॥१०८॥
निवेदिती सूत ऋषीहो, विरंचि । शिव, इंद्रआदि सकल देव ॥१॥
दिव्यशब्दें ज्यांची करिताती स्तुति । विप्र वर्णिताती वेदें जया ॥२॥
एकाग्र चिंतनें ध्याती जया योगी । अंत कवणाही जयाचा न ॥३॥
नमस्कार तया नारायणा माझा । अगाध तयाचा महिमा जगीं ॥४॥
मंदर तो पृष्ठी भ्रमण करितां । लीलेनें जो निद्रा घेई जळीं ॥५॥
भौतिक हे शक्ति क्षुद्र त्या पुढती । भरति - ओहोटी श्वासोच्छासें ॥६॥
कूर्माच्या, अद्यापि क्रम तोचि चाले । महात्म्य वर्णावें रुप त्याचें ॥७॥
भगवान कूर्म जगाचें कल्याण । करो, त्या नमन सर्वकाल ॥८॥
वासुदेव म्हणे अवतारलीला । करी जो तयाला नमस्कार ॥९॥
॥१०९॥
ऋषी हो, ऐकावी संख्या पुराणांची । तेंवी भागवतीं कथिलें काय ॥१॥
प्रयोजन, दानफल तैं माहात्म्य । करितों निवेदन श्रवण करा ॥२॥
दशसहस्त्र ते श्लोक जाणा ब्राह्मीं । पंचोनषष्ठी पाद्मीं श्लोक जाणा ॥३॥
विष्णुपुराणीं ते जाणा त्रयोविंश । शिवपुराणांत चतुर्विश ॥४॥
भागवती अष्टादश, नारदांत । पंचवीस सहस्त्र अस्ती श्लोक ॥५॥
मार्कंदीं ते नव, पंचदश चतुः शत, ते अग्नींत संख्या जाणा ॥६॥
सार्ध चतुर्दश भविष्यपुराणीं । त्या ब्रह्मवैवर्ती अष्टादश ॥७॥
लिंगपुराणी तें एकादश संख्य । सहस्त्र ते श्लोक निवेदिले ॥८॥
वासुदेव म्हणे वाराही सहस्त्र । चतुर्विश श्लोक संख्या असे ॥९॥
॥११०॥
सहस्त्र ते एकाशीति एकशत । स्कंद पुराणांत असती श्लोक ॥१॥
दशसहस्त्र ते वामन पुराणी । सप्तदश कूर्मी सहस्त्र ते ॥२॥
मत्स्यपुराणांत चतुर्दश संख्य । श्लोक ते सहस्त्र निवेदिले ॥३॥
एकोन विंशति गरुड पुराणीं । द्वादश घ्या ध्यानी ब्रह्मांडांत ॥४॥
चार लक्ष ऐसें पुराणांचे श्लोक । ग्रंथामाजी स्पष्ट कथन केलें ॥५॥
वासुदेव म्हणे श्लोकसंख्या ऐसी । दक्षतेनें घ्यावी ध्यानामाजी ॥६॥
॥१११॥
त्रस्त विरंचीतें मूळ भागवत । कथी भगवंत स्वयें मोदें ॥१॥
आदि-मध्य-अंतीं वैराग्यचि येथें । हर्ष सज्जनांचे प्रतिपाद्यानें ॥२॥
वेदसार एक अद्वैत विषय । प्रतिपाद्य येथ ध्यानी असो ॥३॥
मोक्षप्राप्ति हेंचि प्रयोजन येथ । भाद्रपदीं ग्रंथदान व्हावें ॥४॥
पौर्णिमेसी स्वर्णसिंहासवें देतां । सद्गति अर्पित्या लाभतसे ॥५॥
वासुदेव म्हणे ग्रंथदानें पुण्य । जोडूनियां जन्म धन्य व्हावा ॥६॥
॥११२॥
पुराणांत श्रेष्ठ जाणा भागवत । वेदांचें रहस्य कथिलें येथें ॥१॥
अद्वितीय बोध होतां या ग्रंथीचा । रुचि अन्य ग्रंथांमाजी नसे ॥२॥
भागवत जेणें जाणिलें न त्यासी । अन्य पुराणांची महति वाटे ॥३॥
सरितांत गंगा, देवांत अच्युत । वैष्णवांत शिव श्रेष्ठत्तम ॥४॥
क्षेत्रांमाजी काशी, तेंवी हें पुराणीं । मुक्ति लाभे जनीं याचि ग्रंथें ॥५॥
नारायण, ब्रह्मा, नारद पुढती । व्यास-शुक यांची परंपरा ॥६॥
आदिप्रवर्तका, तया नारायणा । तेंवी त्या मुनींना नमन असो ॥७॥
वासुदेव म्हणे भक्तश्रेष्ठांप्रति । नमस्कार अंतीं असो माझा ॥८॥
॥११३॥
ॐकारस्वरुपा, अनादि अनंता । श्रीमद्भागवता प्राकृता या ॥१॥
गाऊनि ’ अभंगी ’ भवभयभंगें । रंगूनि स्वानंदे दंग झालों ॥२॥
वर्णू कैसा तरी आनंद हा आत । मूका वाचळता नवल न हें ॥३॥
पंगूही पर्वत उल्लंघूनि जाई । अशक्य न कांहीं भगवंतासी ॥४॥
मूकासी वाचाळ पंगूसी चपळ । करुनि नवल पुढती करी ॥५॥
वक्ता तोही मूक चपळ पांगळा । अतर्क्य ही लीला ब्रह्मबोधें ॥६॥
भागवतगानें करुनि अकर्ता । असूनि नसता जाहलों मी ॥७॥
मी तूं पण गेलें सकळ विलया । परी तूंचि देवा, आदि-अंतीं ॥८॥
वासुदेव म्हणे श्रीकृष्ण गोविंद । एकचि हा छंद उरला आतां ॥९॥
॥११४॥
नारायणा, आतां तुज प्रार्थना हे माझी ।
चरणारविंदीं जडो जन्मोजन्मीं भक्ति ॥१॥
नामघोषें तुझ्या सर्व पातकांचा नाश ।
लोटांगणें सर्व दुःखे पावती विनाश ॥२॥
जाणुनि हे पादपद्मीं जाहलों मी लीन ।
करीं दासावरी दया दीन हा जाणून ॥३॥
वासुदेव म्हणे काय वर्णू हा आनंद ।
’ गोविंद ’ ’ गोविंद ’ हाचि वाणी घेई छंद ॥४॥
इतिश्री वासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंध १२ वा समाप्त.
