स्कंध १२ वा - अध्याय ३ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥२०॥
राया, हे धरित्री वदे काय ऐकें । जिंकावया राजे कष्टती जे ॥१॥
स्वयेंचि ते जाती काळाच्या वदनीं मज त्यां जिंकूनि लाभ काय ॥२॥
बुद्‍बुदासम हे असूनियां देह । कैसे चिरंजीव भासती यां ॥३॥
मनोरथ यांचे चालतांचि अंत । निश्चयें तयांस लाभतसे ॥४॥
प्रारब्धें लाभही होतां मम त्यांसे । हांव न कदापि पूर्ण त्यांची ॥५॥
तात्पर्य शाश्वत सुख ज्या प्रयत्नें । हित त्याचि यत्नें इतर व्यर्थ ॥६॥
वासुदेव म्हणे आत्मलाभाविण । सकल तो शीण कथिती शुक ॥७॥

॥२१॥
आजवरी मोठमोठे । राव जिंकूनियां मातें ॥१॥
गेले त्यजूनि मजसी । वाटे मूढ ते या लोकीं ॥२॥
माझ्या प्राप्तीस्तव मूढ । कलहानें होती धुंद ॥३॥
बंधु-बंधु-आप्त, सखे । कलहें वैरी होती ऐसे ॥४॥
कां न म्हणावें त्यां मूढ । माजवूनि जे अनर्थ ॥५॥
स्पष्टपणें मृत्युमुखीं । जाती सर्वही ते अंती ॥६॥
वासुदेव म्हणे भूमी । कथी कींव येई मनीं ॥७॥

॥२२॥
पृथु, पुरुरवा, गाधि, तैं नहुष । मांधाता, भरत, अर्जुनादि ॥१॥
सगर, खट्‍वांग, दाशरथी राम । रावणादि जाण बहुत राजे ॥२॥
अजिंक्य या जनीं होऊनियां गेले । माझ्यास्तव केले कलह बहु ॥३॥
अतृप्तचि अंतीं गेले ते सोडूनि । अद्यापि या जनीं तेंचि चाले ॥४॥
वासुदेव म्हणे कथी भूमिदेवई । मूढता जाणावी हेचि स्पष्ट ॥५॥

॥२३॥
निवेदिती शुक, राया, बहुकथा । निवेदिल्या त्यांचा हेतु जाणें ॥१॥
ग्राह्यांश, त्याज्यांश घेई नित्य ध्यानीं । विषयकर्दमीं रमूं नको ॥२॥
विषयविराग व्हावा हेंचि मुख्य । सर्वत्र तात्पर्य ध्यानी घेई ॥३॥
ग्राह्य एथ एक श्रीकृष्णचरित्र । चिंतूनि कृतार्थ होईं तेंचि ॥४॥
राव म्हणे मुने, दोषनिधि कलि । केंवी संरक्षावी मति एथें ॥५॥
युगसंख्या-नामें-धर्मही कथावे । स्वरुप वर्णावें कालाचेंही ॥६॥
वासुदेव म्हणे ऐकूनियां मुनि । निवेदिती ध्यानी तेंचि घ्यावें ॥७॥

॥२४॥
राया, पुण्यवंता ऐकें परीक्षिता । करुनियां चित्ता सावधान ॥१॥
पादचतुष्टयसंयुक्त सद्धर्म । कृतयुगीं जाण नृपश्रेष्ठा ॥२॥
सत्य, दया, तप, दान ऐसे पाद । जाणावे प्रसिध्द सध्दर्माचे ॥३॥
असत्य, कपट, हिंसा, असंतोष, । अधर्माचे पाद परीक्षिता ॥४॥
कृतयुगीं जन तितिक्षासंयुक्त । विवेकी तैं शांत सर्वकाल ॥५॥
सदा परब्रह्मचिंतनीं निमग्न । सर्वत्रचि समदृष्टि त्यांची ॥६॥
वासुदेव म्हणे सत्ययुगीं ऐसें । धर्म नृपाळातें कथिती मुनि ॥७॥

॥२५॥
त्रतायुगीं जन प्रायः धर्मरत । अवसर अल्प अधर्मातें ॥१॥
द्वापरीं अधर्म होतसे बलिष्ठ । परी जन श्रेष्ठ असती बहु ॥२॥
कलियुगीं मात्र अधर्म बळावे । एका पायीं नांदे धर्म तेणें ॥३॥
राया, अद्यापिही संपला न धर्म । पुढें पुढें जाण कठिण काल ॥४॥
लोभ, दुराचार, शुष्क, वैरवृध्दि । माजेल पुढती दुष्टभाव ॥५॥
दुर्दैवी, हांवरे जन त्या युगांत । धीवर तैं शूद्र श्रेष्ठ तदा ॥६॥
वासुदेव म्हणे गुणांसम ऐसी । धर्मा, धर्मवृध्दि पुढती जाण ॥७॥

