आर्या (भीति)
अंधारी दीप तसा दावी जगतास चालण्या धर्म ।
विश्वेश्वर तो देओ, सकलां सद् बुद्धिमार्ग सत्कर्म ॥१॥
महातपोनिधि दधीचि मुनींचे अमोघ वीर्य, सरस्वती नदींत पतन पावलें, त्यापासून तेजोमान् सारस्वत नामक पुत्राचा प्रसव झाला, सरस्वतीनें त्यास आणून त्या मुनीच्या पायावर घातला, सर्व वृत्त श्रवण करुन दधीचि मुनीचें मन प्रसन्न झालें, त्यांनी सारस्वताचें मस्तक अवघ्राण केलें, त्या वेळीं सार्या तपोवनांत आनंदाचें नंदनवन भासूं लागलें. पशु, पक्षी, मच्छ, कच्छ यांचे तर मनमोहन करणारें प्रदर्शन शोभूं लागलें, उपनयन संस्कार झाला, तेव्हां स्वाहा स्वधाकार, साकार रुपानें घोळूं लागले, सरस्वतीच्या तीरावर ऋषींचा प्रचंड समुदाय लोटला, त्यांच्या आशीर्वादानें दाही दिशा दुमदुमुन गेल्या, स्वर्गस्थ देवतांनीं पुष्पवृष्टी केली, तेव्हां सृष्टीचा भाग आनंदसागरांत ओथंबूं लागला ! गगनप्रदेश विमानानीं भरलेला तारकापुंजच भासूं लागला; दधीचि मुनीच्या उपदेशांत श्रुति, स्मृति,मूर्तिमंत खेळूं लागल्या, सरस्वती नदीला आनंदाची भरती चढतीच होऊं लागली. झालें -
साकी
दधीचि मुनिनें देवऋषींच्या विनयाला लक्ष्योनी ।
स्वर्गारोहण केलें नियमें ऋणत्रया फेडोनी ।
गाती जन कीर्ती । रमली आनंदें जगती ॥१॥
परंतु -
दिंडी
रवीमागुनि पसरतो अंधकार ।
सुखामागुनि करि दु:ख जगिं प्रसार ॥
जना येतें वार्धक्य यौवनान्तीं ।
विश्वकर्त्याची हीच सतत रीती ॥१॥
सरस्वतीच्या भूप्रदेशांत, मेघराजाची दृष्टि उग्र होऊन अनावृष्टि झाल्याने सृष्टिदेवी महान् कष्टी भासूं लागली. दुष्काळ कालाचें विक्राळ स्वरुप पाहून लोकांचा हुरुप होरपळून गेला; धान्योत्पत्तीचा नाश झाल्यानें जनमनोवृत्तीचा आशातंतु तुटून गेला; जलाशय कोरडे पडले, मच्छकच्छ फडफडले, लतावल्लरी कोमेजून गेल्या, दाहीदिशा भयंकर भासूं लागल्या, धर्मकर्म लोपून गेलें, श्रुतिस्मृतीची विस्मृति पडली. अशा वेळीं, सरस्वती तीरावर महान् तेजोमान् एक ऋषिपुत्र संध्यावंदनास बसलेला दिसूं लागला; तो आपल्याशींच बोलूं लागला: - आतां कसे करावें, परमेष्टीच्या क्रूर दृष्टीनें अनावृष्टि होऊन, सृष्टिदेवि महान् कष्टी भासूं लागली, दुष्काळ कालानें घालां घालून जगताचा घात केला; जीवजंतूंचें जीवन तर जलाशयानीं सोडून दिलें, लतावेलींना अंतसमयाच्या अक्षता मिळाल्या, वातावरण क्षुब्ध झाल्यानें, प्रबुद्ध शास्त्रवेत्ते क्षुधाबद्ध झाले, धर्ममार्गानें चालणारा ब्राह्मणवर्ग स्वर्गवासाची इच्छा करुं लागला; स्नानसंध्याचरण तर संध्याकाळच्या अंधकाराप्रमाणें अंधुक अंध भासूं लागले, आर्यधर्माचें देहावसान झाल्यावर कर्ममार्गानें सहगमन करणें सहजच भाग पडलें. श्रुतिस्मृतिची विस्मृति पडत गलीनीतिची भीति सुटली, भक्तीची आसक्ति फिटली, आतां कसें करावें -
पद (मम सुत भरत०)
बाळें उपवासें रडती । माता शोकें गहिंवरती ॥
पतींना नारी शिणवीती । घेरी येउनि किती पडती ॥
