बालकांड - असुर वर्णन
श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.
कुंभकर्णा बहु बलवान भ्राता होता रावणाला ।
त्याच्यासम अति शूर योद्धा कुणी न जगी झाला ॥
झोपी जाई सहा मास तो बहु मदिरा पिउनी ।
जागृत होता त्रैलोक्याला छळे त्रास देऊनी ॥
अर्थ - रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा फार बलवान होता. त्याच्या सारखा अतिशय शूर योद्धा पृथ्वीवर कुणीही नव्हता. तो खूप दारू पिऊन सहा महिने झोपत असे व जागा असताना तिन्ही लोकातील जनाना त्रास देऊन तो छळत असे.
सकल जाणती असुरी माया कामरूप घेती ।
धर्मदयेची भाषा नच ते स्वप्नातही जाणती ॥
बसला होता असाच एकदा सभेत दशानन ।
अगणित अपुल्या परिवारा पाही न्याहळून ॥
अर्थ - सर्वांना माहित होते की हि असुरांची माया आपल्या इच्छेप्रमाणे रुपे धारण करीत असे. धर्मदयेची भाषा त्यांना स्वप्नातही माहित नव्हती. असाच एकदा रावण आपल्या सभेत बसला होता व आपल्या अगणित परिवाराला निरखून पहात होता.
पुत्र पौत्र परिवारी सेवक पाही तिथे अनेक ।
असुर जमले अगणित मोजू शकती ना लोक ।
देखुनि सेना अपुली झाला अभिमानी रावण ॥
बालु लागला क्रोधमदाने भरलेले वचन ॥३॥
अर्थ - तिथे त्याने मुले, नातवंडे नातलग व अनेक सेवक पाहिले. तिथे असंख्य राक्षस जमले होते. ते कुणालाही मोजणे अशक्य होते. आपले सैन्य पाहून रावणाच्या मनात अभिमान निर्माण झाला व राग आणि गर्व यानी भरलेले शब्द तो बोलू लागला.
परिसावे सकल असुरा काहीं बोलतो आता ।
सुरजन अपुले वैरी ठेवा बात मनी सर्वथा ।
येवून सन्मुख कधी लढाई ना करी देवगण ।
जाती भयाने पळून देखता दुष्मन बलवान ॥४॥
अर्थ - हे सर्व राक्षसजन मी आता जे कांही सांगत आहे ते ऐका. हे सर्व देवगण आपले वैरी आहेत, ही गोष्ट नेहमी लाक्षात ठेवा. हे समोर येऊन कधीही युद्ध करीत नाहीत. ते आपला शत्रू बलवान आहे हे पाहून भीतीने पळून जातात.
असे एक उपाय परि आता माराया सुरजना ।
ठेवा हृदयी परिसावे देता समजाऊन त्याना ॥
बल देती त्या ब्राह्मणभोजन श्राद्ध, यज्ञ हवन ।
निर्माण करावे त्या त्या समयी संकट जाऊन ॥५॥
अर्थ - ह्या देवगणाना मारायचा एकच उपाय आहे. मी तू तुम्हाला समजाऊन सांगतो. आपण तो लक्षात ठेवावा. त्या देवगणना ब्राह्मणभोजन श्राद्ध, यज्ञ हवन ही कार्ये शक्ति देत असतात. त्यासाठी तिथे जाऊन आपण त्या कार्यात विघ्ने आणावीत.
चालु लागला रावण तेव्हां डगमगली धरणी ।
गर्भ गळाले सुरललनांचे असुर गर्जनानी ॥
छ्ळे सुरमना नृप दशानन क्रोधित होऊन ।
सुमेरूच्या गुफेकडे ते वस्तिस जात निघून ॥६॥
अर्थ - जेव्हां दशानन चालू लागले तेव्हां धरती भीतीने कापू लागली आणि त्या राक्षसांच्या गर्जनांनी देवतांचे गर्भ भीतीने गळून पडू लागले. अत्यंत रागाने देवाना छळू लागला. तेव्हां देव सुमेरूच्या गुफेकडे रहायला निघून गेले.
रणमदाने मत होऊनी फिरला दुनियेत ।
प्रतियोद्धा तो शोधित होता धावत जगतात ॥
देखती रविचंद्र वायुही वरुण धनधारी ।
अग्नि, काल, यम आणि अन्य ते होते अधिकारी ॥७॥
अर्थ - युद्धाच्या मदाने मस्त होऊन तो सर्व जगात फिरला. पृथ्वीवर धावत जाऊन लढण्यासाठी तो प्रतिस्पर्धी शोधत होता. सूर्य, चंद्र, वायू, वरुण व धनिक लोक हे सर्व पहात होते. त्यावेळी त्याचे अधिकारी यम, अग्नी आणि काल हे होते.
रहात जेथे देवमानव सिद्ध नाग किन्नर ।
पाठि लागला सकल जनांच्या शांति पळे दूर ॥
चतुर्मुखाच्या सृष्टीमधले मानव तनुधारी ।
आधिन जाहली दशाननाच्या ब्रह्मप्रजासारी ॥८॥
अर्थ - जिथे देवजन मानव साधू नाग व किन्नर रहात होते तिथे जाऊन तो सर्वांच्या पाठीमागे लागला. त्यामुळे शांतता दूर पळून गेली. ब्रह्मदेवाच्या सृष्टीतले मानव व शरीरधारी ब्रम्हाची प्रजा रावणाच्या अधीन झाली.
N/A
References : N/A
Last Updated : May 26, 2023
TOP