झुनझुन पांखरा । जां माझ्या माहेरा
माझ्या कां माहेरीं । चंदनाचं झाड
बैस त्याच्यावरी । सोडुनी शिदोरी
माझ्या कां मायेला । सांगशील काय
पोरीले सासुरवास । खाल्ली तिनं हाय
भावाले पाठवून । मले घेऊन जाय
*
मायबापाच्या घरीं । नाहीं वेंचली गोवरी
त्रास देई नानापरी । सासुबाई
*
मायबापाच्या पोटीं । एक जन्मली कारली
नाहीं धंद्याला हारली
*
सासुरवासाखालीं । डोईच्या वळल्या लटा
नवल करे पिता
सासुरवासाखालीं । डोईचं झालं रान
माय लोणी धाडी कावडीनं
*
सासेचा सासुरवास । नका करुं नंदेबाई
पुनरपि येणें नाहीं । जन्मासि या
*
सासेचा सासुरवास । भोगणें परोपरी
कुळा नांव दूरवरी
*
सासुरवाशीण देवा । जसा घाण्याचा बैल
कधीं विश्रांत होईल
*
सासुरवाशीणीची गोष्ट । सांगावी धीरंधार
जशी आकाशीं फिरे घार । तिला कशाचा आधार
*
सून सासूला शिव्या देती
कशी मरशिल माझे सवती
कारभार नाहीं माझे हातीं
*
जाऊन शेजारणीला पुसती
हिला मरण कशानें येती
आन बचुनागाची कांडी राती
*
बोलाविली वैदाचे हातीं
लाडू म्हणून खायाला देती
उठा उठा हो प्राणपती
*
आज सासुबाई अंतर देती
दणादणा ऊर बडविती
तडातडा केस ओढिती
*
'उपडला काटा' मनांत म्हणती
केली सासुची थाटांत गती
लोकांना देखण दाविती
*
दळण सरलं सरलं म्हणूं नये
उणं कुणाला बोलूं नये
दळण सरलं उरले पांच दाणे
कृष्णासारिखे माझे मामे
दळण सरलं सरलं सूप कोनी
गोविलीं रत्नं दोन्ही
*
दांत डाळंबीचे दाणे । ओठ पोवळ्याचे लाल
मुख गुलाबाचं फुल । सई चंग
साजर्या सुंदर भुवया चंद्रज्योति
सुंदर म्हणूं किती । सईला माझ्या
साजरी सुंदर कशाला वेणीफणी
रुप बघा गेंदावाणी । माझ्या सईचं
साजरी सुंदर कशाला नटपट
शोभे कुंकवाचं बोट । सईला माझ्या
सोनाराच्या घरीं कशाची ठोकठोक
बिंदुले घडवीत । सईला माझ्या
*
सुपली टोपली नाडयानं गुंफली
लाडाची सईबाई खेळाया गेली
अंगणांत माझ्या मुली ग कुणाच्या
आल्या मैतरिणी माझ्या ग सईच्या
*
सईचा हा खेळ आतां कुणी ग मोडिला
वाटेनं नंदी गेला
खेळून माळून आली सई ग घरांत
हिरे चमके बिंदुल्यांत
*
देवाच्या देवळांत फूल सांडिलं जाईचं
गोरं पाऊल सईचं
*
साजरी सुंदर कशाला नटपट
ल्याली कुंकवाचं बोट
मोठे मोठे केस माझ्या मुठींत मावेना
पीठा वांचून न्हाईना
*
नवरी पाहूं आले । काय पहातां नवरीला
आहे सोनं मोहरेला
*
नवरीच्या ग बापाला । रात्रंदिन नाहीं झोंप
कुठं द्यावी रत्नटीक
*
आधीं तेलहळद कुळीच्या अंबाबाई
मग हळद लावावी नवरीला
आधीं तेलहळद कुळीच्या दैवता
मग हळद लावितां नवरीला
आधीं तेलहळद नागोबा कुळीचा
मग मान नवरीचा माझ्या बाई
*
आकाशीचा ग मांडव । पृथ्वीचा जरी मेज
मुली "कन्यादान तुझं
*
मांडवाच्या दारीं चौरंग सायाचे
धुती पाय जांवयाचे