॥११५॥
भागवतग्रंथ अभंगी गाऊन । जाहला संपूर्ण कृपालेशें ॥१॥
गुरुद्वादशीचा दिन हा पवित्र । अद्य माझे थोर भाग्य झालें ॥२॥
भूत ऋषि, वसु, भूमि शकामाजी । भौमवासरासी प्रातःकाळीं ॥३॥
आश्विन वद्य हे द्वादशी मंगल । जाहला सफल जन्म अद्य ॥४॥
दशवार्षिक हें सत्र पूर्ण झालें । प्रभो, पूर्ण केले मनोरथ ॥५॥
गाता-गावविता व्रजनाथा तूंचि । ग्रंथीं तव शक्ति प्रगट होवो ॥६॥
पठण जो याचें करील भक्तीनें । अथवा जो प्रेमें श्रवण करी ॥७॥
प्रत्यक्ष दर्शन लाभो तयाप्रति । कृपाघना हेंचि इच्छी मन ॥८॥
मूर्तिमंत तुझे रुप भागवत । तेंचि अभंगांत प्रगट होवो ॥९॥
वासुदेव म्हणे भक्त-भगवंत । भागवतीं एकरुप होती ॥१०॥
॥११६॥
झाली भागवतसमाप्ति । नाचूं बागडूं मी कित्ती ॥१॥
भरती आनंदसागरा । शांतिसिंधु उफाळला ॥२॥
आतां जग न राहिले । उरलें काय तें न कळे ॥३॥
एक आनंद आनंद । कोंदे आनंदें ब्रह्मांड ॥४॥
भक्तिसुखाची थोरवी । माझ्या प्रत्ययासी येई ॥५॥
म्हणतों ऐसें परी मीचि । कोठें उरलों नाहींचि ॥६॥
वर्णवे न हा सोहळा । झाली आंतडी ही गोळा ॥७॥
काय वेडा मी जाहलों । भक्तिसागरीं बुडालों ॥८॥
वासुदेव वासुदेव । प्रियजाहला हा काय ॥९॥
॥११७॥
पवित्र कौशिकगोत्रामाजी जन्म । पावूनियां धन्य अद्य झालों ॥१॥
प्रतितामह तो ’ विनायक ’ यति । ख्यात भक्त जगीं, यात्राप्रिय ॥२॥
पितामह श्रेष्ठ ’ बल्लाळ ’ नामक । सत्कर्मनिरत, सत्यवादी ॥३॥
पितामही ज्ञानें पावन ’ यमुना ’ । अर्पी ईशप्रेमा मजलागीं ती ॥४॥
पिता ’ शिवराम ’ माता ते ’ पार्वती ’ । दर्शन जयांसी श्रीदत्ताचें ॥५॥
ऐशा थोर कुळीं जन्म हा लाभला । कृतार्थ जाहला अद्य वाटे ॥६॥
शूर्पारकक्षेत्रीं ’ अजरालय ’ ग्राम । तेथूनि या ’ पुण्यनगरीं ’ आलों ॥७॥
कीर्तनाच्या ध्यासें लाभले हे श्रोते । वामनप्रसादें पावन हे ॥८॥
’ रामायण ’ पाया, ’ भारत ’ मंदिर । कळस हा थोर चढला अद्य ॥९॥
भागवतगानें संकल्पासमान । अद्य महायज्ञ पूर्ण झाला ॥१०॥
श्रोत्यांसवें आतां सवैराग्यज्ञानें । निशाण भक्तीचें उभवूनियां ॥११॥
निरंतर घडो एक ईशसेवा । वासुदेवा द्यावा हाचि वर ॥१२॥
अभंग-भागवतग्रंथ समाप्त
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