ज्ञानोदय भजनी मालिका - परिचय

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


’ ज्ञानोदय भजनी मालिका ’ हा ग्रंथ व या ग्रंथाचे कर्ते ह. भ. प. गणपती महाराज केरुरकर यांचे संबंधी मी दोन शब्द लिहिणें म्हणजे कस्तुरीचा वास शपथ शपथ पूर्वक सांगण्यासारखे आहे. कस्तूरी ही स्वसंवेद्य स्वानुभवानेंच आपली उत्कृष्टता पटवीत असतें त्याप्रमाणे सदग्रंथाची उपयुक्तता अथवा महात्म्य स्वयंसिध्दच आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज  इत्यादि संतांनीं सुरुं केलेला हा भजनी सांप्रदाय सर्व सांप्रदायांत एकमेव अद्वितिय असा सांप्रदाय असून याची महती आतांशा लोकांना पटूं लागली आहे. असे आह्मी नि:संशय ठासून सांगू शकतो. काँलेजीय अथवा उच्चशिक्षण घेतलेल्या सुशिक्षिताला सुध्दां ॥ ’ सुखदु:खे सअमे कृत्वा लाभाला भौ जयाजयौ ’ ॥ या भगवद उक्ती प्रमाणें आपल्या चित्ताची समता साधतां येत नाही, किंबहुना त्याचेसर्व शिक्षण मन: संयमादि व्यापारात कुचकामी निरुपयोगीच ठरते हे सिध्द झाले आहे. म्हणून चित्ताच्या स्थिरतेसाठी अथवा स्थितप्रज्ञ होण्यासाठी अगदी सरळ सोपा सुटसुटीत सर्व
धर्मात सर्व श्रेष्ठ ठरलेला मार्ग तो म्हणजे भजनी सांप्रदाय, यालाच वारकरी पंथ असेही म्हणतात. मनुष्याला निर्द्वेषी निर्लोभी निरहंकारी बनवून सरळ सोप्या मार्गानें परमेशचरणसांन्निध्य प्राप्त करुन देणारा व ऐहिकें व पारमार्थिक हित साधून देणारा जर मार्ग असेल तर हा एकच एक पंथ आणि तो म्हणजे ’ भजनी सांप्रदाय ’ हा होय, यांत भेदभाव नाही, उच्चनीच नाही, श्रीमंत गरीब नाही, पंडित-अपंडितभाव सुध्दा नाही. हाती टाळ घेऊन भजनांत एकदां टाळी लागली की; त्याच्या चित्ताची  निर्द्वेष निर्लोभ निरहंकारी निरासक्त निर्मत्सर जी आर्द्रता होते जो चित्ताचा लय साधतो साधकांस जी तंद्री लागते भगवच्चरण कमलांचे ठिकाणी जी एकतानता होते. हीच साधकाची चित्तस्थिती मोक्षोपयोगी होय किंबहुना संसार जालातून प्राप्त झालेली मुक्ति, दु:खसागरांतून तारणारी होडीच तो साध्य करतो व स्थितप्रज्ञ भूमिकेला अनायासे पोहचतो. अशी निर्मम निर्द्वेष भूमिका भजनी सांप्रदायाशिवाय दुसर्‍या कोणत्याही मार्गानें इतकी त्वरित साधत नाही. हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर अहिंसा, सत्यपालन य तत्वांच्या जोपासनेवर भर दिला जात आहे. परंतु या तत्वांना मुलभूत पोसणारी किंवा ज्याच्या आधारावर मनुष्य स्वत: लीलेनें अहिंसामय व सत्यपालन करणारा होतो. स्वप्नीसुध्दां त्याचे हातून हिंसात्मक आचार व सत्यभ्रष्टतां जर होऊ नये असे वाटत असेल तर त्याला याच सांप्रदायाची कांस धरली पाहिजे. या भजनी सांप्रदायाचे महत्व आता सुशिक्षितांना सनातन्यांना धार्मिकांना अधार्मिकांना पटूं लागले आहे. यवरुन हा एकच पंथ अधिक पुढें येणार आहे. कारण हा सर्वभेदातीत अत्यंत निरुपाधिक व सर्वसामावेशी आहे. हे या पंथाचे सत्य मर्म आहे. अशा या भजनी सांप्रदायावर उपलब्ध असा प्रामाणिक व परंपरेनें प्रचलित भजनी संग्रहाच्या ग्रंथाची अत्यंत तीव्रतेनें आवश्यकता होती. ह. भ. प. गणपती महाराज यांनी ही उणीव भरुन काढून संत वाड.मयांत अमोल नि:संशय भर टाकली आहे. त्यांना स्वत:ला दृष्टि नसतांना केवळ स्मरण शक्तिवर दुसर्‍याचे हातानें लिहून अत्यंत महत् परिश्रमानें व भक्तिभावानें आपले तन, मन, धन, किंबहुना सर्वस्वशक्ति वेचून सहस्त्रावधि लोकांना सन्मार्ग दर्शक
असे हे ज्ञानोदय भजनी मालिकेचे कार्य पूर्ण केले आहे. कोणतेही लोकोपयोगी कार्य करणार्‍या महंतांची पुण्यवान संत लोकांत गणना होत असते. ह. भ. प. गणपती महाराज यांच्या या ग्रंथपूर्तीमुळे त्यांची संतमालिकेतच गणना होत आहे. त्यांचे ठिकाणी अनेक संत लक्षणी बाणलेली आहेत. अशा या भगवत्‍ भक्ताच्या कृतीचे भजनी मंडळीच्या उपयुक्ततेनें श्रमसाफल्य होवो हीच प्रार्थना.

N/A

References : N/A
Last Updated : December 07, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP