स्कंध १२ वा - अध्याय ५ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
॥४१॥
निवेदिती शुक परिक्षिताप्रति । लोकोत्तर यासी फल असे ॥१॥
सावधानचित्तें करितां श्रवण । चुकतील जन्म निश्चयानें ॥२॥
कारण वर्णिला एथ विश्वपति । हर्ष, क्रोध ज्यासी ब्रह्मा-शिव ॥३॥
चिंतनें जयाच्या कासयाचें भय । मग करी काय मृत्यु तेथें ॥४॥
राया, अजन्मा तूं, देह हा विनाशी । न्याय न आत्म्यासी बीजांकुर ॥५॥
देहोपाधीसी तो न्याय हा निश्चय । होतां मृत्युभय राहीचिना ॥६॥
वासुदेव म्हणी अग्नि, काष्ठ भिन्न । आत्मा देह भिन्न तैशापरी ॥७॥
॥४२॥
स्वप्नामाजी पाही निज शिरच्छेद । होतांचि जागृत, सकल मिथ्या ॥१॥
आपुलें मरण पाही जो अलिप्त । हेंचि होई सिध्द स्वप्नानें त्या ॥२॥
अवस्था सकल तैशाचि देहाच्या । तैसाचि देहाचा समजें मृत्यु ॥३॥
निर्विकार परी जाणाव जीवात्मा । आपुल्या मरणा अवलोकी जो ॥४॥
फुटतांचि घट गगनीं गगन । होई जैं विलीन तैसेंचि हे ॥५॥
वासुदेव म्हणे आत्मा परमात्मा । भेद व्यर्थ जाणा उपाधींचा ॥६॥
॥४३॥
एक उपाधी त्यागूनि । अन्य स्वीकारितां जनीं ॥१॥
निरुपाधिकत्व तरी । लाभेनाचि घे अंतरीं ॥२॥
उपाधीची परंपरा । तोचि जन्म-मरण फेरा ॥३॥
प्राक्तनचि उपाधीसी । कारण हें राया, लोकी ॥४॥
प्राक्तनाचें बीज मन । माया मनासी कारण ॥५॥
विषयभ्रम तेचि माया । यास्तवचि तो त्यजावा ॥६॥
तैल, वात, पात्र, अग्नि । तोंवरीचि दीप जनीं ॥७॥
तेंवी मन, कर्म, देह । चैतन्य हे जावत्काल ॥८॥
नांदतील एका ठाई । तावत्काल भ्रम होई ॥९॥
वासुदेव म्हणे मन । विनाशेंचि, ब्रह्मज्ञान ॥१०॥
॥४४॥
सामर्थ्यसंपन्न नृपा, बुद्धिलय । करीं, वासुदेवस्वरुपांत ॥१॥
भेदाभेदरुप निश्चल घे ध्यानी । साक्षित्वें जाणूनि जगन्नाथा ॥२॥
काळाचाही काळ राजा, स्वयें तूंचि । तक्षक तुजसी काय करी ॥३॥
ब्रह्मनिश्चयानें उपाधिरहित । होऊनियां शांत स्थिर राहीई ॥४॥
मग कोणा कोणा कासयासी दंश । करील हा बोध अभय देई ॥५॥
अभेदें यापरी होशील निश्चल । कथिलें समग्र पुशिलेंसी ते ॥६॥
अन्य कांही जरी शंका घे पुसोनि । निःशंक होऊनि सुखी होई ॥७॥
वासुदेव म्हणे शंका ते अज्ञान । संपादूनि ज्ञानमुक्त व्हावें ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 17, 2019
TOP