॥२६॥
सत्ययुगीं सत्य, रज त्रेतायुगीं । रज-तम जोडी द्वापारांत ॥१॥
कलीमाजी तम केवळ बळावे । खेळ ते वर्णावे काय त्याचे ॥२॥
कापटय, आलस्य, निद्रा, हिंसा, खेद । भय, मोह, शोक, दैन्य, सदा ॥३॥
मतिमांद्यतेनें ऐश्वर्याभावचि । दारिद्य, आसक्ति बृध्दि पावे ॥४॥
कामवासनेसी येतसे प्राबल्य । स्त्रिया होती दुष्ट तयायोगें ॥५॥
चोरांचा बाजार, पाखंडाचें बंड । प्रजेचे छलक होती राव ॥६॥
उदरभरणप्रिय होती विप्र । करिती दुष्कृत्य ब्रह्मचारी ॥७॥
नीचकर्मीरत गृहस्थही जाण । वानप्रस्थजन ग्रामवासी ॥८॥
वासुदेव म्हणे द्रव्यलोभी यति । कलिकालामाजी ध्यानी असो ॥९॥

॥२७॥
र्‍हस्व देहाच्या ललना । वृध्दि आहाराची जाणा ॥१॥
बहु अर्भकें तयांसी । लज्जा नष्ट होई त्यांची ॥२॥
बहु कर्कशा होतील । चौर्य तयांत वाढेल ॥३॥
कपट साहसप्रवीण । वासुदेवा होई शीण ॥४॥

॥२८॥
व्यापारी उदीम वजनें तैं मापें । योजितील एथें मिथ्या नित्य ॥१॥
निष्कारण होई अयोग्य वर्तन । धनार्थचि जाण सेवावृत्ति ॥२॥
धनीही सेवका त्यागिती संकटी । भाकड धेनूंसी रक्षिती न ॥३॥
रतिसौख्यमग्न सर्वकाळ जन । त्यागितील जाण माय-बापां ॥४॥
कांतासंबंधीचे जन त्यां रुचती । होतील तपस्वी शूद्र जनीं ॥५॥
दानही ते घेती कथूनियां धर्म । पर्जन्यविहीन देश सदा ॥६॥
दुर्भिक्ष त्यायोगें सर्वकाळ, भय । वाढतील कर परोपरी ॥७॥
अन्न, वस्त्र, शय्या, स्त्रीसौख्यही न । भूषणें न, स्नान तेंही शुध्द ॥८॥
पिशाचसदृश वागतील जन । छ्दामार्थ प्राण वेंचितील ॥९॥
आप पर मित्रनाशही द्र्व्यार्थ । माता, पिता, वृध्द त्यजितीई मूढ ॥१०॥
वासुदेव म्हणे नामही प्रभूचें । रुचे न जनांते कलीमाजी ॥११॥

॥२९॥
भक्तीनेंचि राया, दोष हे जातील । भक्तांसी होईल साह्य प्रभु ॥१॥
कलिसंभूत या विविध आपत्ति । एका नामानेंचि नष्ट होती ॥२॥
ध्यान-चिंतन तैं गायन -कीर्तन । भजनें प्रसन्न होई ईश ॥३॥
अनंत जन्मींचे पाप तेणें नष्ट -। होऊनियां, चित्त शुध्द होई ॥४॥
तप-व्रतादीनें लाभ नच ऐसा । शुक परीक्षिता निवेदिती ॥५॥
राया, आतां करीं ईश्वरचिंतन । सद्गतिसाधन तेणें होई ॥६॥
अंतकाळी ध्यान करील जो त्यासी । परब्रह्मप्राप्ति निश्चयानें ॥७॥
वासुदेव म्हणी कलीमाजी नाम । करील पावन सकलांसीही ॥८॥

॥३०॥
निवेदिती मुनि दोषांचे माहेर । राया, हें साचार कलियुग ॥१॥
परी सद्‍गुण या युगामाजी एक । कीर्तनीं जो दंग श्रीकृष्णाच्या ॥२॥
मुक्तसंग तोचि पावतो सायुज्य । निश्चयें हें वाक्य ध्यानी असो ॥३॥
कृतयुगीं ध्यानें, त्रेतायुगी योगें । द्वापरांत लाभे परिचर्येनें ॥४॥
वासुदेव म्हणे कलींत कीर्तनें । लाभे तेंचि, प्रेमें कथिती शुक ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP