बालकांड - रामजन्म सोहळा
श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.
ब्राह्मण धेनू सुर संत कल्याणा ।
नर अवतारा घे जगराणा ॥
मायागुण जे अतीत इंद्रिया ।
नीज इच्छेने निर्मिती काया ॥१॥
अर्थ - गाई, ब्राह्मण, संत व देव यांच्या कल्याणासाठी हा जगाचा राजा मानव अवतार घेत आहे. हा इंद्रियांच्या जाणिवेच्या पलीकडे असणारा भगवंत मायेच्या गुणामुळे आपल्या इच्छेने शरीर धारण करीत आहे.
परिसे प्यारी राणी सदनी शिशुचे मधुर ध्वनी ।
संभ्रभीत अति उत्सुकतेने येती सकल राणी ॥
अति आनंदे इकडे तिकडे किति दासी ।
आनंदाने धुंद जाहले सकल नगरवासी ॥२॥
अर्थ - राजमंदिरात लहान बालकांचा मधुर आवाज सर्व राण्यांनी ऐकला व संभ्रभीत होऊन उत्सुकतेने सर्व राजस्त्रीया तिथे आल्या. कितीतरी दासी अतिशय आनंदाने इकडे तिकडे धावत होत्या. सर्व नगरवासी आनंदाने धुंद झाले होते.
परिसे कानी राजा दशरथ पुत्रजन्म वार्ता ।
तल्लीन जाहले ब्रह्मानंदी वाटे नृपजनता ॥
परमप्रेम मनि होत तन आनंदे पुलकित ।
अधिर मतिला दे धीर उठे शरीर सांभाळित ॥३॥
अर्थ - राजा दशरथाने पुत्रजन्माची बातमी आपल्या कानानी ऐकली. त्यावेळी राजा व प्रजा ब्रह्मानंदात मग्न झाले असे वाटले. सर्वांच्या मनात त्या बालकांबद्दल अतिशय प्रेम होते व शरीरावर आनंदाने रोमांच उभे होते. आपल्या अधीर मतीला धीर देत आपले शरीर सांभाळीत राजा उठला.
वाशिष्ठ मुनिवरा पाठवी नृपती निमंत्रण ।
विप्रजनासह राजगृही हो मुनी आगमन ॥
पहात राही अनुपम बालक जाउनी भूपती ।
सौंदर्याची रास जणू गुण सांगून ना सरती ॥४॥
अर्थ - राजाने वशिष्ठ मुनीना निमंत्रण पाठवले. ब्राह्मण मंडळीसह वशिष्ठमुनी राजमंदिरात आले. राजा महालात जाऊन सुंदर बालकाकडे पहातच राहिला. ते बालक जणू कांही सौंदर्याचा रासच होती. व त्याचे गुणवर्णन कधी संपणारे नव्हते.
ध्वजपताका, तोरण यानी जाई नगर भरून ।
कसे जनानी सजविले ना करू शके वर्णन ॥
नीलनभातुनि होउ लागली वृष्टी सुमनांची ।
ब्रह्मानंदी टाळि लागली नगरवासियांची ॥५॥
अर्थ - ध्वजपताका व तोरण यानी अयोध्यानगरी भरून गेली होती. लोकानी नगरी कशी सजवली याचे वर्णनही कुणी करू शकत नव्हते. नीलनभातून फुलांचा वर्षाव सुरू झाला व सर्व नगरजन ब्रह्मानंदात मग्न झाले.
नारिवृंद ये सकल मिळूनी स्वागत करण्याला ॥
शृंगार सहज करून येती धावत त्या काला ।
कनककलश मंगलद्रव्ये घेती थाळी भरुनी ।
प्रवेश करती राजद्वारी गाउनि मंगल गाणी ॥६॥
अर्थ - सर्व स्त्रियांचे समूह बाळाचे स्वागत करण्यासाठी येऊ लागले. त्या नारी शृंगार करून त्यावेळी तिथे धावत आल्या. सोन्याचे कलश व मंगलद्रव्ये यांनी या स्त्रियांनी आपल्या थाळ्या भरून घेतल्या होत्या. राजद्वारी मंगल गाणी गात त्या प्रवेश करू लागल्या.
भूपति देई सर्वप्रकारे दान सकलजना ।
मिळे ज्यास जे त्याला तेही कांहीच ना ठेविना ॥
कस्तुरि कुंकुम चंदन यांची उधळण हो स्वैर ।
दिसती गलीगलीतुन राशी त्यांच्या किती अपार ॥७॥
अर्थ - राजा सर्व लोकांना सर्व प्रकारचे दान देऊ लागला. व ज्याला जे मिळाले तेही तो स्वत:कडे ठेवत नव्हता. कस्तुरी चंदन व कुंकू यांची मुक्तपणे उधळण झाली. त्यांच्या कितीतरी राशी गल्लीगल्लीतून दिसत होत्या.
कैकयी सुमित्रा राजस्त्रिया तेव्हा होत प्रसूत ।
जन्म दिला सुंदर सुताना प्रसन्न हृदयात ॥
तो समय ती सुखदौलत आणि समाजमन ।
अहिराजा वा सरस्वती ना करू शकती वर्णन ॥८॥
अर्थ - कैकई सुमित्रा या राण्या त्यावेळी प्रसूत झाल्या. त्यांनी सुंदर मुलांना जन्म दिले. त्या मनात खूप प्रसन्न झाल्या. ती सुंदर वेळ, ती सुखाची दौलत आणि नागरिकांची प्रसन्न मने यांचे वर्णन प्रत्यक्ष शेष किंवा सरस्वतीही करू शकले नाहीत.
N/A
References : N/A
Last Updated : May 26, 2023
TOP