आषाढ शुद्ध ११
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
शयनी एकादशी !
आषाढ शु. ११ हा दिवस महाएकादशी म्हणून प्रसिध्द असून याला शयनी एकादशी असेंहि नांव आहे.
एकादशीच्या उत्पत्तीसंबंधानें अशी कथा सांपडते. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य हा शंकराच्या कृपेमुळें अमर होऊन देवांना त्रास देऊं लागला होता. ब्रह्मा - विष्णु वगैरे देव भिऊन गेले व त्यांनीं त्रिकूट पर्वतावर धात्री झाडाखालीं एका गुहेचा आश्रय केला. अर्थात् तेथें त्यांना उपोषण घडलें. त्याच स्थानीं त्यांच्या श्वासापासून एक दिव्य शक्ति निर्माण झाली. तिनें दाराशीं टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याचा नाश केला. हिचेंच नांव देवी एकादशी. हिच्यांत सर्व देवांचें तेज एकवटलेलें असल्यामुळें शिव व विष्णु या दोनहि देवांच्या भक्तांत एकादशी प्रिय झाली.
या दिवशीम विष्णु शयन करतात; चातुर्मासाचा आरंभ याच दिवशीं होतो. भारतीय संस्कृतींत विष्णुदेवतेला फारच महत्त्वाचें स्थान आहे. यालाच नारायण, वासुदेव अशींहि नांवें आहेत. याच देवाच्या वैष्णवधर्मास मोठेंच महात्म्य प्राप्त झालें आहे. याच धर्माचा विकास कालांतरानें भागवत धर्मात झाला. भक्तिप्रेमाला महत्त्व देऊन शुद्र, अतिशूद्र यांनाहि या धर्मात परमेश्वराचा मार्ग मोकळा झाला. ‘उंच नीच कांहीं नेणें हा भगवंत’ असें तत्त्वज्ञान रुढ झालें. महाराष्ट्रांत तर या भागवत धर्मानें फारच प्रगतिकारक असें कार्य केलें आहे. ज्ञानेश्वर - नामदेवांच्या काळांत या भागवत धर्माच्या मंदिराचा पाया घालण्यांत आला आणि तुकारामबोवांनीं भगवद्भक्तीचा कळस त्यावर चढविला. आषाढी एकादशीस पंढरपुरास आजहि दोन दोन लाखांची यात्रा भरत असते. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, निवृत्तिनाथ, मुक्ताबाई, मत्स्येंद्रनाथ, सोपानदेव, सांवतामाळी यांच्या पालख्या आजहि मोठया थाटानें मिरवीत मिरवीत पंढरपुरास जात असतात. या वारकरी सांप्रदायानें लोकजागृतीचें काम सतत साताआठशें वर्षे करुन देशाची मोठीच सेवा केली आहे. परमार्थाच्या प्रांतांत लोकशाहीचें रुप विकसित करण्यांत या पंथास चांगलेंच यश आलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2018
TOP