पद ३१ वें
सांगा बा लौकरी । कीं मजला कधिं भेटेल मुरारी । धृ० ।
अक्रूर आला घेऊन गेला । बळिराम श्रीहरी । कीं० ॥
गायी वत्सें बहु हंबरती । विकळ होती अंतरी । कीं० ॥२॥
गोपी गोप मिळुनी सर्वही । लीला वर्णिती परोपरी । कीं० ॥३॥
अन्न वस्त्र सर्वही त्यजुनी । लोळती धरणीवरीं । कीं० ॥४॥
दास विलापें हरिसी विनवी । भेट त्यांसि लौकरी ॥५॥

पद ३२ वें
ज्योत झमकलीं बा झमकली । सद्गुरुची किली जनीं वनीं कोंदाटले ॥धृ०
अंतर बाहेर रुप दाटलें । अंतर बाहेर रुप दाटलें ।
अंत बाहेर रुप दाटलें । ज्यो० ॥१॥
चित्ताचे चांदणें । पाहतां मन हे आनंदलें । ज्यो० ॥२॥
दास म्हणे गुरुची लीला । रंग भरला दोन्ही डोळां । ज्यो० ॥३॥

पद ३३ वें
अनुहत वाजवी पुंगी । बावाजोगी ॥धृ०
अनंत युगाचा अतीत । दोन्ही दोरे मनपवनसुत ।
झोळी शिवली सप्त धातूंत । चौखाणींची केली विभूत ।
लाविली अंगी ॥१॥
चौशून्यांचा घातला वांटा । मनशून्यांत गोविल्या जटा ॥
त्याने मेरुचा केला सोटा । सप्त सागरींचा केला घोंटा ॥
मनमार्गी ॥२॥
चौदा चक्रांची बांधिली मढी । हातीं घेऊन ज्ञानतुंबडी ॥
चंद्रसूर्य दीप जोडीं । लाविली शिंगी ॥३॥

ऐसा तो संन्यासी निर्गुण । निर्लोभ निरंजन करितो त्रिवेणीचे स्नान ॥
दिसतो भ्रमर गुंफेतून । असा तो योगी ॥४॥
असा तो गोसावी भेटला । पेल ब्रह्मींचा पाजिला ॥
रामदास तयाचा केला । युगानुयुगीं ॥५॥

पद ३४ वें
आधीं मन मुंडा बा मन मुंडा । मग तुम्ही ब्रह्म धुंडा ॥धृ०
मनच हातीं नाहीं । तेथे ब्रह्मचि करील काई । आ० ॥१॥
मनचि मुंडलें नाहीं । तेथें सद्गुरु करील काई । आ०॥ २ ॥
गोपाळनाथ सांगतो सोई । लागा तुम्ही सद्गुरुपायीं ।
आधी मन मुंडा बा मन० ॥३॥

पद ३५ वें
वैद्ये गुण केला बा गुण केला । संशय अवघा हरिला ॥धृ०
भवरोगाचा झाडा । आत्मप्रति देऊनि युढां । वैद्ये० ॥१॥
तळमळ जीवपणाची भारी । औषधें देऊन केलें दुरीं । वैद्यें० ॥२॥
शांतिसुखाचें पथ्य । मन मारुनि केलें हित । वैद्ये० ॥३॥
गोपाळनाथ म्हणे मी रोगी । सद्गुरु वैद्य मिळावा वेगीं । वैद्यें० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP