बालकांड - संत वर्णन

श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.


संतचरित शुभकपास फल नीरस गुण उज्वल ।
साहुनि दु:ख आपण ठेवी परदोष मनी सकल ॥
कपास वस्त्ररुपे करी नरतनु असगुंठित ।
वंदनीय साधु मिळे जगि शुभयश सुखसाहित ॥१॥
अर्थ - संतचरित हे शुभदकापसाप्रमाणे मंगल आहे. त्याचे फळ नीरस असते पण गुण उज्वल असतात. कापसाचे बोंड जसे नीरस असते. तसे संतचरित्रही नीरस असते. त्यात विषयाबद्दल आसक्ती नाही म्हणून ते नीरस असते. कापूस जसा शुभ्र असतो, तसे संतांचे हृदय सुद्धा अज्ञान व पापरूपी अंध:कारापासून अलिप्त असते. म्हणून  संतचरित्र कापसाप्रमाणे शुभ्र आहे. कापसातील तंतु जसे सफेद असतात, त्याचप्रमाणे संतांचे चरित्र हे सुद्धा सद्‍गुणांचे भांडार आहे म्हणून ते गुणमय आहे. कापूस जसा कातला जातो. त्याचेपासून धागे तयार करतात व ते धागे विणून वस्त्र तयार केले जाते. हे सर्व कष्ट सहन करून कापूस आपले रूप बदलून, वस्त्ररूप घेऊन, मानवाचे शरीर झाकतो, त्याप्रमाणे संत स्वत: दुख सहन करून दुसर्‍याचे दोष झाकतात. म्हणून त्याना जगात सुख व सुयश मिळते व ते जगात वंदनीय होतात.

कल्याणमय आनंदमय संतसमाज नित्य ।
फिरते तीर्थक्षेत्र प्रयाग वाटे मना सतत ॥
श्रीरामभक्तिची गंगा राही सदा संत मनी ।
ब्रम्हविचार सरस्वतीचा शुभसंगम जाणी ॥२॥
अर्थ - संतांचा समाज आनंदाने भरलेला आणि कल्याणमय आहे. हे संतजन म्हणजे जगातील चालते फिरते तीर्थराज प्रयागक्षेत्र आहे. या संतसमाजरूपी प्रयोगस्थानी रामभक्तिरूपी गंगेचा प्रवाह वहात आहे आणि ते संत जो ब्रम्हविचार प्रकट करतात. ती सरीता सरस्वती आहे व त्यांचा शुभसंगम संतमनात झालेला आहे.

स्नान करी या प्रयागी फल मिळे त्वरित त्यास ।
काक बने कोयल बनती बगुल राजहंस ॥
संत संग महिमा अगाध कधी न राही लपुन ।
आश्चर्य नसे यांत परिसा ही कथा मनलाऊन ॥३॥
अर्थ - या संतमनरूपी प्रयागात स्नान करण्याचे फळ त्याला लगेच मिळते. यात स्नान केल्यामुळे कावळ्याला कोकिळेचा मधुर आवाज प्राप्त होतो आणि बगळ्याना राजहंसाचे सुंदर रूप मिळते. हे ऐकून कुणीही आश्चर्य करू नये व ही कथा मन लाऊन श्रवण करावी. कारण सतसंगतीचा महिमा लपून रहात नाही.

संतसंगतीशिवाय ना विवेक होई जगती ।
श्रीरामकृपेविना मिळेना सहज ती संगती ॥
असे स्त्रोत हा मांगल्याचा हे मूळ सदानंदमन ।
संतसंगती सिद्धीफलास्तव फूल हेच साधन ॥४॥
अर्थ - संतसंगतीशिवाय विवेक विचार मिळू शकत नाही. आणि श्रीरामाच्या कृपेशिवाय जगात ही संतसंगती सहज मिळत नाही. ही संतसंगती हे आनंद आणि कल्याणाचे मूळ आहे. संतसंगती हे फळ आहे व त्यासाठी केलेले सर्व प्रयत्न हे फुलाप्रमाणे आहेत.

संतसंगती मिळता होई राष्ट्रहि सदा सुजन ।
परिसस्पर्श होता चमके लोहा कांचन बनुन ॥
दैवगतीने सुजन जरि पडे कुसंगती कुणी ।
फणिमणिसम सोडिना तो निजसद्‍गुण जाणी ॥५॥
अर्थ - दुष्टजनसुद्धा संतसंगती मिळताच सुधारतात. ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंड सोने बनून चकाकू लागते. तसा दुष्टजनांत बदल होतो. परंतु दैवगतीने जर कधी कुणी सुजन कुसंगतीत पडले तरी ते सापाच्या डोक्यावरील रत्नाप्रमाणे आपल्याच गुणांचे अनुसरण करतात, जसे सापाचा संसर्ग मिळाल्यामुळे सुद्धा रत्न त्याचे विषयग्रहण करत नाही व आपला प्रकाश देण्याचा गुण सोडत नाही, त्याप्रमाणे साधुपुरुष दुष्टांच्या संगतीत राहूनसुद्धा दुसर्‍यांना आपल्या सदगुणांचा प्रकाश देत राहतात. दुष्ट जनांचा त्याच्यावर प्रभाव पडत नाही.

वंदन मम त्या संतजना ।
अरी मित्र मनि समान त्याना ॥
जणू अंजुलीत घेई फुले जरा ।
करील सुगंधित दोन्ही करा ॥६॥
अर्थ - ज्यांच्या मनात समता आहे व ज्यांना शत्रू अथवा मित्र सारखेच आहेत अशा संतजनाना मी वंदन करतो. जशी ओंजळीत घेतलेली फुले दोन्ही हातांना सुगंधीत करतात त्याप्रमाणे संतजन शत्रू आणि मित्र यांचे सारखेच कल्याण करायचा प्रयत्न करतात.

संतरुदय जगहितकारी ।
स्वभाव सरल स्नेहल भारी ॥
जाणूनि करितो बालविनंती ।
रामपदी द्या मजसी प्रीती ॥७॥
अर्थ - संतांचे मन सरळ व जगाचे कल्याण करणारे असते. त्यांचा असा स्नेहशील स्वभाव जाणून मी त्यांना विनवितो की माझी ही बालिश विनवणी ऐकून कृपा करून श्रीरामाच्या चरणी माझे प्रेम जडावे. असे कांही मला सांगावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP