स्कंध १२ वा - अध्याय १० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥८२॥
निवेदिती सूत जोडूनि तै पाणि । ईश्वरासी मुनि शरण जाई ॥१॥
म्हणे नारायणा, मायेचा प्रभाव । कळला अपूर्व मज आतां ॥२॥
भक्तिरहित ते भ्रमतील थोर । ऐसें हें अपूर्व मायाबल ॥३॥
पाहुनि जे शांति लाभली मुनीसी । वर्णवेल कैसी कवणासी ते ॥४॥
पुढती एकदां परिवारासवें । हिंडतां शिवातें दिसला मुनि ॥५॥
पार्वती तैं बोलें शिवासी महेसहा । पहा ही शांतता अलौकिक ॥६॥
सिध्दिदात्या यातें अर्पा निज सिध्दि । बोले पार्वतीसी तदा शिव ॥७॥
वासुदेव म्हणे भक्तांचे ह्र्दय । जाणे सदाशिव न कळे अन्या ॥८॥

॥८३॥
शिव म्हणे प्रियें ब्रह्मानंदमग्न । भक्त इच्छिती न मोक्षातेंही ॥१॥
अप्राप्य तयांसी मग काय असे । अर्पावें मी यातें काय मग ॥२॥
सज्जनसंगतिमहिमा अपूर्व । भेटावें यास्तव मुनीलागीं ॥३॥
संभाषणें मोद पावूं क्षणभरी । बोलूनि यापरी शिवसांब ॥४॥
संन्निध मुनींच्या पातले तत्काल । परी देहावर नव्हते मुनि ॥५॥
जाणूनि शिवानें आणिली जागृति । प्रवेशूनि चितीं सूक्ष्मरुपें ॥६॥
वासुदेव म्हणे तदा अन्यरुप । पाहूनि मुनींस नवल वाटे ॥७॥

॥८४॥
विद्युल्लतेसम पिंगट त्या जटा । त्रिनेत्र त्या भुजा दश ज्यासी ॥१॥
पंचवदन जो देव सूर्यासम । कांति, व्याघ्रचर्म त्रिशूलही ॥२॥
खट्‍वांग, डमरू तेंवी अक्षमाला । खड्‍गही कपाला करीं धरी ॥३॥
धनुर्धारी रुप पाहुनि शिवाचें । पूजिले तयातें मुनींद्रानें ॥४॥
मग प्रार्थूनियां म्हणे सर्वेश्वरा । काय व्हावी सेवा मज सांगा ॥५॥
विरक्त तूं सद त्रिगुण हे तव । उत्पत्ति संहार करिसी तेणें ॥६॥
वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । वंदिलें शिवातें मार्कंडेयें ॥७॥

॥८५॥
सज्जनाआधार शिव तैं मुनीसी । आनंदे बोलती काय ऐका ॥१॥
ब्रह्मा, विष्णु आम्हीं सकल समर्थ । मुने, माग वर इच्छिसी तो ॥२॥
मोक्षही अर्पाया समर्थ आम्हीचि । पाहूनि भक्तांसी धन्य आम्हीं ॥३॥
इंद्रादि वंदिती तुम्हां, न नवल । आम्हीही केवळ तुमचे दास ॥४॥
सर्वत्र जे सम श्रेष्ठ ते आम्हांसी । तिर्थाहुनि त्यांची महति थोर ॥५॥
दर्शन स्मरण तेंही पापनाशी । अधिकार तुम्हांसी ऐसा असे ॥६॥
सहवास मग कां न उध्दरील । म्हणे वासुदेव पुढती ऐका ॥७॥

॥८६॥
मार्कंडेय म्हणे आमुचें स्तवन । ऐसें हें ऐकून नवल वाटे ॥१॥
धार्मिकांची स्तुति धर्मरक्षणार्थ । करीतसां स्पष्ट ऐसें वाटे ॥२॥
वास्तविक तुज कांही न बंधन । परी तें शिक्षण साधकांसी ॥३॥
नम्रभावें ऐशा लघुत्व न तुम्हां । मायावी जैं नाना करी माया ॥४॥
परी अलिप्त तो सर्वदा क्रीडेंत । तेंवी तूंही प्रभो, जगत्शास्ता ॥५॥
भक्त-भगवंतीं दृढभक्ति देई । इच्छा हेचि पाहीं पूर्ण करीं ॥६॥
वासुदेव म्हणे ऐकूनि शंकर । अर्पिती त्या वर ऐका काय ॥७॥

॥८७॥
मुनीश्वरा, तव पाहूनियां निष्ठा । पुरवीन इच्छा सकल तव ॥१॥
कल्प एक तुज लाभेल आयुष्य । अविच्छिन्न यश पुण्यप्रद ॥२॥
त्रिकाल ज्ञानही लाभेल तुजसी । आत्मानात्मबुध्दि पावसील ॥३॥
पौराणिक मुनें, होसील तूं श्रेष्ठ । वर ऐसें सांब अर्पी तया ॥४॥
बोलूनि शंकर होती अंतर्धान । मोदें त्या भ्रमण करी मुनि ॥५॥
सूत ऐशापरी कथी मुनिप्रति । पाही वटपत्रीं हरिसी मुनि ॥६॥
प्रलयाभास हा, नव्हता प्रलय । कथा ही ऐकेल तया मुक्ति ॥७॥
वासुदेव म्हणे श्रवणें सद्‍भाव । तेणेंचि अपूर्व यत्न होई ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP