली नाहीं कीं काय ? आणि या नीच कार्यरत प्राण्यांना कधींच मुक्ति मिळणार नाहीं की काय ? बाळांनो ! या सर्व गोष्टींचा उकल थोडक्यांत सांगून पुरा व्हावयाचा नाहीं. स्वानुभवावाचूंन ब्रह्मज्ञान पटावयाचें नाहीं, तत्वविज्ञानावांचून सत्व, आत्मत्व यांची ओळख पटणार नाहीं. गुरुमहाराज ! तत्वज्ञानांत पंचत्वांची धारणा असते ना ? वत्स ! जगाची उभारणीच जर पंचत्वांपासून झाली आहे, तर तत्वज्ञानांत त्याची धारणा असलीच पाहिजे. गुरुमहाराज ! बरीच आठवण झाली. विश्वाची उभारणी कशी झाली ? वत्सा ! असे प्रश्न मला भारीच आवडतात. ऐका -

पद (चाल - निर्धनतेनें लज्जा०)

ॐ ब्रह्मापासोनी झालें आकाशचि निश्चितीं । नभांतुनि होय वायुची गती ॥
पवनापासुने तेज निपजलें वन्हि जला उपजवी ॥
पृथ्वी, जलजाकृति भासवी ॥
भूमीपासुनि धान्य निपजतें अन्न मानवांप्रती ॥
जाववी, विश्वेशाची कृती ॥१॥

(चाल) या आकाशाला शब्द एक गुण असे ।
मारुतीं, शब्द स्पर्श दिसतसे ।
अग्नि रुप अधिक घेतसे ।
जल, पृथ्वी हीं रसगंधाची मूळ कारणें खरीं ।
बोलती शास्त्रांच्या वैखरी ॥२॥

गुरुमहाराज ! पृथ्वी ही पंचतत्वांतेल एक तत्वच तर. वत्स ! काय संशय ? सर्व वस्तूचें जनन, निधन पृथ्वींतच आहे. पृथ्वी ही अष्टमूर्ति परमेश्वराची एक मूर्ति आहे. हो, वेदांत पृथ्वीचें स्तवन भारीच केलें आहे. पण ...

वत्स ! पण, परंतु हे संदिग्ध शब्द, शुद्ध भाषेला बंद्ध करतात; संशय काय दिसतो तो स्पष्ट बोल. गुरुमहाराज ! संशय म्हणजे, छांदोग्योपनिषदांत, तेज, आप आणि पृथ्वी हीं तीनच सूक्ष्म मूलतत्वें, सृष्टि निर्माण होण्यास कारणीभूत महाभूतें तीनच मानून, त्रिवत्करणानें जगाची उत्पत्ति लावीत असत. आपल्या उपनिषदांतच नव्हे, वेदान्तसूत्रांतहि तसेंच आहे आणि आपले बादराणाचार्य, पंचतत्वांचें नांवहि घेत नाहींत. पण पुढें तैत्तिरीय संहिता, बृहदारण्य़क, गर्भोपनिषद्‍ या ग्रंथकारांनीं बराच श्रुतिशोध लावून पंचीकरण पद्धति जगांत लावून दिली आहे. गुरुमहाराज ! अशीं घोटाळ्याचीं बरीच स्थळें उपनिषदांत आहेत असें म्हणतात. छे ! वत्स, अज्ञान लोकांचें म्हणणें, उपहासास पात्र होणें, अशांतला प्रकार; उपनिषदांत घोटाळा, मग सारें जगच घोटाळ्यांत पडेल; धर्माचें सर्व रहस्य उपनिषदापासून आहे. सर्व जगांत उपनिषदांसारखे कल्याणकारक, उन्नतिदायक, तत्वसार ग्रंथ अन्य मिळणार नाहींत, बोल काय घोटाळा म्हणतात ? गुरुमहाराज ! छांदोग्योपनिषदांत, परब्रम्हास एकदां सत्‍ आणि एकदां असत्‍ अशीं परस्परविरोधी नांवे काय म्हणून दिलीं आहेत ? वत्स ! उपनिषदांचे महत्व तुमच्या लक्षांत सारखे आले नाही.