आधिव्याधि जडलि चित्तीं । न सुचे मुळींच सद्युक्ती ॥
सुज्ञहि झाले भ्रंशमती ॥१॥
हाय ! हाय ! वेदवेत्ते ब्राह्मण, देव धर्म सोडून देशांतर करुं लागले, यज्ञ यागादि क्रिया बंद पडून देहविक्रयाची इच्छा प्रादुर्भूत झाली; भूदेव म्हणणारे ब्राह्मण, सेवा करण्यास सरसावले, आहाराचें साधन नसल्यानें संसाराचे व्यवहार निराधार होऊन बसले, प्रपंचाची वंचना झाल्यानें याचनेची यातना अनावर झाली, गाईना चारा न मिळाल्यानें याचनेची यातना अनावर झाली, गाईंना चारा न मिळाल्यानें दुधाच्या धारा बुझून गेल्या, तान्ही पाडसें घसे कोरडे पडून, उसासे टांकून पटापट प्राण सोडूं लागलीं, हाय ! दात्यांची घरें दारिद्र्यानें भरुन गेलीं, वाण्याच्या घरांत दाणा नसल्यानें प्राण हैराण होऊं लागले, आतां कसें करावें ? परमेश्वरा ! हलाहल विषाचे दाह सहन करवतील पण माझ्या देशबांधवांचे हाल माझ्य़ानें सहन करवणार नाहींत. आतां, एकच उपाय. माते जननी !
पद (धांव धांव पाव०)
देईं तव उदरिं ठाव श्रीसरस्वती ।
दुष्काळें जन पिडती । उपवासें हळहळती ।
प्राणाची नच प्रीती । किमपी मजप्रती ॥१॥
बंधुजनीं बघुनि त्रास । शांतीचा होय र्हास ।
दिसतो कीं जिव उदास । भ्रमत मन्मती ॥२
हं ! हं ! हं ! बाळा ! काय हें साहस आरंभलेस, मानव जन्म भारी दुर्लभ, त्यांत ब्राह्मण; लोकवंद्य दधीचि मुनीपासून तुझा जन्म; तुझ्या पासून वेदरक्षण, धर्मशिक्षण होणार हें ऋषींचे भाकित, आणि तूं प्राणत्यागासारखें महापातक पदरीं बांधतोस का ? माते, जननी ! आत्महत्या महापातक, मोक्षाला विघातक, हें मला पूर्ण ज्ञान आहे; पण काय करुं ? माझ्या देशबांधवाचे, धर्म बांधवांचे हाल, मला हालाहाल विषाप्रमाणें हाय हाय करण्यास लावीत आहेत. देवी ! तूंच ना पाहतेस -
साकी.
मेघ न वर्षे उग्र जाहला जनक यमाचा तरणी ।
काळासम हा दुष्काळाचे कां दुर्घट ईश्वर करणी ॥
हळहळ ही वाटे । दु:खानल हा मनि पेटे ॥१॥
मातोश्री ! काय सांगू ? ही पर्वताची ओळ फळपुष्पांनीं मंडित, लतावृक्षांनीं विभूषित, हिरवी शालजोडी पांघरलेल्या ऋषीप्रमाणे शोभावयाची, ती दावाग्नीनें होरपळलेल्या स्मशानभूमीप्रमाणे रखरखीत भासत आहे; आणि पहा:-
साकी
अभंग जीवनमंडित असती तलाव सुंदर कमलें ।
गुंजारव भ्रमरांचे झाले अस्तंगत हे सगळे ॥
मुंग्या ह्या चलती । दुर्बल, मकर मीन तडफडती ॥१॥
आणि पहा : -
साकी.
दीन दशा ही होय जनांची ठाव न धर्मा उरला ।
कर्ममार्ग तो लुप्त पाहुनी मदिय जीव हुरहुरला ॥
आशा जीवाची । नुरली पूर्ण मला साची ॥१॥
बाळा ! सारें खरें, जगन्नियंत्याच्या इच्छेप्रमाणें अशा गोष्टी कधीं कधीं घडत असतात, त्याबद्दल खेद मानणें, हताश होणें हें पुरुषार्थाचें लक्षण नाहीं ! तुझ्यासारखे स्थितप्रज्ञ, अशा परमेश्वरी आपत्तीचें दु:ख मानीत नाहींत, सुज्ञ लोक पुढल्या आशेवर संकटावस्थेत धीर धरतात; जननी ! पृथ्वीवर असे दुष्काळ पडत असतातच तर, मग याला कांहीं उपाय, शोध नाहींच काय ? बाळा !
