बालकांड - नामकरण संस्कार

श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.


अति आनंदे अशाप्रकारे अवधपुरी सजली ।
भगवंतदर्शना आली वाटे रजनी त्या काली ॥
देखूनि प्रभाकराला जणू ती बहू लाजली मनी ।
विचार करुनी जणू येई का संध्या ती होउनी ॥१॥
अर्थ - अशा प्रकारे अतिशय आनंदाने अयोध्या नगरी सजली होती. भगवंताचे दर्शन घेण्यासाठी जणू रजनी त्यावेळी आली होती. परंतु रामरूपी प्रभाकरला पाहून ती मनात खूप लाजली. म्हणून तिने मनात विचार केला व जणू संध्या होऊन ती तिथे आली.

अगर धूप जाळिला धूम तो वाटे संधिप्रकाश ।
अबीर उधळला लाली त्याची उजळे आकाश ॥
रत्ने जडविली राजमांदिरी वाटे तारांगण ।
कलश ठेविला राजमहली चमके शशीसमान ॥२॥
अर्थ - पुष्कळ ऊदधूप जाळला गेला. त्याचा धूर पाहून संधिप्रकाश पडला आहे असे वाटत होते. राजमंदिरात जडवलेली रत्ने पाहून ते तारांगणच आहे असे वाटत होते व राजमहाली ठेवलेला कलश चांदीप्रमाणे चमकत होता.

राजमांदिरी वेदध्वनिची अति कोमल वाणी ।
किलबिल करती विहंग वाटे समयाला जाणूनी ॥
देखुनी कौतुक रवी जणू विसरे कार्य अपुले ।
होउनि मोहित एक मास तिथे राहूनी गेले ॥३॥
अर्थ - राजमंदिरात मुनी वेदांचे अध्ययन करीत होते. ते स्वर अतिशय कोमल होते. ही शुभवेळ पाहून पक्षीच किलबिल करीत आहेत असे ते स्वर ऐकून वाटत होते. रामजन्माचा हा सोहळा पाहून जणूकांही सूर्य आपले काम विसरला व मोहित होऊन तिथ एक महिनाभर राहून गेला.

त्यासमयी जशाप्रकारे जे जन आले त्या स्थानी ।
जे जे हवे असे त्यांना ते नृपती दे आणूनि ॥
अश्व गजरथ हिरेमाणके देई धनकांचना ।
किती तर्‍हेची देई वसने भूपति प्रजानना ॥४॥
अर्थ - त्यावेळी जे लोक ज्याप्रकारे त्या ठिकाणी येत असत, त्यांना जे जे हवे असेल ते दशरथ राजा आणून देत असे. रथघोडे हत्ती हिरेमाणके सोने व धन यांचे तो दान करीत होता. नानातर्‍हेची वस्त्रे तो प्रजाजनाना देत होता.

निघून गेले अशाप्रकारे कितीतरी दिवस ।
दिनराती जात परी नच कळले राजास ॥
नामकरण संस्काराचा समय जाणूनी मनी ।
निरोप देई नृपती तेव्हां ज्ञानी वाशिष्ठमुनि ॥५॥
अर्थ - अशाप्रकारे खूप दिवस निघून गेले. किती दिवस व रात्री अशा तर्‍हेने गेल्या हे राजाला कळलेही नाही. नामकरण संस्काराची वेळ आली आहे हे ओळखून राजाने ज्ञानी मुनी वाशिष्ठाना निरोप पाठवला.

करी भूपती पूजा मुनिची वदे तया सकाम ।
विचार मनि हा ठेवा आपण मम सुता सुनाम ॥
वदे मुनी हे राजा असती यांना नाम अनंत ।
वदेन मी मममतीनुसार तया नाम उचित ॥६॥
अर्थ - राजाने मुनींची पूजा केली व म्हणाला, 'आपण माझ्या मुलांचे नामकरण करावे अशी माझी इच्छा आहे.' मुनी म्हणाले 'हे राजा या मुलांची अनंत नावे आहेत. परंतु माझ्या मनाला योग्य वाटतील अशी नावे सांगतो.

आनंदाचा सिंधु हरी हा अतिव सुखनिधान ।
करील सुखी एक बिंदुही त्रिलोक मनभावन ॥
जेष्ठ पुत्र तव सुखधामहरी नाम तया राम ।
देईल हा सुत अखिल जगा सुखशांति विश्राम ॥७॥
अर्थ - हा तुझा मोठा पुत्र आनंदाचा सागर आहे व अतिशय सुखाची ठेव आहे. या सागरातील एक बिंदुसुद्धा त्रिलोकातील जनमनाना सुखी करील. हा तुझा मुलगा सर्व सुखाचे सदन असलेला भगवंत आहे. त्याचे नाव राम ठेवावे. हा तुझा मुलगा सर्व जगाला सुख शांती व आराम देईल.

भरणपोषण या जगताचे करीत दिनरात ।
पुत्र तुझा दूसरा तयाला नाम देई भरत ॥
नाश होतसे अरिचा ज्याचे करिताना स्मरण ।
नाम तव तिसर्‍या सुताला द्यावे शत्रूघ्न ॥८॥
अर्थ - अहोरात्र जगाचे पालनपोषण करणारा असा हा तुझा दुसरा पुत्र आहे. त्याचे नाव भरत ठेवावे. ज्याचे स्मरण केले असता शत्रूचा नाश होतो असा तुझा तिसरा पुत्र आहे. त्याचे नाव शत्रुघ्न ठेवावे.

प्रिय श्रीरामा शुभलक्षणी
आधार वाटे सकला जनी ॥
गुरुवशिष्ठ तया देती नाम ।
मनातील जनी लक्ष्मणा महान ॥९॥
अर्थ - तो रामाला अतिशय प्रिय आहे, तो शुभलक्षणी  आहे व जगात सर्वांना आधार देणारा आहे म्हणून गुरु वाशिष्ठानी त्याला लक्ष्मण हे नाव दिले. त्याला जगात श्रेष्ठ समजत होते.
इति श्रीमद्रामचरितमानसे सकलकलिकलुष विध्वंसने प्रथम: सोपान: समाप्त: ।

(बालकांडातील रामजन्म हा भाग समाप्त)

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP