आषाढ व. ३
शके १५४४ च्या आषाढ व. ३ रोजीं हिन्दी भाषेचे महाकवि रामभक्त तुलसीदासची यांनीं असी घाटावर देहत्याग केला.
तुलसीदासांना रामकृपा झाल्यावर शंकरांनीं संदेश दिला कीं, ‘तुम्ही लोकभाषेंत काव्यरचना करुन रामचरित्र स्पष्ट करा.’ याप्रमाणें अयोध्येंला येऊन संवत् १६३१ च्या रामनवमीला त्यांनीं आपल्या विख्यात रामचरितमानस ग्रंथाला सुरुवात केली. दोन वर्षे सात महिने सव्वीस दिवसांनीं ग्रंथाची समाप्ति झाली. लोकभाषेंतील या काव्याविरुध्द कांहीं लोकांनीं गवगवा केला. तरी ग्रंथ आपल्या गुणांनीं लोकप्रियता मिळवूं लागला. सुप्रसिध्द पंडित मधुसूदन सरस्वतिहि यांच्यापाशीं चर्चा करण्यास आले; व शेवटीं प्रसन्न होऊन त्यांनीं पुढील उद्रार काढले:
“आनन्दकानने ह्यस्मिञ्ञड्गमस्तुलसीतरु:
कवितामजरी भाति रामभ्रमरभूषिता ॥”
तुलसीदासांच्या मित्रमंडळींत नबाब अब्दुल रहीम खानखाना, महाराजा मानसिंग, नाभाजी आदि मोठमोठे लोक होते. केशवदास, सूरदास यांच्या भेटी तुलसीदासांनीं घेतल्या होत्या. यांची ग्रंथसंपत्ति पुढीलप्रमाणें आहे: रामचरितमानस, कवित्त रामायण, दोहावली, रामगीतावली, रामाज्ञा, बरवै रामायण, रामलला नहछु, वैराग्यसंदीपनी, कृष्णगीतावली, पार्वती मंगल, जानकी मंगल, रामसतसई, ननुमद बाहुक इत्यादि. यांपैकीं रामचरितमानस हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ लोकमान्य झाला असून याच्या कोटयवधि प्रती आजपर्यंत खपल्या आहेत. राजाच्या महालापासून गरिबाच्या झोंपडीपर्यंत याचा प्रसार आहे. एके दिवशीं कलियुगानें मूर्तरुप धारण केलें व तो तुलसीदासजीजवळ येऊन त्यांना एक ‘विनयपत्रिका’ लिहिली तिची प्रसिध्दि हिन्दी वाड्गमयांत मोठीच आहे. अर्वाचीन कालांतील साधु पुरुष स्वामी रामतीर्थ हे तुलसीदासांच्या वंशांतीलच होत.
- ३० जुलै १६२२
--------------------
आषाढ व. ३
माधवरावांस पेशवाई !
शके १६८३ च्या आषाढ व. ३ या दिवशीं माधवराव पेशवे यांना वयाच्या सतराव्या वर्षी पेशवाईचीं वस्त्रें मिळालीं. त्या वेळची बिकट परिस्थिति आणि माधवरावांची योग्यता यांचें वर्णन कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणुकीं’त स्वा. वी. सावरकर यांनीं पुढीलप्रमाणें केलें होतें: -
“हिंदुपदपादशाहीची पानपतच्या भयंकर रणकंदनानें दुर्दशा झाली आहे. दोन लाख बांगडी फुटल्यामुळें महाराष्ट्रांतून प्रत्येक घरांतून अबलांच्या हृदयद्रावक किंकाळ्या व वृध्द मातापितरांचे हंबरडे ऐकूं येत आहेत. स्वराज्य - प्रासादाचे स्तंभ जे सरदार लोक ते खाल्ल्या घरचे वासे मोजूं लागले आहेत. नुकताच उद्रीरच्या लढाईत बडविलेला निजाम, म्हैसूरचा हैदर, रोहिलखंडाचा नबाब, असे एक ना दोन अनेक जण पेशवाईच्या नाशासाठी “व्रणार्त पशुच्या शिरावरि वनीं उभे काकसे” राहिले आहेत. दोन महिन्यांत स्वकुलगृहाचे तीन आधारस्तंभ पडल्यानें वरील इमारत डळमळूं लागली आहे. होळकर, भोसले, बुंदेले, इत्यादि कृतघ्र सरदार खुशाल तमाशा पाहत उभे आहेत. अशा आणीबाणीच्या प्रसंगीं सतरा वर्षाचें पोर - कीं ज्या वयांत स्वत:च्या शरिराचीहि शुध्द नसते, व भावंडांतील कलह मिटविण्याची अक्कल नसते - अशा अल्प वयांत हा राजबिंडा माधव प्रपितामहांनीं संपादन केलेल्या व पितृपितामहांनीं अटकेस नेऊन भिडवलेल्या जरिपटक्याचा असह्य तोल सांभाळण्यास दंड ठोकून उभा राहिला. आणि अवघ्या दहा वर्षाचे आंत मराठयांची कर्तबगारी जनतेला दिसून आली.”
माधवराव पेशवे हे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे व गोपिकाबाई यांचे दुसरे चिरंजीव. “माधवराव केवळ सत्याचा पक्षपाती असून थाटमाट, चैन किंवा आराम त्यास बिलकूल खपत नसे. सत्य हें खडतर व कष्टसाध्य असतें; त्याचीच मूर्तिमंत प्रतिमा माधवराव होता. आपण राष्ट्राचे सेवक आहोंत अशी त्याची एकनिष्ठ भावना होती. आणि त्याचा कारभार सर्वस्वीं लष्करी बाण्याचा होता. वाटाघाटींत किंवा विचारांत निष्कारण वेळ न घालवितां झटपट काम करुन सर्वागीण प्रगति संपादण्याकडे त्याचें लक्ष असें.”
- २० जुलै १७६१