कफपित्तावरुद्धस्तु मारुतो रसमूर्छित: ॥
हृदिस्थ: कुरुते शूलमुच्छ्वासारोधकं परम् ।
स हृच्छूल इति ख्यातो रसमारुतसंभव:
हृच्छूलमाह - कफेत्यादि । अवरुद्धो रुद्ध: ।
रसमूर्च्छितो रससंयुत: । उच्छ्वासारोधकं उच्छ्वासस्य
आसमन्ताद्रोधकमित्यर्थ: । एतद्धच्छूलं यस्माद्धृद्रोगविलक्षणं
तस्माद्धृद्रोगाद्भिन्नं, तथा संप्राप्तिभेदाच्च ।
सु.उ. ४२-१३१-३२, सटीक, पान ७२६.
सुश्रुतानें हृच्छूल हा व्याधि वर्णन केला असून तो हृद्रोगापेक्षां वेगळा असल्याचें टीकाकारानें सांगितलें आहे. आमच्या मतें हा व्यांधि हृद्रोगाचाच अंतस्थभेदानें वर्णिलेला एक प्रकार आहे. हा व्याधि स्वतंत्रपणें उत्पन्न होऊं शकतो. त्याचप्रमाणें तो हृद्रोगाचें पूर्वरुप म्हणून असतो. हृदयाचें पोषण करणार्या रसवाहिनीमध्यें कफपित्तांनी मार्गावरोध झाल्यामुळें प्रतिरुद्ध वायु प्रकुपित होतो व रसाशीं संमूर्च्छित होऊन तीव्र शूल उत्पन्न करतो. यामुळें उच्छ्वासाला अडथळा येतो. लक्षणांच्या तीव्रतेप्रमाणें स्वेद, भय हृद्गतिवैषम्य कंप, वैवर्ण्य, श्वास, श्रम, ग्लानी, मूर्च्छा, इत्यादि लक्षणें अनुषंगानें असतात. पित्तानुबंधाचें आधिक्य असल्यास ज्वरहि येतो. व्याधि आशुकारी व दारूण स्वरुपाचा आहे. स्वभावत: वा औषधानें दोषांचा उपशम होऊन वायूचें अनुलोमन झाल्यास लक्षणें नाहींशीं होऊन बरें वाटतें. निमित्तवशात् पुन: पुन: व्याधि उत्पन्न होतो.
चिकित्सा कल्प
लक्ष्मीविलास, त्रिभुवनकीर्ति, नागगुटी, त्रैलोक्यचिंतामणि वातविध्वंस, दशमूलारिष्ट, शंखवटी, आमपाचनवटी असे उपचार करावेत.
अपथ्य
श्रम, मलावष्टंभ, आध्मान, अजीर्ण होऊं देऊं नये.