आषाढ वद्य ६
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
लोकमान्य टिळकांचा जन्म !
शके १७७८ च्या आषाढ व. ६ रोजीं हिंदुस्थानांतील राजकीय असंतोषाचे जनक, थोर राजकारणी मुत्सद्दी, वृत्तपत्रकार, वेदादि प्राचीन वाड्गमयाचे अभ्यासक व संशोधक, आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे’ या मंत्राचे द्रष्ट्रे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला.
टिळकांचा जन्म ज्या कोंकण भूमींत झाला तेथूनच त्यांनीं आपले स्वभावविशेष निवडले होते. “रत्नागिरीच्या जन्मभूमीपासून तांबूस व स्निग्ध मातीच्या तेजाचें अनुकरण त्यांच्या डोळयांनीं केलें होतें. समुद्रापासून त्यांनीं खोल स्वभाव व सर्वसंग्राहकपणा घेतला होता. सह्याद्रीपासून त्यांनीं आपल्या आकांक्षाचा उत्तुंगपणा घेतला होता. कोंकणी खडकाळ कांतळांतून त्यांच्या निश्चयी मनाचा कठोरपणा निर्माण झाला होता. कोंकणच्या किंचित् पित्तकारक; पण एकंदरींत निरोगी अशा हवेचें अनुकरण त्यांच्या स्वभावानें केलें होतें. नारळाप्रमाणें त्यांच्या अंतरंगांतील गुणग्राहकतेचें मधुर जल त्यांच्याशीं निष्ठापूर्वक वादाची टक्कर खेळणारासच मिळे. फणसाप्रमाणें त्यांची रीतभात वरुन खडबडीतच होती; पण कांटेरी फणसांत जसे रसाळ गरे असतात, तसेच त्यांच्या पोटांत शिरणाराला सरळ युक्तिवाद व प्रेमळ भावना सांपडत.”
सन १८०० च्या सुमारास विष्णुशास्त्री चिपळूनकर यांनीं काढलेल्या न्यू. इं. स्कूलला जाऊन टिळक मिलाले. ‘केसरी’, ‘मराठा’ हीं पत्रें नांवारुपाला चढून ‘केसरी’कार टिळक म्हणून त्यांची कीर्ति वाढूं लागली. स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीच्या जोरावर त्यांनीं सर्व देशाला जागृत केलें. सन १९०८ मध्यें त्यांच्यावर राज्यद्रोहाचा खटला होऊन त्यांना सहा वर्षाची काळया पाण्याची शिक्षा झाली. बंदिवासांत त्यांच्या प्रसिध्द ‘गीतारहस्याचा’ जन्म झाला. वैदिक संस्कृति आणि वाड्गमय यांचा अभ्यासहि टिळकांचा फार मोठा होता. त्याचींच फळें म्हणजे त्यांचे विव्दन्मान्य असे ‘ओरायन्’ व ‘आर्क्टिक होम इन दी वेदाज्’ हे इंग्रजी ग्रंथ होत. याखेरीज ‘ए मिसिंग व्हर्स इन् सांरख्यकारिका’ हेंहि पुस्तक त्यांनीं लिहिलें आहे. ‘केसरीं’ तील त्यांचे लेखहि वैशिष्टयपूर्ण आहेत.
- २३ जुलै १८५६
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2018
TOP