"यद्वेदाध्ययनं तथोपनिषदां योगस्थच यत: " ॥
तसेंच  "उपनीय तमात्मानं ब्रह्मा पास्त द्वयं यत: " ॥
निहंत्य विद्यां तज्जंच तस्मादुपनिषद्भवेत्‍ ॥

उपनिषदांचे श्रेष्ठत्व महान्‍ महान्‍ वेदवेत्या ऋषींनी भारीच वर्णन केलेलें आहे; वत्स, काय म्हटलेंस, परब्रह्मास सत्‍ असत्‍ अशीं नावें असतात ?

तैत्तिरीय संहिता पहा,
"विज्ञानंचविज्ञानंच सत्यचानृतंच"

याचा अर्थ पाहिलास म्हणजे सहजच विरोधाचा भ्रम उरणार नाहीं; ब्रह्म हें परमेश्वराचें मायामय विश्वच आहे. गुरुमहाराज ! हें लक्षांत येण्यास बराच अभ्यास केला पाहिजे. वत्स ! हें आधी गूढच भासतें, पण थोडासा अध्यात्मविद्येचा अभ्यास झाला म्हणजे अगदीं सुलभ दिसणार. गुरुमहाराज !अध्यात्मविद्या म्हणजे काय ? वत्स ! थोडक्यांतच सांगतों, सर्व विद्यांत अध्यात्मविद्या ही भारी श्रेष्ठ आहे. अध्यात्म विषयांत एकदां मन शिरलें म्हणजे ईश्वराचा ऋणानुबंध चटकन्‍ ध्यानांत येतो, जीवाच्या पुरषार्थाची नांगी सपशेल लुली पडते, आणि जीवाचें उत्तमांग जें मस्तक तें परमेश्वराच्या चरणावर सहजच नम्र होतें. गुरुमहाराज ! आत्मज्ञानानेच का मुक्तिलाभ होत असतो ? वत्स ! खरें म्हणता मुक्तिलाभास सत्याचीच कास धरली पाहिजे. " सत्यं वद" ही मूल श्रुतीची गति आहे, सत्यापरता धर्म नाहीं, सत्यापरतें कर्म नाहीं, सच्चिद्धन परमात्म्याचा ओढा सदा सर्वकाळ सत्याकडेसच असतो, हें निश्चित आहे.

"महाभूतानि सत्यानि यथात्मापि तथैवहि" (यज्ञवल्क्यस्मृति)

असो, बराच विस्तार झाला. आतां काय, कसचा पाठ ? गुरुमहाराज ! अग्निदेवतेचा स्तुतिपाठ. वत्स ! कालचा, अर्यमा देवतेचा स्तुतिपाठ पुरा झाला ना ? हो, पाठ झाला पण अर्थ उरला होता महाराज. मग, वत्सा ! अर्थावाचून पाठ व्यर्थ, हें नाहीं का लक्षांत ? बरें, आधीं अर्यमा देवतेचा पाठ बोल; आर्य लोकांनीं अर्यमा देवतेची स्तुति प्रतिदिनीं केलीच पाहिजे. बरें महाराज !

"ऋजुनीतिनो वरुणो मित्रो नयतु विद्वान । अर्यमा देवै: सजोषा: ॥
                                (ऋ.मं. १ सू. ९०)

पुरे, अर्थ बोल. पहा, गुरुमहाराज. " सर्वज्ञानी जे वरुण आणि मित्र ते आणि इतर देवांसहित अर्यमा हा आम्हांला सरळ नीतीचा मार्ग दाखवो" फार उत्तम. वत्स ! ह्या सूक्ताचा हेतु आला ना लक्षांत ? हो, गुरुमहाराज, पण, सरळ मार्ग दाखवणें म्हणजे काय ? हेंच तें, वत्सा ! अर्थाचें तथ्य चित्तांत बिंबलें तरच पाठाचे सार्थक. पहा, ईश्वरी कृपा आणि सन्मार्गदर्शन यांचे वर्णन ह्या सूक्तांत आहे. परमेश्वराच्या प्रसादावांचून अज्ञान लोकांस सन्मार्ग म्हणजे मुक्तिमार्गाचा लाभ होणार नाहीं, हेंच ह्या स्तुतीचें गुह्य तत्व आहे. बरें, होऊं द्या पुढचा पाठ. पहा, गुरुमहाराज -

"आंगिरसो विरुप: - इमे विप्रस्य वेधस: अग्नेर अस्तृत यज्वन: । गिर: स्तोमास ईरते ॥१॥
                                                - ऋ. मं. ८-४३.
पुरे, अर्थ होऊं द्या. शब्दार्थापेक्षां लक्ष्यार्थ लक्षांत आणला पाहिजे. पहा गुरुमहाराज - "ज्ञानरुप सत्कर्माचा विधाता आणि भक्तांच्या यज्ञयागांचा कधींहि उच्छेद होऊं न देणारा जो अग्नि, त्याचीं स्तोत्रें माझी वाणी उच्चारीत असते." फार सरस; पण वत्सा ! मूळ शब्द अगदी गाळलास. होय, महाराज, "विरुप म्हणजे रुपहीन आंगिरस मुनि."  हेंच ते वत्स ! आंगिरस मुनीला विद्रूप ठरवलेंस ? नाहीं महाराज; पण विरुप शब्दाचा आणखी अर्थ कसा होतो ? विरुप म्हणजे रुपहीन, कुरुप असा शब्दार्थ लावतात ना ? वत्स ! विरुप नामक देश तूं ऐकला नाहींस का ? हो, हो, आर्यावर्ताच्या वायव्य दिशेकडे, उत्तर वृत्ताजवळ विरुप नांवाचा, थंड हवेचा देश आहे; असें का ? मग, विरुप देशांत वास करणारा आंगिरस मुनि, असा अर्थ असेलसा दिसतो; पण - वत्स ! इतकेंहि समजून, पण हें आहेच ? तसें नाहीं, गुरुमहाराज ! विरुप देशांत जाण्यास, काश्यप समुद्र , काकुत्स पर्वत वगैरे मध्यें आहेत ना ? मग ते ऋषि तिकडे कसे गेले ? वत्स ! विरुपदेश झाला तरी भूमंडळावरचाच कीं नाहीं ? स्वर्ग पाताळांत गमन करणारे ऋषि यांस समुद्रोल्लंघन अवघड होईल असें वाटतें का ? जलावर, वायुमंडळावर फिरणें, हीं योगसिद्धीची लक्षणें आहेत. गुरुमहाराज ! अशी ही योगसिद्धि अगम्यच तर. वत्स ! योगाची महति जितकी वर्णन करावी तितकी थोडीच होणार आहे. योगशास्त्रावर महान्‍ महान्‍ कवींनीं बरींच वर्णनपर काव्यें रचलेंलीं आहेत, तरी तीं अगदीं थोडींच दिसतात. पहा-

"अन्योन्यशोभा परि वृद्ध येवां योगस्तडित्तोयदयोरिवास्तु"

आणि काय सांगूं.

"वार्धक्ये मुनिवृत्तीनां योगेनां ते तनु त्यजाम्‍"

गुरुमहाराज ! योगसिद्धीनें रोगांचा नाश होतो असें म्हणतात,

" योगद्रोगविनाशन"

वत्स ! अगदीं बरोबर, योगशास्त्राचें नांव घेताच मनोवृत्य्ति उल्हसित होतात; तरी पण थोडक्यांतच सांगतों; मानवी देहांतल्या अत्यंत सुप्त पण अतिशय अद्‍भुत व प्रचंड अशा शक्ति जागृत करुन त्यांच्याकरवीं, " कर्तुम्‍, अकर्तुम्‍, अन्यथा कर्तुम्‍" असें असाधारण सामर्थ्य आंगीं आणावयाचें, आणि त्रिकालज्ञानित्व, अजरत्व, अरोगित्व व अंतीं मोक्षप्रद प्राप्त करुन घ्यावयाचें, अशासाठीं योगशास्त्राचा उदय आहे. गुरुमहाराज ! योगाभ्यास हा एक व्यायामच म्हणतात ना ? वत्स ! प्रातस्नान, सूर्योपासना, प्राणायाम - पर्याय आणि यौगिक व्यायाम यांनीं भयंकर असे असाध्य रोगी रोगमुक्त होत असतात. यौगिक व्यायाम हा सर्वोत्कृष्ट व सर्वांगीण व्यायाम आहे. बरें, पण गुरुमहाराज ! अर्यमादेवतांच्या स्तुतींत सन्मार्गदर्शन असें म्हटलें, त्याचा अर्थ काय ? वत्स ! सन्मार्ग म्हणजे पुण्यमार्ग, हें काय सांगितलें पाहिजे ? मोक्षमार्गाचें दर्शन अर्थात्‍ मुक्तिलाभ होण्यास परमेश्वराची कृपा पाहिजेच, कारण ईश्वरी सत्तेवाचूंन अग्निदेवतेच्यानेंहि तृणाची काडीदेखील जाळवत नाहीं. पहा,

