ज्याला आदि न अंत मध्य, भरला, जो निर्विकारी स्वयें ।
माया षड्रिपुवेष्टिता विलसते, तो खेळवी निश्चयें ॥
विश्वात्मा जगता भरोनि उरला नामारुपावेगळा ।
रक्षो तो जगदीश ताप हरुनी सर्वांस जो आगळा ॥१॥
आतां कसें करावें ? या अलंबुषा देवीबरोबर आलें; सारा आर्यावर्त हिंडले फिरलें, घमेंडीचे बोल बोललें; देवीला चकित केलें, आणि आतां आलें ताळ्यावर. काय तो महात्मा ऋषि ! खरोखर त्याच्या तपस्तेजानें देवेंद्राचें सिंहासन डळमळूं लागलें म्हणतात तें यथार्थ आहे. काय त्याचे ते डोळे ! इतका वयोवृद्ध तापसी, पण कान्ति किती प्रखर ! माझ्यानें तर त्याजवळ, नव्हे, आश्रमाच्या आसपासदेखील जाववत नाहीं. काय पहा; मी जातें पण पायच मागें सरतात, आतां अलंबुषादेवीला सांगावें तरी काय ? देवी चिंतानदींत अगदीं बुडूनच आहे. निद्रा नाही, अन्न नाही; मला तरी हें काय माहीत ? देवेंद्रांनीं जा म्हटलें, आलें; आम्हां अप्सरांना प्रवासाची तर भारीच हौस ...
पण अलंबुषा काय म्हणते, त्या ऋषीच्या आश्रमांत मी आधीं जावें तें कां ? यश लाभलें, तर महेंद्राचें सिंहासन अचल उरलें; रत्नखचित पदक पडलें अलंबुषेच्या गळ्यांत. आणि ऋषीच्या शापाग्नींत भस्म झाली तर मेली बिचारी वैजयंती .... नाहीं. मी तशी कमी बुद्धीची नाहीं. आणि माझें कर्तव्य तरी काय ?
पद (चाल-नृपममता रामा०)
देवीला साह्य करावें । बुद्धीला सांगत जावें ॥ हें खरें.
देवेंद्र सांगती मजला । नच सोडिं कधा देवीला ॥ हें बरें.
युक्तीनें जरा जिंकावें । देहाला नच दुखवावें ॥ हें खरें.
कासया, जाउं मी तया, स्थानिं निमिमया,
व्यर्थ चालावें, जीविता पाणि सोडावें ॥१॥
आणि पहा, ते ऋषि साधारण मनुष्याप्रमाणे नाहींत.
पद ( चाल सदर )
लोहाचें पिष्ट करोनी । भक्षिति कां निज हस्तांनीं ॥ बघ कसे
अग्नीची कुंडें करिती । सुखशांत त्यांमध्यें बसती । तर कसे
पायाला वरती करिती । भूमीस मस्तका धरिती । वर तसे
ज्यांप्रती नाहीं तनुप्रिति, श्वास कोंडिती,
निश्चला स्वमनीं, कालही जयां बहु मानी ॥२॥
ते ऋषि म्हणजे लोहभस्म भक्षून लोहस्तंभ झालेले, त्यांवर आम्हां अप्सरांचे कांटे कसे रुततील ? ... आतां युक्ति तरी कसली योजावी ? अलंबुषादेवीची सारी भिस्त त्या मदनावर, पण तो अधोवदन; त्या ऋषीचें दर्शनच घेण्यास धजत नाहीं. अनंगाला धृति आणि भीति या पाठीपुढें ओढणें घेतच असतात .... ही पहा अलंबुषा, तापसीप्रमाणें फिरत फिरत इकडेसच येत आहे. तिला सांगावे तरी काय ? तिला भिववूनहि उपयोगाचें नाहीं. धीर सो खंबीर ... देवी ! इतक्यांतच कशाला गं आलीस ? मी नाहीं का सांगितलें, स्वस्थ सरस्वती नदींत सुखशांत जलविहार करीत रहा म्हणून. वैजयंती ! शाबास. सोबतीण असावी तर अशीच असावी. महेंद्रांनीं सांगितलेंच होतें; वैजयंती बरोबर असली म्हणजे पंचाइतीची गोष्टच नको म्हणून. बरं, सांग आधीं, ते ऋषि तुला काय म्हणाले ? देवी ! काय ग लावलीस त्या ऋषीची मिजास ? त्या ऋशीपेक्षां कृषिवलांस मी भारीच मान देतें. वैजयंती ! मान नको देऊं. आम्हांला अपमान होऊन मान खालीं घालण्याचा प्रसंग येऊं नये म्हणून म्हणतें; तूं त्या ऋषींना भेटून नटून काय बोललीस तें सांग. ते ऋषि तुझ्याशीं कसे वागले, काय बोलले, हें मला कळलें पाहिजे. देवी ! बोलणें, नटणें, हसणें, मुरडणें हीं कोणाशीं ?
साकी
पशुसम ऋषि ते कोठें आम्ही राजविलासी बाला ।
रुप गुण यौवन सम नसतां काय करावा चाळा ॥
तारा चंद्राला । रुचति न अन्या देवाला ॥१॥
वैजयंती ! हेंच का तुझें, येऊन जाऊन बार्हस्पत्यच ऐकावें ? त्या ऋषीपाशीं जाऊन त्यांच्याशी विचारपूस करुन येण्यास तुला नाहीं का सांगीतलें ? त्या ऋषीचें राहणें, विहरणें कसें काय असतें, हें लक्षांत घेण्यास तूं लक्षणवान् आहेस, तुझें लक्ष लक्षांत भारी आहे; अग, अशा व्यवहारांत कोणासहि मध्यस्थाची गरज असतेच. (स्वगत) मी ऋषीपाशी, जावें, आणि शापाग्नीत भस्म होऊन यावें, आपला जीव म्हणजे सदाशिव. (प्रकट) देवी ! काय ग बोलतेस ? स्त्रियांच्या प्राप्तींत पुरुषांनीं मध्यस्थी केली पाहिजे, आणि या मध्यस्थींत व्यवस्थित स्त्रियाच पाहिजेत; तरुण तरूणीच्या मध्यस्थीत वृद्धा नारी पतिव्रताचा भारीच सुळसुळाट असतो; आम्हां स्त्रियांना ग काय वृद्ध वृद्ध पुरुष मध्यस्थीला आणावे लागतात ? आमचे मध्यस्थ आम्हांकडेसच असतात. ते ग कोण ? वैजयंती ! मी मात्र सार्या जन्मांत मध्यस्थ-मध्यस्थीच्या फंदांत पडलें नाहीं. हेंच तें, मी तरी काय म्हणतें ? तू जात्या एकाच देवरायाशीं रममाण झालीस; त्यांत मध्यस्थीचा बाणा तो कसा कळणार, आणि अनुभवाचा शहाणपणा तो कसला येणार ? मोठ्या राजधानींत असलें तरी खेड्यापाड्यांतसुद्धां पर्यटन केलेंच पाहिजे. बहुत विष, अनेक देश पाहिल्यावांचून चातुर्याचा लेश मिळत नसतो. देवी ! अशन, शयन, वसन, यांत नेहमीं फेरबदल झालाच पाहिजे असें अश्विनोदेव सांगतात कीं नाहीं ? वैजयंती ! तूं तशी अनुभवी शहाणी आहेस खरी, तर सांग पाहूं, आतां त्या ऋषीशीं कसें वागावें ? देवी ! देवादिकांविशयीं माझा अनुभव कसा आहे हें तुला नाहीं का ठाऊक ?
साकी
मदिय रुपयौवना पाहुनी तल्लिन त्या देवांनी ।
सविनय विनती करितां त्यांना न बघावें ढुंकोनी ॥
चित्तीं प्रेम जरी असलें । वरती दाखवीं न सगळें ॥१॥
वैजयंती ! आहे ग मला ठाऊक. पण स्वर्गावरचे सारे विचार येथें व्यवहारांत आणतां येत नाहींत; म्हणून म्हणतें, तूं त्या ऋषीच्या आश्रमांत जा, आणि ते ऋषि कोठें असतात, कसे बसतात, त्यांचे खाणे, राहणें, विहरणें कसें असतें, हें सारें आधीं लक्षांत घेऊन ये. उगीच इकडेतिकडे भटकूं नकोस. देवी ! मी काय इकडेतिकडे उगीच हिडतें फिरतें म्हणतेस ? माझ्या सहज फिरण्यांत सहस्त्र कामें होत असतात; काल पहा, मी त्या ऋषीच्या आश्रमांत सहज सहल करण्यास गेले, तेथें काय सांगूं -
पद ( चाल - नंदनवन देवी०)
अमरावतिहुनि रम्य सुखाचें स्थान मला गमलें ।
फलपुष्पांहीं युक्त सदोदित वृक्ष दिसति भरले ।
सुवासगंधोदकस्नानातेंम करिति सुखें लतिका ।
गुंजारव भ्रमरांचे पाहुनि तल्लिन त्या कलिका ॥१॥
देवी ! काय सांगूं -
पद ( चाल - सदर )
चंदनतरुच्या सन्निध होतें किंचित छायेला ।
एक भुजंगम डोलत आला लागे कायेला ।
नाजुक नृत्या करुनी सांगे भीति नसे मजला ।
गळां पडे मम वदना लागे चुंबन घ्यायाला ॥१॥
वैजयंती ! खरेंच, तें आश्रमस्थान निर्वैर आणि ते ऋषिहि निर्विकार असें मी तर्कानेंच सिद्ध केलें होतें. खरीच तूं तर्कानें चित्रें काढणारी. देवी ! तर तुला त्या ऋषीचें चित्र कसें काढवत नाहीं ? छे ग वैजयंती ! ते ऋषि विचित्रच असतात, त्यांचे चित्र नेत्रांनीदेखील पाहून काढवणार नाहीं. बरें तर, मी रेखतें त्यांचे चित्र -
पद (चाल-सिंहासनि बैसेल०)
दुकुलवस्त्र परिधान करोनी मुकुटा घालिति शिरीं ।
वलयें शोभति दोनी करीं । रत्नाचे ते हार अमोलिक शोभति
कंठावरी । कुंडलें कर्णी बहु साजिरीं ॥ रम्य मंदिरें उच्च
गोपुरीं पुष्पित शय्यांवरी । दासी चंदनलेपा करी ॥१॥
शाबास बाई, वैजयंती. ऋषींना राजांचे रुप दिलेंस. थट्टा करण्याचीच ही वेळ. देवी ! ते ऋषि कसे असतात, कोठें वसतात, हें जर तुला तर्काने समजत नाहीं, तर मी म्हणतें ते खोटें कसें म्हणतेस ? वैजयंती ! तसें नाहीं, त्या ऋषीचा आहारविहार कसा काय असतो हें तर्कानें कसें कळणार ? देवी ! त्या ऋषींचा आहारव्यवहार कसा असतो हें पुसणें म्हणजे तुझ्या शहाणपणाचा टिळकच पुसणे आहे. अग, तुझ्या मतें -
पद [चाल - अलख जटा०]
नवनितसम मृदुलदेह असति का मुनी ? ।
पक्वान्ने सेविति कीं बसति वाहनीं ॥
करिती का दुग्धपान । ऐकति का मधुर गान ॥
रात्रंदिन धरिति ध्यान । विषयसेवनीं ? ॥१॥
नाहीं ग, वैजयंती ! मी तितकी भोळी नाहीं. देवी ! तूं भोळी नाहींस, मला मात्र खुळी समजतेस. त्या ऋषीचें तेज किती असेल, हें काय त्यांची नाडी पाहून सिद्ध केलें पाहिजे ? आर्य लोक सूर्याचे वजन काय तराजूंत घालून करतात ? वैजयंती, तूं काय बोलतेस तें तुलाच ठाऊक. अग, आर्य लोकांनी सूर्याचें वजन कसें केले ? सूर्य कोठे, आर्यावर्त कोठें ? देवी ! खरोखर, सूर्यमंडळ पृथ्वीपेक्षा तेरा लक्ष पटीनें मोठें आहे म्हणून बृहस्पती वेदसूक्त म्हणून आपल्या शिष्यांना सांगतांना मी ऐकलें आहे. हे पहा वेदसूक्त: -
"षटसूर्य श्रवसा महां असि सत्रा देव महां असि" (ऋग्वेद)
काय, वैजयंतीला सारा ऋग्वेद तोंडपाठ ! एक खरें, स्वर्गस्थ देवांपेक्षां आर्य लोक मोठे चाणाक्ष आहेत. चरित्रावरुन चित्र काढण्याची कला त्यांस अवगत असते, हें विचित्रच म्हणतात.
देवी ! क्षीरसागरांत लक्ष्मीदेवीची आदिनारायणाचे पाय कसे चुरते हें तर मला येथेंच चित्रें पाहून समजलें. हे आर्य लोक कसे ग क्षीरसागरांत गेले ? आपले ब्रह्मदेव, तेह्तीस कोटी देवांसहित, क्षीरसिंधूच्या आदल्या तीरांवरच बसून गार्हाणी घालतात आणि नामि, नामि. ही शब्द ऐकूनच परत येतात म्हणून सांगतात. देवी ! यांनीं त्यांचा वर्ण तरी ग कसा शोभवला, लक्ष्मी गोरटी आणि भगवान् निळा ! वैजयंती ! अग ती कविकल्पना असेल. छे ग, देवी ! क्षीरसागराचे क्षेत्रफळदेखील आर्य लोकांनी मोजून ठेवलें आहे; म्हणजे; क्षीरसागर बरोबर दोन लक्ष कोश आहे. खरं तर बाई, आश्चर्य करण्यासारखेंच. आर्य लोकांचे ज्ञान भारीच तर. देवी ! लक्षावधि कोशांवर राहणारे ग्रह यांचे भय बाळगतात; यांना नकळत त्यांना कोणत्याच राशीशीं संगम करतां येत नाहीं. देवी ! ऐकतेस ना, या आर्य लोकांनीं प्रत्येक ग्रह किती उंच आहे हेंदेखील दोरीसूत लावून तंतोतंत मोजलें आहे. म्हणजे पृथ्वीपासून सूर्यमंडळ ती कोटी चार लक्ष कोश आणि चंद्रमा शहात्तर हजार कोश उंच आहे, असें शास्त्रशुद्ध रीतीनें सिद्ध केले आहे. वैजयंतीला किती तरी माहिती ! खगोल भूगोल तर अगदीं हातांत. अधिक स्तुतीला व्याजस्तुती म्हणतात. देवी ! खरंच सांगतें, आर्य लोकांचे शास्त्रज्ञान पाहून चतुरानन ब्रह्मदेव चार तोंडांत आठ बोटें घालतो म्हणतात. होय ग, वैजयंती ! आर्य लोकांचे पराक्रम पाहून अमरगणाचा भ्रम भारीच श्रम पावतो असेहि म्हणतात. होय तर देवी ! आर्य लोकांचे अस्त्रज्ञान किती ग आश्चर्याचें !
श्लोक-कामदा.
बाण सोडुनी मेघ पाडिती फोडिती गिरी सिंधु शोषिती ।
स्वर्गदेवता आणि ती क्षिती । अग्नि निर्मिती सूर्य प्रकटिती ॥१॥
वैजयंती ! खरंच तर, यमधर्माचे भयंकर रोग आय लोकांचे भारीच भय बाळगतात. सोन्यामोत्यांचे भस्म लावून महानमहान व्याधींचे भस्मच करतात म्हणून देव विस्मय पावतात. देवी ! इतकेंच नाहीं, हे आर्य लोक -
साकी
पंचवदन करि भस्म मदन परि जीवविती रति कांता ।
वृद्धा देती तारूण्यचि कीं होई चकित विधाता ॥
संतति मनसोक्ता । निर्मिति आश्चर्यचि चिंता ॥१॥
बरं, पण वैजयंती ! आम्ही काय, आर्य लोकांचें वर्णनच करण्यास इकडे आलों आहों ? त्या ऋषीच्या तपस्तेजानें स्वर्गावर आकांतच मांडला आहे, आणि तूं म्हणतेस सुखशांत विश्रांति घ्यावी म्हणून. देवी ! मी एक विचारतें, त्या ऋषींनी येथें होमहवनें केली म्हणून त्याचा ध्रूम्र काय स्वर्गावर जाऊन देवांचे डोळे क्सकसतात ? देवेंद्राला यांची कसली ग चिंता ? हे ऋषि स्वर्गावर जाऊन इंद्रपदावर बसणार आणि आम्ही अप्सरा का त्यांच्या दाढ्यांना वश होणार ? वैजयंती ! स्वर्गलोक आम्हां अप्सरांकरतांच का केला आहे ? छे ! देवी, भारीच कोंवळी आहेस. अग,आम्हां अप्सरांचे वदन पाहाण्याकरतांच लोक देवांचें वंदन करतात. एरवीं त्यांचे दर्शनच कोणी मनांत आणणार नव्हते. बरं तर बाई; स्वर्गाधिपति यांचें उगीच भय बाळगतो तर. देवी ! मला खरंच सांग. देवेंद्राला स्वर्गात कसचें ग सुख ? आणि पहा -
पद (चाल-उरला भेद न ज्या०)
चित्ता सौख्य जरी नाहीं । तरि तो व्यर्थ स्वर्ग पाहीं ॥
कोणी दैत्य मत्त झाला । शंभुतें वर कोणा दिधला ॥
तप करि ब्राह्मण भूमिवरी । ऊर्वशी ! चिंता दूर करीं ॥
ऐशा अमृतापानाहुनि जल शतपट सुखकारी । चिंतावास
न जरि शरिरीं ॥१॥
वैजयंतीची महति वैराग्यवृत्तीहूनहि वरती आहे. त्या ऋषींच्या तपस्तेजाचा ताप, स्वर्गात कांपरेंच भरवितो. आणि - छे ग देवी ! देवेंद्राची भीति या ऋषींच्या कृतींत रतिमात्र नाहीं नको नको म्हणून पाताळांत पळून जातील. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तितकेंच बरें हें त्यांना पूर्ण माहीत आहे. स्वर्गसुखात कालसर्पाचें विष भरलें आहे, हें ते जाणतात. मग, वैजयंती ! महेंद्राची चिंता व्यर्थच तर ? देवी ! खरें सांगूं ?
पद [चाल-नाही सुभद्रा या वार्तेते०]
वडवाग्नीची भहिनी लक्ष्मी तापदायि चित्ता ।
जन्मतांच तिस सागर देई सहचरणी चिंता ॥
सुखकर आरोग्याची मुद्रा निद्रा ती पळवी
प्राणवियोगा, महान रोगां जनशरिरां भरवी ॥१॥
अशीच ती लक्मी, राजलक्ष्मी, स्वर्गलक्ष्मी वाढतां वाढतां चिंता अतिचिंता, महाचिंता, वाढतच असते. देवी ! लक्ष्मीचा उपभोग आणि चिंतेचा महारोग, यांचा वियोगच होत नसतो होत नसतो हें खरें कीं नाहीं ? पुरे ग, वैजयंती ! लक्ष्मी ही आमची बहीणच कीं नाही ? देवी ! बहीण आणी विहीण झाली म्हणून काय झालें ? गुणाला आणि वर्णाला काय शत्रुत्व आणि मित्रत्व असतें ? मग वैजयंती ! देवेंद्राला या ऋषीचा उगीच संशय तर ? देवी ! सर्व ज्ञानांत अनुभवज्ञान हें भारी श्रेष्ठ आहे, हें महानुभाव मुनि मान्य करतात; तर सांगतें:
साकी
धन ज्या गांठी असतें त्याला साधुहि तस्कर वाटे ।
सहज बोलतां फसविल ऐशी शंका तन्मनिं दाटे ॥
खेळचि वित्ताचा । करितो भ्रंश सुचित्ताचा ॥१॥
वैजयंतीचे वाग्जाल संपणार तरी कधीं ? देवेंद्राला आतां सांगावें तरी काय ? शचीदेवीला तोंड कसें दाखवावें ? या भूमंडळावर येतांना तिनें दिलेला फुलांचा हार, अपयशाची हार घेऊन परत कसा दाखवावा. देवी ! शचीदेवी तुझ्याशी मोठ्या प्रेमानें वागतात तर ! इंद्रायणीची वाखाणणी याचकरतां करतात. आपल्या प्राणपतीच्या प्रीतिपात्राशीं अप्रीति म्हणून तिला अगदीं नाहीं; सवतीशीं प्रीति हीच स्त्रियांची उन्नति; नीतीची खरी प्रगतिहि यांतच वसती आहे असें म्हणतात. वैजयंती ! फारच जीभ लांब केलीस. आपल्या भाषेचा अर्थ मी व्यर्थ समजत नाही. शचीदेवीनें माझा मत्सर करावयाला मी तिचें राज्य हरण केलें नाहीं. होय ग देवी ! तूं तिचें राज्य हरण केले नाहींस,पण देवेंद्रानें मला जर अर्ध्या दृष्टीनें पाहिलें तर मात्र सर्व सृष्टि भस्म करण्यासारखी कोपवृष्टि करशील. पुरे ग, वैजयंती; आम्ही आलों कोणत्या कार्यास आणि तूं करतेस भाषेचा विपर्यास. आतां कसें करावें ? देवेंद्रांने, वैजयंती बुद्धिमती म्हणून बृहस्पतीला विनंती करुन माझ्या संगतीस दिली. पण खंतीची जागृति तीच अधिक करते आहे. देवी ! सांग बरें, तुझ्याच मताप्रमाणें वागतें तर आतां. तर मग , वैजयंती ! त्या ऋषीच्या आश्रमांत जाण्याचा विचार आम्ही केला होता ना ? छे ग, देवी; ऋषीच्या आश्रमांत जाण्याचे श्रम निरर्थक. आणि पहा -
पुरुषासन्निध जातां सहजीं मानहीन ती युवती ।
स्वयेंच लक्ष्मी प्राप्त असे तरि कुणि नच तिजला गणिती ॥
लाभचि कष्टाचा । देतो सौख्य स्पष्ट वाचा ॥१॥
असेंच खरें, पण वैजयंती ! ... देवी ! काय ग तूं फिरुन फिरुन पणच पण म्हणतेस, देवेंद्राशी तूं कांही तरी पण लावून आलीस असें दिसतें. तसें नाही ग, वैजयंती ! तुझ्या भाषणांत खरेपणा आहे, पण - हेंचे तें, देवी ! लावून कन्यार्पण करण्याचा मूर्खपणा मनुष्यगणावाचून कोणीहि करणार नाहीं. वैजयंती ! कोठें ग धांवलीस ? पण लावून कोणीं ग कन्यार्पण केलें ? एक कसलेंसें वेताचें धनुष्य मोडलें तर त्यास कन्यारत्नाचें दान करावें, मग तो देव असो कीं दानव असो, नर असो वा वानर असो .... शाबास; वैजयंतीला सार्या गोष्टी कळतात हेंच आश्चर्य आहे ! भूमंडळांत आलीस कधीं आणि सारें ऐकलेंस तरी कधीं ? तर सांगूं ? तें धनुष्य साधारण असणार नाहीं; आपल्या त्या भार्गवरामाच्या शिवधनुष्यास त्याचे तीनशें गण लागले तरी ओढण्यास होत नाहीं असें सांगतात; आणी तें धनुष्य मोडणारा असाधारणच पुरुष असला पाहिजे. असाधारण पुरुष ? देवी ! तें धनुष्य तो पण लावणार्य़ा कन्येंनें एका बोटावर खेळवलें हें लक्षांत ठेव. होय ग वैजयंती ! पण ती कन्या दहा लक्षांत भारी आहे, हेंहि लक्षांत घेतले पाहिजे. देवी ! हें खरें असेल एखादें, पण मला सांग, नवर्याची सारी भिस्त का त्याच्या शक्तीवरच ? मग, कुलशील, गोत्रपत्र हीं सारीं व्यर्थच तर ! मोठमोठे वृक्ष मोडणारे वानर हें काम सहजच करणार होते, आणि सोन्यासारख्या नवरीस खांद्यावर घेऊन ह्या पर्वतावरुन त्या पर्वतावर उड्या मारणार होते; मृत्युलोकच्या लग्नाच्या रीति ऐकल्या म्हणजे मनाची स्थिती भारीच खंती पावते आहे. तें धनुष्य वानर मोडणार होते ना ? वैजयंती ! दाही दिशा कांपविणार्या दैत्येशाची कशी दुर्दशा उडाली, हें मात्र तुला कळलें नसेल. पण तें असो, वैजयंतीनें सांगावयाचा युक्तिवाद, पण ती करते वितंडवाद. आतां आम्हांस कांहीं बुद्धिवाद सांगणार्या स्त्रिया कोठें मिळतील ? स्त्रियांच्या कार्यात स्त्रियांवाचून कोणीच दाद घेणार नाहीं. देवी ! स्त्रियाच पाहिजेत कीं नाहींत ? यांच्या युक्तीनेच आम्ही पुरुषांची मति वक्रगति करुन टाकूं. हं, हं, समजलं; वैजयंतीची भाषापद्धति आशादातीच आहे. गायनकलेनें मैना, कोकिला जगाला शोकी बनवितात, हें खरेंच. देवी ! गायनकला अबलांस प्रबला करते. खरेंच ग, वैजयंती ! पण, त्या ऋषींना गायनाचा नाद असेल ना ? शाबास देवी ! तूं आपलें स्वर्गावरचें शहाणपण, येथें कोणत्यातरी पणांत हरवलें असें दिसतें, तर पहा -
साकी
गीत सुभाषित युवतीलीला वश नच मनुजा करिती ।
मूर्खचि किंवा पशुसम त्यांची सुज्ञांमाजी गणती ॥
गायनवादन तें । संगित जगता रंजवितें ॥१॥
काय बाई ! वैजयंतीच्या भांडारांत, शब्दरत्नें किती असतील, हें बृहस्पतीलाहि माहीत नसेल ! हं, बरें सुचलें. तूं मघाशीं काय म्हणालीस ? आमचे मध्यस्थ आम्हांकडेसच असतात, म्हणजे ते ग कोण ? देवी ! कसची ग तुला मध्यस्थीचीच महति ? सध्याची परिस्थिती मतींत घेऊन कार्याची गति चालू केली म्हणजे झालें. पण, आपलें तेंहि खरें; मनाचा एकदां धीर सुट्ला म्हणजे बुद्धिहि बधीर होतें असें म्हणतात. वैजयंती ! संशयाची निवृत्ति झाल्यावाचूंन मतीची गति चालू होत नसते; संदिग्ध शब्द बुद्धीला बद्ध करतात. आम्हांकडे मध्यस्थ असतात हे शब्द चमत्कारिक दिसतात. पण ते मध्यस्थ व्यक्त कीं गुप्त ? देवी ! पहा तर आपले मध्यस्थ -
साकी
पुरुषमना आकर्षक मन्मथज्योति कामिनीनयनीं
हास्यरतीचा पाश नराच्या हृदया घे ओढोनी ॥
रोमरोम नखरे । स्त्रियांचे मध्यस्थचि सारे ॥१॥
शाबास ! वैजयंती ! मोठीच तुझी मतीची महति. हेच ना मध्यस्थ ? देवी, पहा तर आणखी -
साकी
कुरळ केश निज वेणिफणीचे दंश पुरुषनेत्राला ।
होतां विव्हळ गात्रगलित तो सोडि न प्रितिपात्राला ॥
कुंकुम चंद्रचि तो । नरमनसागर खवळवितो ॥१॥
बरं बाई वैजयंती. इतकें चातुर्य, चतुर्मुख ब्रह्मदेवाकडे असेल असें दिसत नाहीं. सारे पुरुष अल्पबुद्धि असतात असें नाहीं. मानवांचीं बुद्धिशक्ति देवदानवांच्याहि मतीवर सक्ति करीत असते. देवी ! अंगनांचा देहसंग झाल्यावर पुरुषांचा बुद्धिभंग सहजच अनंग करितो, हें अभंग वाक्य आहे. वैजयंती ! तूं म्हणतेस तसे सारेच पुरुष असतात असें नाहीं; श्रेष्ठ पुरुषांना स्त्रीसौंदर्याची मर्यादाच असत नाहीं. देवी ! पुरुषांना स्त्रीसौंदर्याची मर्यादाच असत नाहीं. देवी ! पुरुषांना आपल्या मर्यादेंत आणण्यास स्त्रियांना सौंदर्याचीच गरज लागते असें नाहीं. आणि स्पष्ट सांगतें, श्रेष्ठ म्हणविणार्या पुरुषांस मतिभ्रष्ट करण्यास, स्त्रियांना थोडेच कष्ट पडतात. पहा,
साकी
मृदुल सुरंजित रंगित वसनें परिधानित ललनांचा ।
व्यसनीं पाडिती विषयि जनांना चित्रगती गमनाची ॥
हारहि पुष्पांचे । करिती बद्ध नरा साचे ॥१॥
शाबास, धन्य वैजयंती ! तुझ्याइतकी स्फूर्ति महान् कवींच्या मतीलाहि अतिशयच होईल. खरे पुरुष स्त्रियांचीं नांवेच घेत नसतात. काय, देवी ! स्त्रियांची नांवे पुरुष घेत नसतात ? तर खचित सांगतें, अभिनव स्त्रियांची नांवेच ऐकली म्हणजे महानुभाव पुरुष आपल्या नावलौकिकास विसरतात असाच जगाचा अनुभव आहे. आणि पहा, कमलिनी, कुमुदिनी हीं नांवे ऐकलीं म्हणजे, पुरुषांचें मन भ्रमराप्रमाणें रुंजी घालीत असतें; आणि गुलाब, मालती यांसारखी नांवें कानांत गेलीं म्हणजे, त्यांचा मधु वास कसा घेण्यास मिळेल म्हणून ते पुरुष रात्रंदिवस वसवसत असतात. पण वैजयंती, साधारण पुरुषांची करणी आदरणीय होत नाहीं. देवी ! साधारण पुरुषांची करणी ? तर मी साधार सांगतें. एका नवमणीची गुणकीर्ति एका पक्ष्याच्या तोंडून ऐकतांच, पुण्यश्लोक म्हणविणारे नरवराग्रणी धरणीवर लोळणी घेऊं लागले, असें सांगतात. आणि काय सांगूं, देवी ! नवयुवतीच्या अंगावरची भूषणें पुरुषांच्या लक्षांत गेली म्हणजे वक्ष:स्थळ भेदून टाकतात, आणि त्यांना लोकांनीं दिलेलीं दूषणेंदेखील दिसत नसतात. वैजयंती ! खरें सांगूं, आपल्या सरस्वतीला जर मी मान देतें तर केवळ ती अविवाहिता म्हणून ... वैजयंती ! अविवाहिता म्हणजे मयूरावर बसणारी म्हणूनच का सरस्वती मानवती ? काय देवी ! अविवाहिता म्हणजे विवाहतापाचे संताप त्यागलेली. वाहनावर का मानाची कमान असते ? वैजयंती ! फिरुन फिरुन विवाहावरच का तुझा वांग्विहार ? मनुष्य आणि पशु यांत अंतर काय ते विवाहानेंच आले आहे. देवी ! विवाहावर माझा वाग्विहार नाहीं. वाककुठार आहे. खरोखर, जनाचें भय न धरतां मनापासून सांगतें. विवाह म्हटला कीं माझ्या देहाचा दाह होत असतो. पशुपक्ष्यांत विवाह नाहीं, पण गाईशीं घोडा, हत्तिणीशीं लांडगा किंवा कोकिळेशी बगळा यांचा अंगसंग होत नसतो. नाहीं तर पहा आपले विवाहशास्त्रज्ञ देव मानवस्त्रियांशीं, मानव राक्षसस्त्रियांशीं लग्नमग्न होत असतात.
वैजयंती ! आधारावाचून बोलणें शहाणपणाला बाधा करतें; देव कोठें ग मानवकन्यांशी लग्न लावतात ? देवांचा मान तो काय आणि मानवकन्या त्या काय ? देवी ! तूं देवेंद्राच्या अंत:पुरातच असतां, जगांतील गोष्टी ऐकशील तर मन भारीच कष्टी होईल. देव मानवकन्यांशी लग्ने लावीन नाहीत; मागण्या करतात, विनवण्या करतात, याचनेची यातना पत्करतात आणि ओंवाळण्या करुन घेतात. वैजयंतीस सर्व श्रुत म्हणतात; नाहीं बाई अशा गोष्टी माझ्य़ा लक्षांत. पण, देवांनी कोणाला ग मागण्या घातल्या ? स्वर्गागनांपेक्षा
मानवकन्या भारीच रुपवान तर ! कोण ग ती ? देवी ! महा रुपवती दमयंती - वैजयंती असूं दे ग, देवांची कृति अपकीर्तिकारक कधींच असणार नाहीं. देवी ! देवांच्या दुष्कृतीनें त्यांची दुष्कीर्ति तर झालीच, पण आम्हां अप्सरांच्या रुपकीर्तीची नालस्ती करण्यास, त्यांनी कविजनांस स्फूर्ति दिली. वैजयंतीच्या बोलण्याची संगति म्हणून लागतच नाहीं. अप्सरांची कीर्ति, त्रिलोकास भरती; काय ग, कवींच्या स्फूर्तीने तुझी ख्याती कमी केली ? देवी ! समुद्रोद्भवा सात कोटी अप्सरांपेक्षा त्या रुपवती दमयंतीचें पारडें जड झाले. आणि ब्रह्मदेवाला, तिला निर्माण करण्यास नवीनच मनोमय मूस ओतावी लागली, असें ते नि:शंक म्हणतात. अग, वैजयंती ! कवि हे निरंकुश असतात. त्यां दोष देतां येत नाहीं. देवी ! आपल्या देवांची कृति जर नीतिमंत असती तर त्या निरंकुश कवींस त्रिशंकूसारखे लोंबत ठेवणार होतें. पण काय करणार ? राजांचे पाप, प्रजेला शाप घेण्यास लावतें, हें खरे. माझ्या बोलण्याकडें देवी लक्षच देत नाहीं. वैजयंतीच्या शब्दांच्या कोटीपुढें, माझे लक्ष आणि हजार काय चुंड लावणार ? जगांत विवाह होऊच नयेत, हें मत भारी चुकीचें आहे. देवी ! माझ्य़ा बोलण्याचा अर्थ तूं व्यर्थच घालवतेस. जगांत विवाह व्हावे खरे, पण ते शास्त्रशुद्ध असावे; बोलणें एक आणि करणें दुसरें, येथें महापातकाचें धरणें असतें. देवी ! तूं पहा, विवाह म्हणजे काय ? लग्नमंत्रांचा अर्थ वधूवरांस जर कळत नाहीं तर हा अनर्थ म्हटल्यास भाषण व्यर्थ कसे होईल ? लग्न म्हणजे मनाचें संलग्न, पण नवरानवरीच्या नयनांस जर त्या लग्नापूर्वी दर्शनच होत नाहीं, तर काय अंतर्ज्ञानानेंच मनाचें मीलन होत असतें ? वैजयंती ! आर्य लोकांत विविध प्रकारचे विवाह असतात, त्यांत गांधर्वविवाह श्रेष्ठ मानतात. देवी ! हेंच तें, गांधर्वविवाह म्हणजे ग काय ? गंधर्व हे आमचे बंधूच कीं नाहींत ? प्रीतिविवाहास पुरुषांनीं गांधर्वविवाह हें नांव ठेवलें आहे, इतकेंच; एरवीं त्या विवाहास अप्सरसविवाह हेंच नांव खरें शोभतें. देवी ! आधीं काय म्हणालीस ? माझें मत चुकीचें ? तर सांगतें, चुकलेल्या मतांतूनच खरें मत पुढें निघतें हा सिद्धांत आहे. माझा सारा कटाक्ष त्या ब्राह्मविवाहावर आहे. वैजयंती ! ब्राह्मविवाहांत काय ग तुला अनन्वित दिसतें ? उगीच पुरुष जातीवर अनीतीचा आरोप करतेस. देवी ! पुरुष जातीवर मी वृथा आरोप करीत नाहीं; तूंच पहा, हे पुरुष नवरदेव होऊन अग्निदेवतेसन्निध शपथ वाहतात. "धर्मेच, अर्थेच, कामेच नातिचरामि" खरें कीं नाहीं ? आणि लगेच होतात "रात्रिंचरामि". या पातकाला चांद्रायणी प्रायश्चित्त निश्चित कमी होईल कीं नाहीं ? आणि तो अग्निदेव, त्याच्या देहाची लाहीलाही कशी ग नाहीं करीत ? भोळ्या बापड्या अज्ञान कुमारींचा विश्वासघात, यासारखें अध:पात करणारें महापातक दुसरें असणारच नाहीं, हें मी पुन: पुन: म्हणणारच. वैजयंती ! पुरुषांविरुद्ध स्त्रियांनी कधींच बोलूं नये. सुज्ञ पुरुष पापभीरु, देवभीरु असतात. देवी ! पुरुष पापभीरु ? अग, त्या पुरुषांची गुप्त कृत्यें चित्रगुप्तालाहि गुप्तच असतात. वैजयंती ! पुरुष पातकी आणि स्त्रिया पुण्यवान्, हा स्त्रीजातीचा पक्षपात नीतीचा घातक मानतात. देवी ! मी इतकी घातकी नाहीं. स्त्रियांच्या पातकास यमाचा कुंभपाक पुरुषांनींच भोगला पाहिजे; पुरुष जर शुद्ध आचरण करतील तर स्त्रियांचे चरण कधींच पापमार्गी होणार नाहींत. शुद्ध शास्त्रज्ञ असेंच म्हणतात. "स्त्री पाप भ्रतारस्य ..." स्त्रियांना बिघडवितात ते पुरुषच. बरें तर वैजयंती; स्त्रियांची पक्षपाती, स्त्रियांनीं कितीही दुष्कृत्यें केलीं तर पाप म्हणून नाहींच; सदाशुद्धा गंगा कीं भागीरथी, असेंच ना तुझें मत ? देवी ! मीच असें म्हणतें असें नाही. आपले ब्रह्मनिष्ठ वसिष्ठ मुनि, गंभी ध्वनीनें सांगतात, " स्त्रिय: रजस: शुद्ध: नदी ओघेन शुद्धते" रजोदर्शन झालें म्हणजे स्त्रियांचे वर्तन कसेंहि असल्यास पापाचें परिमार्जन होतच असतें. बरें तर, वैजयंती, तूं देवांचीदेखील भीति धरीत नाहींस; पण तुझ्या भाषेची रीति बृहस्पतीलाहि नापसंतच होईल, सत्यं वद यापुढें प्रियं वद हेंच शास्त्रकारांचे हृद्गत आहे. धर्मनीतीचीं बंधनें सर्वांस सुखाचीं साधनें आहेत. काय देवी ! धर्मशास्त्राचीं बंधनें केवळ कनिष्ठास ! श्रेष्ठांचा अनिष्ट प्रकार कोणीच उच्चारीत नाहींत. अनीतिनदीचा ओघ महालक्ष्मी पर्वतावरुन खालीं येत असतो असें उगीच नाहीं म्हणत. विवाहाची बंधने मनुष्यांस, वर्ण, वश्य, तारा यांचा पसारा मनुष्यांकरतां. सागराच्या कन्येचें गोत्र आणि पर्वताच्या आत्मजेचें जन्मपत्र कोठें ग महानमहान देवांनीं पाहिलें होतें ? आतां पुढें पहा, देव कीं मानव, अस्वलाच्या पोरीशीं आणि नागिणीच्या पिल्याशीं लग्नें लावणार आणि जगांत धन्य होणार ! बरं बाई, वैजयंतीला विवाहाची पद्धति नापसंतच आहे तर ! पण वैजयंती ! विवाहाला दिव्य संस्कार म्हणतात. आणि लग्न हें धार्मिक बंधन असून त्याचा स्तुत्य हेतु प्रजोत्पादन हा आहे. बरें, देवी ! विवाह हा दिव्य संस्कार; विवाहावांचून संसार चालावयाचा नाहीं; आणि स्तुत्य हेतू काय प्रजोत्पादन ना ? लग्नाच्या पद्धति सोडल्यास प्रजेची उत्पत्ति होणारच नाहीं. देवी ! प्रतिज्ञापूर्वक सांगतें, विवाहाचीं बंधनें, स्त्रीशिक्षणाचीं साधनें प्राप्त झाल्यावर तटातट तुटून जातील, आणि ही आपली लग्नाची गजगांठ स्त्रीस्वातंत्र्याची घांट ऐकतांच वाट मिळेल तिकडे फेटाळून जाईल. सरस्वतीच्या दर्शनानें स्वातंत्र्य - प्रभंजन सुटला म्हणजे, विवाहाचा हेतू प्रजोत्पादन हें व्यर्थ होऊन लग्न म्हणजे केवळ विलासी जीवन हेंच मत प्रादुर्भूत होईल. वैजयंतीची भाषापद्धति बृहस्पतीला तरी समजेल का ? देवी ! माझ्या शुद्ध भाषेंत कधींच दोष असणार नाहीं. तूंच पहा, स्वतंत्र सरस्वतीची उपासना करुन पतितंत्र गर्तेत पतन पावणें हें त्या उपास्य देवतेचा उपहास करण्याचें महापातक पदरीं बांधण्यासारखें आहे कीं नाहीं ? लग्न म्हणजे अज्ञानाचें प्रदर्शन, हें त्या ज्ञानसरिता सरस्वतीस कसें मान्य होईल ? वैजयंतीच्या शब्दलालित्याचा रंग,विचाराचे तरंग, हे पाहिले म्हणजे अनंगराज खरोखरोच दंग होऊन जाईल, अग, विवाहावांचून जगाचा नैतिक निर्वाह होणार कसा ? सुव्यवस्थित संसार-व्यवहाराला विवाहपद्धति जगांत चाललीच पाहिजे. काय, देवी ! विवाहांवाचून निर्वाह होणार नाहीं कोणाचा ? त्या आप्पलपोट्या ब्राह्मणांचा. अग, त्या ब्राह्मणांनीं दक्षणा उपटण्याकरतां ह्या सार्या धर्माच्या उठावण्या केल्या आहेत ! आणखी कांहीच नाहीं. वैजयंती ! ब्राह्मणांवरहि उपसलीस का तरवार ! आतां तर बृहस्पतीच्या घरांत तुला थारा मिळणें कठीण. वेदश्रुत म्हणतेस आणि वेदमूर्ति ब्राह्मणांची निंदा करतेस ! श्रुतींत ब्राह्मणांची स्तुतीच भरली आहे, असें म्हणतात, हें मात्र तुला ठाऊक नसेल. देवी ! श्रुतीची माहिती मला नाहीं म्हणणार्यांस मंदमतीच म्हणतात. ही पहा श्रुतीची स्तुति :-
"ब्रह्मविज्ञानमित्याह तस्मात् ब्राह्मणो मुख्यो मुख्यो भवति "
(यजुर्वेद अ. ५.)
काय बाई, वैजयंतीला सार्या श्रुति तोंडपाठ, पण बोलतांना मात्र आडवाट धरीत असते. ब्राह्मण हे सार्या जगांत श्रेष्ठ आहेत. वेदमंत्रांच्या योगानें स्वर्गस्थ देवता त्यांच्या स्वाधीन असतात. देवी ! आहे तर तुला ठाऊक ! ब्राह्मणांच्या स्तुतीचा धडा तूं पाठ केलास, पण ब्राह्मण कोणास म्हणावें याचा मात्र उलगडा तुला साधला नाहीं.
"देवाधीन जगत्सर्वं, मंत्राधीनंच देवता ।
स मंत्रा ब्राह्मणाधीना, ब्राह्मणो मम देवता ॥"
ह्या मंत्रावरुनच ब्राह्मणाचें तंत्र श्रेष्ठ होत नाहीं. वैजयंती ! ब्राह्मणाचें श्रेष्ठत्व निसर्गतत्वानेंच सिद्ध केलें आहे. पहा-
साकी
वेदाभ्यासो ब्राह्मण समजें देवाचे या भूवरती ।
निज तपतेजें सर्व जगाचें पाप भस्म ते करिती ॥
पदरज विप्रांचे । करिती मुक्त जनां साचे ॥१॥
देवी ! ब्राह्मणाचें श्रेष्ठत्व कोणीं ग नाकबूल केलें ? पण, ब्राह्मणत्व कशानें येतें हे मात्र तत्व शोधण्यास बरेंच विद्वत्त्व पाहिजे, आनिवांशिक सत्व येथें उपयोगाचें नाहीं. काय ! आनुवंशिक सत्व उपयोगी नाहीं ? सिंहाच्या पोटीं कोल्हा, आणि हंसापासून कावळा यांची उत्पत्ति होणारच तर मग ! आनुवंशिक रोगांचीदेखील उपपत्ति लावतात, तर वंशवृक्षाची फलनिष्पत्ति निष्फळच होणार ? बरें असूं दे ग, उगीच वादविस्तार करतेस. देवी ! मी उगीच वादविस्तार करीत नाहीं. माझा वादविहार त्या विवाहव्यवहारावर ठरलेला आहे. विवाहाची दु:स्थिति सुधारल्यावाचूंन आर्यलोकांची प्रगति कधींच होणार नाहीं, हें तत्व महत्वाचें आहे. वैजयंती ! थोडेंच बोलणें, लोकांत डुलणें, असेंच असलें पाहिजे. आतां तूं म्हणतेस तसा काल येणार असें भविष्यकारांचे मत आहे. विवाह म्हणजे खुशीचा व्यवहार, अन्नसंबंधाला बंधन नाहीं, धर्मकर्माचा मार्ग स्वर्गावर, हा प्रकार कलियुगांत चालणार, म्हणून थोरथोर ऋषि भिऊन आहेत. ‘कलियुगामुळें धर्माचें वाटोळें होणार म्हणून ऋषि भ्याले आहेत म्हणतेस ? तर खरें सांगूं , कलियुग नव्हे, सुवर्णयुग, ज्ञानयोग येणार म्हणून ते ऋषि भ्याले आहेत, आणि त्यांनी केलेली गुप्त कपट कृत्यें उघड होणार, त्याची ब्राह्मणास भारीच भीति वाटत असते हें खोटें नाही. पत्रतंत्रानें मंत्र म्हणून लोकांस अपवित्र माननारे ब्राह्मण, श्रुतिस्मृतीचें गाठोडें आपल्याकडे बांधून ठेवतात आणी सर्व लोकांत आपणास श्रेष्ठ मानतात, हा उलगडा होण्याचा काळ, कलियुगांतच येणार. मोठे कपटी, आपमतलबी ! वैजयंती ! काय, श्रुतिस्मृति करणारे ब्राह्मण सर्व लोकांच्या वंदनास पात्र असून त्यांची तूं निंदा करतेस ? सर्व जगाच्या कल्याणार्थ धर्म रचणारे ते ब्राह्मण. देवी ! जगरक्षणार्थ धर्म रचतात ना ते ब्राह्मण ? अग, त्या ब्राह्मणांनीं धर्मशास्त्रांत किती ग घोटाळा माजवला ! भावाभावांतदेखील भेदभाव करतांना त्यांना खेद कसा ग नाहीं वाटला ? एका बापाची लेंकरें, त्यांतदेखील पंक्तिप्रपंच ! खरें कीं नाहीं ? वैजयंती ! वर्णव्यवस्थेचा धर्म यांत सूक्ष्म मर्म असतें, हें ब्राह्मणाचें कर्म उत्तमच मानतात. धर्मशास्त्रें लोकांच्या हिताकरतां रचलेलीं आहेत. देवी ! एकच सांग, एका आईच्या उदरांतील मुलें, त्यांतदेखील यांनी भेदभाव कसा ग ठेवला ? मुलीनें खाल्ल्यास मार आणि मुलाने चोरल्यास आदरसत्कार हा कोणत्या ग धर्माचा आचारविचार ? खरेंच सांगतें, स्त्रीस्वातंत्र्याचा प्रसार झाल्यांवाचून जगाचा उद्धार कधींच होणार नाहीं खास. वैजयंतीचे विचार, स्त्रीस्वातंत्र्याचा प्रसार आणि जगाचा उद्धार, या तीनहि विकारांचा संचार, स्वर्गात आणि आर्यावर्तात कधींच होणार नाहीं. स्वतंत्रता आणि स्वैर वर्तन यांत भारीच अंतर असतें. आर्य स्त्रियांचें श्रेष्ठत्व मान, मर्यादा, विनयशीलता, नम्रता यांतच विद्यमान असणार. देवी ! असाच दुराचार, अनीतीचा प्रकार चालणार म्हणतेस तर नकोच मला तो स्वर्ग आणि आर्यावर्त, मी स्वस्थ ग्रहमंडळांत जाऊन राहतें. पूर्ण स्वातंत्र्याचे सुखसोहळे खेळावे ते ग्रहमंडळांत. नवग्रह आणि बारा राशी यांची विलास वाटणी त्यांनी सुखसार करुन ठेवली आहे. एक राशी जर एका ग्रहाची उच्च राणी तर तीच दुसर्याची स्वक्षेत्राग्रणी; प्रत्येक ग्रहाची अर्ध दृष्टि, पाव दृष्टि प्रत्येक राशीवर असतेच, सप्तम स्थानावर म्हणजे म्हणजे जायास्थानावर सर्वांची पूर्ण दृष्टि. वैजयंती ! चाललीस ना ग्रहमंडळावर ? अग, ग्रह म्हणजे महा भयंकर. महान् महान् देव त्यांचे भय बाळगतात. महादेव शंकर, म्हणतात, एका ग्रहाच्या भयानें माथ्यावर शिळा घेऊन गंगेंत लपून बसला. ग्रह म्हणजे मनुष्य नव्हेत. देवी ! ग्रह म्हणजे अगदीं मनुष्याप्रमाणें वर्तनाचे. पहा, मनुष्यांप्रमाणेंच त्यांच्यांत शत्रुत्व - मित्रत्व असतें. चातुर्वर्ण्यव्यवस्था तर आहेच, मात्र स्पर्शास्पर्शाचा पंक्तिप्रपंच नाहीं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अंत्यजदेखील एकाच वेळीं एकाच राशीशीं सुखशांत विलासभोग घेत असतात. वैजयंती ! ग्रहांत आणखी शत्रुत्व - मित्रत्व असतें ? मग मनुष्यच ते !
देवी ! ग्रहगणांत शत्रुत्व तर भारीच असतें. पितापुत्र तर भारीच हाडवैरी, ब्राह्मण-ब्राह्मणांत नैसर्गिक द्वेषभाव, आणि काय सांगू, त्या प्रत्येक ग्रहाची, काय म्हणतात, महादशा आणि अंतर्दशा असते, त्या वेळी त्यांच्या भरारीस करारीच नसते. वैजयंतीला इतकी माहिती कधीं ग मिळाली ? अग,पण, शत्रुत्व आणि मित्रत्व म्हणतात तें कसें ? आणि त्याचा परिणाम काय ? देवी ! काय सांगूं, त्यांच्या शत्रुत्व-मित्रत्वाचा परिणाम लोकांना भोंवत असतो, पण राशीजवळ ते अगदीं प्रेमळ ! हा गुण भारीच वाखाणण्यासारखा; आणि त्या राशीदेवता किती ग हुशार ! एकाच वेळीं आठ ग्रहांसदेखील सुखोपभोग देण्यास अगदी तयार ! वैजयंती ! राशीशीं प्रेमळपणा हा गुण तर भारीचे वाखाणण्यासारखा ना ? देवी ! या अप्रतिम गुणानेंच ते ग्रह हजारों कोशांवर गगनांत राहून भूमंडळावरचें राज्य चालवतात. पहा,एक होतो राजा, दुसरा म्हणवतो प्रधान, एक मेघाधिपति तर एक रसाधिपति. प्रत्येक मनुष्याचें जनन, मरण, सुख, दु:ख यांच्या हातांत ! हानि, कीर्ति, यश, लाभ देखीले यांच्या दृष्टीनें ! हें ग्रह एका व्यक्तीला कधीं सुखाच्या पर्वतावर नेऊन बसवतील तर कधीं दु:खाच्या समुद्रांत लोटून देतील, असा यांचा प्रभाव आहे ! या ग्रहांना, आर्य लोकांनी आर्यावर्ताचें राज्य कधीं ग अर्पण केलें, कोण जाणे. वैजयंती ! पृथ्वीवरच्या लोकांवरहि यांचा प्रभाव असतो ना ? देवी ! काय सांगूं, आर्यावर्ताचे देशविभागदेखील त्यांनीं स्वेच्छेप्रमाणें करुन घेतले आहेत. बरं तर बाई, वैजयंती ! मनुष्याचें जननमरणदेखील त्यांच्या हातांत ? देवी ! अगदीं खरें, त्या ग्रहांचीं प्रत्येक दिवशीं नियमित पंचतत्वें असतात, आणि त्यांच्या वायुतत्वांत जनन आणि आकाशतत्वांत निधन असें नियमबंधन आहे. आणि पहा, हे आर्य लोक किती ग भेकड, त्या ग्रहांस, नव्हे अंत्यज ग्रहांसदेखील, पूज्य मानतात, त्यांचे जप करतात, त्यांस दानें देतात, आणि काय सांगू, राहुकेतूचें आणि सूर्याचंद्राचें ग्रहण झाल्यास हे आर्य लोक उपोषण करतात. वैजयंती ! भीतीच्या जागीं नमस्कृति केलीच पाहिजे. देवी ! भीतीच म्हणून नाहीं, हा आर्य लोकांचा मनाचा दुबळेपणा. पहा, तारा म्हणजे, वृद्धा नारी पतिव्रता आणि चंद्रमा तर क्षयरोगी निर्बल, पण हे आर्य लोक आपल्या विवाहकार्यांत, यांचें बल शोधतात; "ताराबलं चंद्रबलं तदेव". वैजयंती ! इतकें ग्रहलाघव तूं कोठें ग शिकलीस ? वृद्ध पराशर ऋषि भेटले वाटतें आपणास ? सत्यवतीची सवत वैजयंती, असें नाही ना लोक म्हणणार ? पण तें असो; तूं आर्य लोकांना भेकड, दुर्बल कशी ग म्हणतेस ? आतांच ना, त्यांए तूं वर्णन केलेंस कीं, आर्य लोकांचें भय स्वर्गस्थ देव भारीच बाळगतात, त्यांनी देवेंद्रास पुष्कळदां सहाय्य केलें आहे, महान् देवांची पर्वा न करणारा वृषपर्वा याचा गर्वापहार एका आर्य राजानेंच केला; इतकेंच नाही तर त्याच्या वीरपत्नीनें शुक्राचार्याच्या शक्तीवरहि सक्ति केली, असें म्हणतात. आतां इतकें खरें कीं, आर्य लोकांना अनार्य ग्रहांचें ग्रहण लागतें. देवी ! मी तें खोटें कोठें म्हणतें ? गुण दोष वर्णन हें सहजासहजीं होतच असतें. आर्य लोकांप्रमाणें आर्यांगना बुद्धिमत्तेंत भारीच प्रवीण असतात. वैजयंती ! आर्य स्त्रियांचा पातिव्रत्यप्रभाव कळला आहे ना तुला ? एका आर्य कन्येनें यमराजाच्या दाढेंतून आपल्या पतीस ओढून काढलें इतकेंच नाहीं तर त्या धर्मराजाकडून, पौत्रमाथां छ्त्र देखो, अशा प्रकारचे वर मागून घेतले; आणखी काय सांगूं ? एका आर्य साध्वीच्या भयानें सूर्यदेखील उगवेनासा झाला. आर्य स्त्रियांच्या शापाचें भय देवदानवांस भारी असतें. देवी ! मोठी बाई पतिव्रता ती. आपल्या पतीस खांद्यावर घेऊन, त्याच्या प्रीतिपात्र वेश्येच्या घरीं जाणारी; अशिक्षिता अशाच पतिव्रता असतात. स्त्रियांना शिक्षण प्राप्त झालें म्हणजे मात्र हें पतिव्रत्याचें लक्षण, क्षणमात्र राहणार नाहीं. पुराणिक सांगतात आणि अज्ञानी बाया ऐकतात. वैजयंती ! असेंच ना आमचें कीर्तन चालावयाचें ? मलाहि पण, नको नको म्हणतें तरी, उत्तरांवर प्रत्युत्तरें द्यावीं लागतात. देवी ! असूं दे तर त्या असंगत गोष्टी, तुझ्याच मताप्रमाणें वागणें माझें कर्तव्य आहे. सांग तर मग ... वैजयंती ! आतां त्या ऋषीपाशीं जाण्याचा कार्यक्रम कसा ठरवावा ? देवी ! फिरुन फिरुन ऋषीपाशीं जाण्याचा विचार काय करतेस ? ऋषीपाशीं जाण्यास का कार्यक्रम पाहिजे ? स्त्रियांचा पराक्रम असा असावा कीं, पुरुषांनीं धर्मकर्म सोडून आमच्यामागें धांवत यावें. वैजयंतीनें अगदी साधेंच केलें तर. अद्याप ऋषींचे डोळेच पाहिले नसतील. काय देवी ! ऋषींचे डोळे काळे कीं तांबडे, मला पाहून पांढरेच होतील. बरें तर, वैजयंती ! स्त्रियांनी थोडेंच बोलावें. पण तें असो. तू आधीं गायनाचा अनुभव घ्यावा असें म्हणत होतीस ना ? देवी ! पुन: पुन: तूं एकच बोलतेस आणि मला म्हणतेस, वाद घेणारी, स्त्रियांनीं थोडें बोलावें, अधिक रडावें, आणि कधीं मरावें ? पुरुष आणि स्त्रिया यांत भेद वेददेखील धरीत नाहींत; सोमरस पिण्यास, सूर्यदेवतेआधीं, पृथ्वीदेवी, उषादेवी यांस आमंत्रणें करतात ते वेद जगद्वंद्य. काय बाई, वैजयंतीचा जेथेंतेथें वेद; आपल्या श्रुतींनीं माझी मति बंद झाली, धृतीचे गति बंद पडली; आणि काळजाची भीति वरती चढली; कार्याची स्मृतिदेखील नष्ट झाली. देवी ! तूंच करतेस वादाची उकरणी, आणि मला म्हणतेस वादकरणी. पुराणाचा भरणा अधिक झाला आणि पुरुषाचा मान वरती चढला. स्त्रियांचा कमीपणा वाढला म्हणून माझ्या देहाचा इंगळा होत असतो; स्त्रियांना अज्ञान अबला म्हणवणार्यांचा गळाच दाबला पाहिजे. तूं आणखी काय म्हणतेस, गायनाचा का अनुभव घेतला पाहिजे ? महानुभाव म्हणविणारे तपोनिधि, गायनवादनानें बुद्धिहीन होतात. अग, गायनाचा जलसा आणि जलविहार यांची जोडी सजली म्हणजे ऋषींच्या खोडी कोठें ग उरतील ? आणि पहा, आपला तो यमन राग आळवला म्हणजे, ऋषींचे मन पुढें गमनच करणार नाहीं, हा ठाम सिद्धांत. वैजयंती ! तिकडे कसला ग गलबलासा ? देवी ! ते पहा ऋषीकुमार सरस्वती नदींत स्नान करण्यास जात आहेत. वैजयंती ! तर आम्ही जरा दूरच होऊं. देवी ! इतकी भितेस का ? तो शिष्यवर्ग आम्हांस पाहून पळत सुटेल, तर आम्ही त्या वरच्या शिलेवर बसून जरा गंमत पाहूं. हे पहा :
पद (चाल-तृणपणहि०)
सरस्वतीच्या निर्मल जिवनीं अघमर्षण हे किती करिती ।
पोहति कैसे मत्स्यासम हे, कच्छप तैसे जालें बुडंती ॥
देह जलांतरिं माना वरती अहंपूर्विका कुणि करिती ।
बद्धासन घालुनी जलावरि ध्यान कराया किती बसती ॥१॥
वैजयंती ! पाहिलेंस ना इकडे सरस्वतीच्या जलांत ?
पद (चाल-सदर)
निर्मल नभिंचा तारागण तो स्वच्छ जलांतरिं किति दिसत ।
विश्वविरामा विमल चंद्रमा सरस्वतीजल शोभवितो ॥
शुक्रगुरुसह लोहितांग हा मंगल जल मंगल करितो ।
मंद पवन हा लहरी देउनि शांत मनाला सुखवीतो ॥१॥