अभंग व पदें - १ ते ५
महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे.
पद १ ले
श्री गणेशाय नम: । प्राप्त होऊन नरकाया । निर्फळ शत वर्षे गेली वाया ।
आलां कोठुन या ठायां । आपला नाहीं पाहीला मूळ पाया ॥
मोहन धन सुत जाया । झोकामध्ये लागला वागाया ॥
द्रव्य ठेवा सांचून । किर किर आत्मज्ञानावाचून ॥१॥ प्राप्त० ॥धृ०
जेणें पाहिला साचा । ज्योतींरुप डोळा डोळीयाचा । काळियांत काळ्याचा ।
तेथें प्रकाश निळ्या स्वरुपाचा । तो ठिकाण प्राणियाचा ।
ज्योतीमध्यें ज्योती ढिग तेजाचा । ब्रह्मबीजाची खूण ।
किर किर आत्मज्ञानावाचून । काय ग्रंथ वाचून ॥२॥
औटपीठ गिरीवती । शिकारी एक गाय सुंदर चरती ।
जे का तिला स्मरती । अमृतकुंभ दुग्ध भरणा भरती ।
सर्व जिवां निर्मिवती । साधू सत्रावी तिजला म्हणती ।
ती घ्यावी वळखून । किर किर आत्मज्ञानावांचून ॥३॥
शरण सद्गुरुला जावें । आपुलें आत्मरुप वळखून घ्यावें ॥
विश्वब्रह्म जाणावें । तेव्हां स्वयें आपण ब्रह्म व्हावें ॥
ब्रह्मसुख भोगावें । हयबती म्हणे तरिच जन्मा यावें ।
व्यर्थ काय वांचून । किर किर आत्मज्ञानावांचून ॥४॥
पद २ रें
ब्रह्मगिरीवर गुंफा त्यामध्ये । दत्तात्रय अविनाशी ॥
निर्गुण सैलीत्यासि शोभे । चिताभस्म अंगी ॥धृ०
तो योगी वीतरागी आपोआप । वाजवितो सिंगी ।
न कळे अंत त्याचा नित्य । आनंद सुख भोगी । ब्रह्म० ॥१॥
दंड कमंडलु घेऊनी हातीं । पवनरुपीं रमतो ।
ब्रह्मांडामध्यें फेरि करुनी । निरंजनि राहतो । ब्रह्म० ॥२॥
चौदेहांचे साक्षी होऊन । उन्मनिसह रमला ।
सत्रावीचें पाणी पिऊनी । ब्रह्मानंदी घाला । ब्रह्म० ॥३॥
अनंतनामी अनंतरुपी । न कळे वेदांसी ।
भावें स्मरतां सदा आनंद । तुळसीदासासी । ब्रह्म० ॥४॥
पद ३ रे
अरे हरी प्यालो मी प्याला । प्याला नामाचा ॥
छंद लागला विठोबाचा । करुन चौरंग । चौरंगदेहाचा ॥
आंत बहु जडाव रत्नांचा । चारी माचवे, चौकोनी ॥१॥
केव्हांची विठ्ठलरुक्मिणी । झालो मी मगन ।
मगन हरि भजनीं । केव्हाची ॥धृ०
तीनशे साठ, साठ तुकडयांचा । चौरंग अमोल मोलाचा ॥
दोरा गुंफिला, गुंफिला सत्वाचा । आकार तिन्ही लोकांचा ॥
चारी कमळें, कमळें विश्वमोहनी । केव्हां० ॥२॥
लाउन दरवाजा, दरवाजा कारागीर ॥
बत्तीस शिपाई चौकिदार । आणि नव खिडक्या, खिडक्या चौफेर ।
मेरुशिखरीं दशवें द्वार । तेंहि गुप्त, गुप्त दावूनी । केव्हां० ॥३॥
गिलावारोगण, रोगण हो करुन । आंत ते सत्रावीचे पाणी ।
रुप सुंदर, सुंदर नाना योनी । तेज फांकले त्रिभुवनी ।
वरी शिवशक्ती, शक्ती स्थापूनी । केव्हां० ॥४॥
ऐसा चौरंग, चौरंग बनविला । हिरा कोंदणी बैसविला ।
शिवलिंगी लोळे, लोळे गुरुचरणीं । केव्हां० ॥५॥
पद ४ थें
कैसी मोहनी घातली गुरुनं । घातला गुरुनं ।
मसी वेडचि गेलें भरुन ॥धृ०
श्रावणांत पेरणी केली पेरणी केली । ती नयन उजेडा आली ॥
मन पवन चित्त एक करुन । मसीं वेडचि गेलें भरुन । कैसी मो० ॥१॥
ऐकतां गजरभूल पडली, गजर० । वीज आकाशांत कडकडली ॥
मन पवन चित्त दृढ धरुन । मसीं वेडचि गेले भरुन ॥२॥
नवग्रास घालींता मुखीं । घाली० ।
दहाव्यांत झालें मी सुखी । अकराव्या घरा जाऊन । घरा जा० ॥
मसीं वेडचि ० ॥३॥
नरहरिनाथ गुरुभजनी, नाथ गुरु० । दास महिपत लागे चरणीं ।
माझे मीपण गेले पुसून । गेलें पु० । मसी वे० ॥४॥
पद ५ वें
गुरुने माझी मजपाशीं । दाविली काशी ॥धृ०
मज पूर्वेहून काढिलें । पश्चिमपंथे चालविले ।
एकविस स्वर्गावरती नेलें । मूळ तीर्थासी । गुरु० ॥१॥
अवजड पश्चिमेचा घाट । बिकट त्रिकुटाची वाट ॥
वरी श्रीहाट गोल्हाट । वोलांडुन त्यासीं । गुरुने० ॥२॥
प्रयाग उन्मनीचें स्थिर । दशवेद्वारी वाट सुंदर ॥
निजरुप तो ईश्वर । दाविलें त्यासी । गुरु० ॥३॥
पाहिलें सहस्त्रदळ कमळ । येथें मुनिजनांचा मेळ ।
परमहंस बैसले बाळ । होऊन संन्यासी । गुरुनें माझी ॥४॥
ऐसी देहाची यात्रा केली । कावड रामलिंगा घातली ॥
जोतियानें खेंप नेली । लक्ष चौर्यांशी । गुरुनें माझी मजपाशीं ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 27, 2024
TOP