दिंडी.
अश्वमेधासम यज्ञ करुनि पाहीं ।
पृथ्विपति ते पाडिती मेघ कांहीं ॥
म्हणति यज्ञा पासोनि घनोत्पत्ती ।
जलापासुनि हे अवनि धान्यदाती ॥१॥
बाळा ! आतां धीर धरुन, लोककल्याणाकरतां पर्जन्योत्पादक यज्ञ कर. जननी ! माझ्या हातून यज्ञ कसा होईल ? यज्ञयाग पृथ्वीपतीच्या आश्रयानेंचे व्हावयाचे. बाळा ! सर्व यज्ञांत जपयज्ञ श्रेष्ठ आहे, म्हणून ‘जपयज्ञात्द्विजातय:’ असें श्रेष्ठ स्मृतिकारांचे मत आहे. मातोश्री ! तुझी आज्ञा मला शिरसावंद्य आहे. पण, जननी ! अन्नावांचून माझे प्राण कसे वांचतील ? बाळा ! भिऊं नकोस:
साकी
आणुनि देतें एक एक तुज मच्छ नित्य भक्षाया ।
यज्ञकर्म तूं आचरीं नियमें विहित धर्म रक्षाया ॥१॥
जननी ! काय, काय तुझा हा मला उपदेश !
पद [मज बोध करीं०]
ब्राह्मण मी ऋषिकुमार लोक वानिती ।
धर्मविहित कर्म कसें आचरूं क्षिति ।
पाप महा जिवहिंसा बोलती श्रुती ।
प्राणान्तीं नच सोडिन शास्त्रसंगती ॥१॥
बाळ ! धर्माची गति भारी सूक्ष्म आहे, हिंसा अहिंसा यांचें ज्ञान वृद्धोपासना, स्वानुभव यांपासून प्राप्त झालें पाहिजे; जीवांचें जीवन जीवांवरच अवलंबून आहे. " जीवोजीवस्य जीवन:" असें सह शास्त्रकारांचें मत आहे ...... मातोश्री ! तूं कांही माझें मन पाहण्याकरतांच असा उपदेश करीत आहेस: तूं कितीहि सांगितलें तरी माझ्याकडून हिंसाकर्म प्राणान्तींहि घडणार नाहीं; ब्राह्मणधर्म म्हणजे मुख्य अहिंसा, तो सोडल्यास पतित ब्राह्मणांच्या पंक्तीस तरी मी बसेन का ग ? जननी ! सत्य सांगतों, मला देहाची मुळींच माया नाहीं, जीविताची आशा नाहीं, मरणाची पर्वा नाहीं; पण तुझ्या आज्ञेप्रमाणें, केवळ लोककल्याणाकरतां, धर्म संभाळण्याकरतां, देहरक्षणाकरतां, यज्ञकर्म करीत राहीन; पण हिंसेपेक्षां अपकीर्ति मला भारीच जाचक आहे. बाळ ! शाबास, अपकीर्तीपेक्षां, संभावित लोकांस मरणच पुरवतें, हें तुझे वाक्य मला भारीच आवडत आहे,
"संभावितस्यचा कीर्तिर्मरणादतरिच्यते"
असें सुज्ञ जनाचें मत आहे, पण या गोष्टींत तुझी अपकीर्ति होणार नसून सत्कीर्तीच गाजून राहील. जननी ! अधर्माचरणांत सत्कीर्ति कशी ग राहील ? बाळा ! तसें नाहीं, आणि सर्व शास्त्रांत :-
"जीवितं मरणात्श्रेयो जीवन्धर्म मवाप्नुयात् ।"
असा सिद्धांत प्रतिपादन केला आहे. जननी ! त्वां कितीहि सांगितलें तरी, खरे ब्राह्मण प्राणांन्तींहि हिंसाकर्म करणार नाहींत. बाळ ! अशाच दुष्काळासारख्या घोर प्रसंगीं, विश्वामित्र, अजिगर्त, वामदेव या महानुभाव ऋषींनी पशुमांस भक्षण करुन वेद रक्षण केलेले पुराणग्रंथांत आहे. माझा उपदेश, तुझ्या देशबंधूंच्या हिताकरतां आहे, केवळ रसनेच्या गोडीकरतां तूं मच्छ भक्षण करणार नाहींस, धर्मरक्षणार्थ हिंसाकर्म केल्यास तुला किमपीच दोष लागणार नाहीं, आणि " सर्व लोक हितेरत: " अशी तुझी अखंड कीर्ति सार्या भरतखंडांत गाजून राहील. मातोश्री ! अगदीं यथार्थ, थोड्याच काळांत, यथाकाल मेघवृष्टि होऊन सर्व सृष्टि पूर्वस्मृतिप्रद होईल. जननी ! आपल्या आज्ञेबाहेर माझ्यानें जाववत नाहीं. पण ... हाय ! भयंकर संकट माझ्यानें सांगवलेच नाहीं. पण--- हाय ! भयंकर संकट माझ्यानें सांगवलेंच नाहीं. बाळ ! आणखी काय संकट ? आपल्या जपयज्ञानें पुनश्च धर्माचें संस्थापन होईल, सृष्टि समृद्ध होईल, यज्ञकर्मे चालू होतील, आणखी काय पाहिजे ? या भयंकर दुष्काळाच्या काळांत, दस्यु, यवन, म्लेंच्छ या लोकांनीं पुष्कळ लोकांस आपल्या धर्मांत ओढलें; केवळ प्राणाच्या आशेनें, जिव्हेच्या लालसेने आपल्या आर्य लोकांनी धर्मांतर् केले आणि असाच क्रम चालल्यास, सनातन धर्माचें नांवच या जगांत राहणार नाहीं. मग वेदांचें स्मरण तरी कोणास होईल ? बाळ ! यवन लोक भारी पापिष्ट आणि मूर्खच तर .... मातोश्री ! या म्लेंच्छ, यवन लोकांनीं, किती ग आर्य स्त्रियांवर बलात्कार केला, आर्य देवालयांचा विध्वंस केला, मूर्तिभंग केला, अभक्ष भक्षण करण्यास लावलें ? आणि आतां या दुष्काळाच्या काळांत त्यांना भारींच फावलें, -- जननी ! काय सांगूं. हेच आर्य ब्राह्मण, धर्मांतर केल्यावर, म्लेंच्छ धर्माभिमानी होतात, आणि आर्य लोकांचा-आपल्या बांधवांचा छळ करतात, आपण होऊन इतर लोकांस धर्मांतर करण्यास लावतात याला कांहीच उपाय असणार नाहीं ? बाळा ! अगदीं भिऊं नकोस, सर्व स्थिरस्थावर झाल्यावर, परधर्मांत गेलेले लोक पुन: आर्य धर्मांत मीलन होतील, धर्मवृद्धि करतील. जननी ! परधर्मात गेलेले परत आर्य धर्मात कसे ग येतील ? मेलेला मनुष्य अमृत संजिवनीनें जिवंत होईल, पण धर्मबाह्य झालेला अभक्ष भक्षण केलेला, आर्य धर्मांत परत येणें म्हणजे गंगेचा ओघ फिरुन शंकराच्या जटेंत वर चढण्याइतकें आहे, असे म्हणतात ना ? बाळ अगदीं चिंता करु नकोस, पतितपरावर्तन, धर्मशास्त्रशुद्ध आहे, आर्य लोक बुद्धिमान आहेत, प्रत्येक दोषास प्राय:श्चित्त हें आहेच, याबद्दल पुराणांत पुष्कळ पुरावे आहेत, याचा उलगडा मी यथाकाळीं करुन देईन. जननी ! पतित परावर्तनाबद्दल पुराणांत पुरावा आहे ना ? बाळ ! अगदीं यथार्थ; आतां तूं माझ्या उपदेशाप्रमाणें वागलास ह्मणजे सर्व देशांत शांतता नांदून तूं आनंदांत राहशील, हा माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे. अहाहा ! जननी सरस्वतीच्या पुण्यकारक दर्शनानें माझा आत्मा किती प्रसन्न झाला हें सांगतां येईना. आतां -
पद (झंपा)
नमो भास्करा शुभकरा विप्राणा । दैत्यतमनाशना पाप शमना ॥१॥
वर्षुनी मेघजल । शित करिं भूमितल ।
धर्मरक्षण जनीं वेद विहिता । आधि व्याधितती ।
नाशुनी संप्रती । नीति भक्तीरती । देइं सुजना ॥२॥