आषाढ वद्य ३०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
राजे जयसिंग यांचें निधन !
शके १५९८ च्या आषाढ व. ३० रोजीं मानसिंगाच्या वंशांतील प्रसिध्द राजा मीर्झा जयसिंग यांचें निधन झालें.
जयसिंग यांचें वजन शहाजहान व औरंगजेब यांच्या दरबारांत चांगलें होतें. शिवाजी राजे यांना पकडून आणण्यासाठीं औरंगजेबाकडून यांची योजना झाली होती. श्रीशिवाजीमहाराजांनीं या श्रेष्ठ सरदाराला लिहिलेलें पत्र स्वाभिमानानें रसरसलेलें आहे: “हे श्रेष्ठ सरदारा, तुझ्यामुळें रजपुतांची मान उन्नत झाली आहे... मी असें ऐकिलें आहे कीं, मजवर हल्ला करण्यासाठीं व ‘दख्खन’ जिंकण्यासाठीं तूं आला आहेस. हिदूंचे हृदय व नेत्र यांच्या रक्तानें तूं जगांत यशस्वी होऊं पाहत आहेस; तुझ्या हें ध्यानांत येत नाहीं किं, याने तुझ्या तोंडास काळोखी फांसली जात लाहे... या तुझ्या कृत्यानें देशावर व धर्मावर आपत्ति ओढवलेली आहे... जर तूं आपण होऊण दक्षिण देश जिंकण्यास आला असतास तर माझें शरीर व डोळे मी तुझ्या वाटेवर बिछान्याप्रमाणें पसरले असते. मी तुझ्या घोडयाबरोबर मोठी सेना घेऊन आलों असतों.... पण तूं सज्जनांना फसविणार्या औरंगजेबाच्या थापांना भुलून इकडे आला आहेस... जेव्हां अफझलखान व शास्ताखान यांचे हातून काम होईनासें दिसलें तेव्हां तुझी योजना झालेली दिसते. ... आम्हां लोकांशीं युध्द खेळून हिंदूंचें शिर धुळीस मिळवण्याचें काम मात्र तूं करुं नकोस. जर तुझ्या तीक्ष्ण तरवारींत पाणी असेल व घोडयांत दम असेल तर हिंदु धर्माच्या शत्रूवर हल्ला करुन इस्लामचें जडमूल खोडून टाक ... आजवर तूं किरकोळ लोकांशीं खेळलास म्हणून तुझा दम कायम आहे. पण तूं आतां सिंहाशीं युध्द करण्याची धिटाई धरुन आला आहेस. या धांवपळींत तुला काय मिळणार ? तूं मृगजळाच्या पाठीमागें व्यर्थ धांवत आहेस. आमचीं पोरेंबाळें, देश, धन, देव व पवित्र देवपूजक या सर्वावर पराकाष्ठेचें दु:ख कोसळलें आहे. आणि हाच क्रम आणखी काम्हीं दिवस चालला तर आम्हां हिंदु लोकांचें नांव सुध्दां या पृथ्वीवर राहणार नाहीं.... आम्हीं लोकांनीं या वेळीं हिंदु, हिंदुस्थान व हिंदु धर्म यांच्या संरक्षणासाठीं फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत.”
- ११ जुलै १६६७
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2018
TOP