" तस्मिंस्त्वयि किं वीर्यमित्यपीदं सर्व दहेयम्‍ ।
यदिदं पृथ्वि व्यापिति"
                        -- केनोपनिषद्‍ ३ -४ ३
गुरुमहाराज ! सन्मार्ग या शब्दाची शुद्ध व्याख्या आमच्या चित्तांत सरळ भरत नाहीं, क्षमा असावी. वत्स ! तुझ्या प्रश्नांचा मला राग येत नाहीं. याकरतां आधीं पातंजल योगशास्त्राचा अभ्यास झाला पाहिजे; प्रकृति, निवृत्ति यांची व्युत्पत्ति लागली पाहिजे. तात्पर्य, स्वल्पांतच सांगावयाचें म्हणजे जो विषय सत्‍ असत्‍ बुद्धीबरोबर, हृदयस्थ आत्म्याला भिडून जातो तो खरा मार्ग होय; आर्य तत्वज्ञानाचा बोध झाला म्हणजे, हें सारें करतलामलकाप्रमाणें तुझ्या चित्तांत खेळत राहील. गुरुमहाराज ! आर्य तत्वज्ञानांत काय आहे ? वत्स ! तुझ्या वयोमानाप्रमाणें हे प्रश्न भारीच आनंद देतात. पहा, आर्य लोकांचे तत्वज्ञान मानवी जीवनांतील सत्य, सौंदर्य व प्रगति. प्रियता यांच्यावर मुख्यत: अधिष्ठित आहे; तत्वज्ञानावांचून महान्‍ महान्‍ यज्ञांचा, कर्माचा अध:पात होत असतो; बरें, हें सारें तुला थोड्या उपनिषदांचे वाचन झालें म्हणजे, सहजासहजीं समजूं लागणार आहे. गुरुमहाराज ! कर्म म्हणजे काय ? वत्स ! एकाच हातांत किती पात्रें घेशील ? कर्म शब्दाची व्याख्या भारी व्यापक आहे. ज्ञान आणि कर्म, धर्म आणि कर्म, व्याकरणशास्त्रांत कर्म, ज्योतिषशास्त्रांतहि भाग्यस्थान हें कर्मालाच गणलें आहे. गुरुमहाराज ! योग मात्र कर्माहून निराळा असतो का ? उत्तम प्रश्न; वत्स ! कुशलतेने केलेल्या कर्मास योग असें म्हणतात. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, हे मोक्षाचे विशिष्ट मार्ग आहेत. ग्रुरुमहाराज ! भक्ति ही योगसिद्धीच तर. वत्स ! काय विचारतोस ? ही भक्ती सारखें मुक्तिलाभास अन्य साधनच नाहीं. भक्ति, श्रद्धा ही सर्व कर्मांशीं समरस झालेली असलीच पाहिजे. परमेश्वरास भक्तीसारखें प्रियकर दुसरें कार्यच नाहीं. एकच प्रश्न, महाराज, ज्ञानप्राप्ति झाल्यावरहि कर्म केलेंच पाहिजे असें म्हणतात तें कसें ? वत्स ! तुझ्या प्रश्नाचा मला उबग येत नाहीं. ज्ञान म्हणजे काय हेंच आधीं ध्यानांत आले पाहिजे. आत्मज्ञान, अध्यात्मज्ञान का शाब्दिक ज्ञान ? मनुष्यलोक, जन्मापासून प्राणोत्क्रमणापर्यंत कर्मानें बांधलेलाच आहे; मग मग कर्म सोडणें, करणें, ओढणें, तोडणें कोणाच्या हातांत असणार ? उगीच आपलें भाषाज्ञान दाखविण्याकरतां शब्दांचे तारे तोडतात. ब्रह्मज्ञान कांही लेंकराच्या गोष्टीसारखें नाहीं. याला जाडा अभ्यास, सद्‍गुरुचा उपदेशलाभ झाला पाहिजे. तुझा वेदपाठ झाला म्हणजे याचा उलगडा करुन देऊं. बरें, बोल आणखी कांही संशय असेल तर. गुरुमहाराज ! कर्म करणें हा अधिकार आहे, केवळ कर्तव्य म्हणूनच कर्म करावें, फळाची इच्छा धरुं नये असें म्हणतात तें कसें ? बाळांनो ! कर्तव्य म्हणजेच कर्म, कर्म करणें हा अधिकार आहे, बरोबर. पण अधिकाराला आधार पाहिजे कीं नाहीं ; भोजन करणे कर्तव्यकर्म, साध्या भाषेंतच सांगतों, फळाची आशा धरुं नये; औषध घेणें कर्तव्य म्हणून, रोग जावो अथवा राहो, ही फलाशा नव्हे कीं काय ? निर्हेतुक कर्म करणार तरी कशास ? मग तें कर्म स्वार्थी असो वा परार्थी असो, साध्य असो किंवा असाध्य असो, फळाची आशा सोडून आंब्याच्या झाडावर दगड काय म्हणून मारावयाचे; नुसता वाद घेऊन लोकांस भ्रमांत घालतात आणि आपण श्रमांत पडतात इतकेंच. कौडिण्य, बोल, कांही मनांत दिसतें तें. गुरुमहाराज ! ऐतरेय ब्राह्मणांत

"साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं पारमेष्टयं राज्यं".

असें म्हटले आहे तें काय ?

फार सरस. बाळांनो, सर्व राज्यसंघटनेची हीं व्याख्यात्मक नांवे आहेत, सर्व राज्यव्यवस्थेंत स्वराज्य ही, विद्वान समंजस लोकांची राज्यव्यवस्था आहे. पण, महाराज्यं आणि पारमेष्ट्यं राज्यं हें काय ?
वत्स ! ऋग्वेदांत स्वराज्यसूक्त आहे तें बोल. पहा, महाराज -

"आयद वामीय चक्षसा मित्र वयंच सुरय: ।
व्यचिष्टे बहुपाथ्ये यत्तेमहि स्वराज्ये ।"        --- ऋ.मं.५-६६-६.

अर्थ बोल. गुरुमहाराज, " मित्रभावानें वागणार्‍या वैमनस्यहीन सज्जनांनो, तसेंच विशाल दृष्टीच्या सुज्ञ लोकांनो, तुम्ही आम्ही सर्व विद्वान मिळून, व्यापक आणि ज्याच्या रक्षणाला अनेक लोकांच्या सहाय्याची अपेक्षा आहे अशा स्वराज्याची व्यवस्था उत्तम करण्याकरतां सर्व प्रकारें यत्न करुं." पण महाराज, स्वराज्यव्यवस्था ती कशी करतात ? वत्स ! सर्व प्रजा मिळून उत्तम पुरुषाची योजना करतात, आणि त्याला लोकाध्यक्ष असें म्हणतात. तो राजापेक्षां श्रेष्ठ मानतात. कौडिण्य ! महाराज्य आणि पारमेष्टी राज्य यांपेक्षां स्वराज्य हें श्रेष्ठ आहे; बरें, पण माध्यान्हसंध्येचा वेळ झाला ना ? हो, कांहीच कळलें नाहीं.

पद (विराटवदना० या चालीवर)

ग्रहमालेचा मध्य सूर्य हा नभमध्यावरि बघ दिसतो ।
सहस्त्र किरणें पसरुनि जगतीं संतापाला निपजवितो ॥
संध्यावंदनकार्यी रतले विप्र किती हे शांतमती ।
अर्ध्यप्रदाना करिती भावें निष्ठा धरुनी शुद्ध रिती ॥
नक्षत्रांसह शशि हा भासेसागरउदरीं की बसला ।
गिरिगुहांतरीं स्थान मागुनी अंधकार हा जणुं लपला ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP