महाकवि कालिदास !
आषाढ शु. १ हा दिवस भारताचा महाकवि कालिदास याच्या स्मृतीसाठीं मानण्यांत येतो.
या थोर कवीचें जीवनचरित्र उपलब्ध नाहीं. साहित्यशास्त्रावर ग्रंथ लिहिणारा रसिक पंडित आनंदवर्धन यानें म्हटलें आहे: “जगतांत कालिदासादि दोनचार किंवा पांचसहा माणसांनाच फार तर महाकवि म्हणतां येईल.” जयदेव कवीनें तर कालिदासाला ‘कविकुलगुरु’ ही पदवी अर्पण केली आहे. बाण कवि कालिदासाच्या काव्याला मधुरसानें थबथबलेल्या मंजिरीची उपमा देतो. ‘पृथ्वीवर राहूनहि स्वर्गसुखाचा अनुभव कोणास घ्यावयाचा असला तर त्यानें शरद्ऋतूंतील चंद्रकिरण, शर्करायुक्त दूध, तारुण्यांतील मादक नवाळी, कोमलांगी युवती आणि कालिदासाची कविता यांचे सेवन करुन पाहावें असा अभिप्राय भारतीय रसिकांनीं व्यक्त केला आहे. पाश्चात्य विव्दानांनींहि कालिदासाची महती ओळखली आहे. ‘कालिदास हा भारतीय शेक्सपियर होय’ ही उक्ति मोनियर वुइलियम्सच्या प्रस्तावनेंतच प्रथम सार्थ पावली. प्रसिध्द जर्मन कवि गटे यांने असे उद्गार काढलें कीं, “स्वर्ग आणि पृथ्वी यांचें मधुर मीलन जर कोठें पाहावयाचें असेल, आणि तारुण्याची टवटवी व परिपकतेचीं फळें जर कोणास एके स्थळीं असलेलीं बघावयाचीं असतील तर मी शाकुंतलाकडे बोट दाखवीन.”चेझी नांवाचा रसिक शाकुंतलांतील ‘आलक्ष्यदन्तमुकुलान्’ हा वत्सलरसपूर्ण श्लोक वाचून आनंदानें नाचूं लागला.
“कालिदासाचा जन्म ब्राह्मणकुलांत झाला. माळव्यांतील उज्जयिनीस तो राहत असे. तो शिवभक्त असून राजकवि होता. श्रुति, स्मृति, इतिहास, पुराणें, योग, सांख्य, अव्दैत वेदान्त, ज्योति:शास्त्र, कामशास्त्र, वैद्यक, व्याकरण, अर्थशास्त्र, संगीत, चित्रकला, आदि शास्त्रांचा आणि कलांचा त्यास उत्तम परिचय होता. ठिकठिकाणीं प्रवास करुन रीतीभातींचें आणि लोकस्थितीचें ज्ञान त्याला उत्तम तर्हेनें प्राप्त झालें होतें. राजदरबार, युध्दें, संधि, राजशासन यांची त्यानें जवळून माहिती करुन घेतली होती ... तो वृत्तीनें रंगेल असला तरी गृहस्थाश्रमाची पवित्रता व एकनिष्ठ पत्नीप्रेम याची त्याला पूर्ण जाणीव होती”