प्रथम या स्कंधांत मागध, प्रद्योत, शिशुनाग, नंद, मोर्य, शुंग, कण्व व आंध्र या वंशांची वंशावळ सांगून त्यांतील कांहीं
वंशाच्या पुढील पिढयांचीही नामावलि दिली आहे. तसेंच हीं नगरें व देश यांतील राजे आणि तेथील अवनतीचेंही वर्णन
केलें आहे.
नंतर कलियुग व कल्कीअवतार सांगून कालमर्यादा, चारी युगांतील लोकस्थिति व युगांची लक्षणें सांगितलीं आहेत.
यातील कलीचें वर्णन आज तंतोतंत प्रत्ययाला येत असलेले पाहून आश्चर्यानें मति गुंग होते. येथें कल्पकाल आणि
प्रलयाचे प्रकारही सांगितले आहेत. नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक आणि नित्य असे प्रलय सांगून त्यांची लक्षणेंही येथे
कथन केलेली पहावयास मिळतात.
येथें भागवत-कथन संपलें. आतां याचें लोकोत्तर फल असें. याच्या श्रवणानें जन्म-मरणाचें भय नाहींसें होतें. सर्वत्र एक
परमात्माच भरलेला आहे हा अनुभव भागवत-चिंतनानें येतो. परीक्षितीसारख्या उत्तमोत्तम श्रोत्यानें याचा साक्षात् अनुभव
घेतला. आणि श्रीशुकमहामुनींच्या आशीर्वादानें आणि अनुज्ञेनें त्यानें त्यांची प्रेमभावानें पूजा केली व गंगातीरावर पूर्वाग्र
दर्भासनावर बसून परीक्षित राजा ब्रह्मचिंतनांत निमग्न झाला. वेळ समीप आली. ठरलेल्या भवितव्यानुसार तक्षक, ब्रह्मणाचें
सोंग घेऊन आला. व त्यानें राजाला दंश केला व त्याचा देह भस्मसात् करुन टाकला. राजास सद्गति लाभली.
देव आनंदित झाले व त्यांनीं दुंदुभिनाद करुन पुष्पवर्षाव केला.
शेवटीं, पित्याच्या मृत्युनें दु:खी झालेल्या जनमेजयानें केलेलें सर्पसत्र, हें सर्व घडविणार्या मायेचे खेळ, वेदांची उत्पत्ति,
पुराणांची नांवें, मार्कंडेयांस मायेचा अनुभव व वटपत्रस्थ प्रभुदर्शन आणि शिवदर्शन, विराटपुरुषवर्णन, सूर्यव्यूहवर्णन,
संपूर्ण भागवताची अवतरणिका, नाम, गुण व भक्तीची श्रेष्ठता व ग्रंथपठनाची फलश्रुति हे विषय सांगितले आहेत.
अंती त्या मायानिवारक नारायणाला व भगवान् शुकांनां वंदन केल्यावर भगवान् कूर्मास वंदून सर्व पुराणांची श्लोकसंख्या
सांगितली आहे. नंतर भागवतप्रतिपादनाचें प्रयोजन, त्यांतील मुख्य विषय, ग्रंथदानांचें फल, पुनः भागवताचें माहात्म्य व
त्याची परंपरा सांगून सूतांनीं भगवंताची " तुझ्या पदकमलीं लीन झालेल्या या दासावर कृपा कर " अशी प्रार्थना करुन
ग्रंथ संपविला आहे.