श्री गुरु नागनाथाय नमः । जय जयाजी संत स्वामी ।
तुम्हा देवपण भक्त आम्ही ।
तू जोगीना घरभारी नामी ।
वर्तती कामी निष्काम कैसे ॥१॥
तुझी पाहोनी योगिराज मुद्रा ।
बैसोनी सिंहासन बोध भद्रा ।
त्रिभुवन चालती संभारा ।
चालती घरा बैसती कैसी ॥२॥
शिवानंद भरोनी डोळा । ब्रह्मानंद मुक्ती सोहळा ।
स्वानंदी वेळोवेळा । सगुण ध्यान अगम्या हरा ॥३॥
जन विजन आपणासहित । जया राहाटी वेगळा रीत ।
राहाटमाळे नामी गुंफीत ॥ भंड उभंडत ते कैसे ।४।
ते सर्वासारिखे । परी वर्म जाणिजे तो पारिखे ।
माय बाप बंधु पुत्र हरीखे ।
नामी शोध करी सदा ॥५॥
ललना करोनिया लग्न । दृढ करणे मुळीचे बंधन ।
मोकळेपण जाणे । पुत्र स्वजन वृक्ष छाया ॥६॥
काया छाया माया तळी । बैसोनियागा चंद्र मौळी ।
हर हर एक कल्लोळी ।
करिती आरोळी ते कैसे ॥७॥
एकमेका सुखगोष्टी । करिती तुझीच चावटी ।
सांडोनी वेद राहाटी ।
उठोनी गाठी बांधिती लाभ ॥८॥
स्वइच्छा रमणा । शिव सर्वगत संपूर्णा ।
मार्ग निबिड चालेना । कर हालणा रिघु नाही ॥९॥
आता ऐसीया दाटी संसारी ।
पाच पंचवीस पन्नास घरी ।
मुले सोयरे एक छत्री राणीव करी ।
सुना सोहं मार्तंड ॥१०॥
विश्व माझेने चाले । माझेने पाहती डोळे ।
पाय हाले चाले । कर हाले मम सत्तेने ॥११॥
मीच पुत्र नारी । विस्तारिलो या चराचरी ।
हरा वेगळी गौरी । स्वप्नी तरी हेचि ध्यान ॥१२॥
म्हणोनी तेचि संसारी । शिवचि सर्व अंगिकारी ।
सुखे मी ब्रह्मचारी । नामी मानी चिळसी कदा ॥१३॥
हे शिवकृपा गोमटी । राजयोगिया स्वानंद राहाटी ।
शिवचि झाला पाठी पोटी ।
चिंतामणी संकटी आधी उभा ॥१४॥
उभा राहोनी चोहोकडे । अधिक आवडी दासाकडे ।
गिरिजा शेषे नाही रडे । भक्त भीड काजारी ॥१५॥
ऐसा कनवाळू शिवराणा । जो दृढ असता ध्याना ।
तो कधी संसारी विटेना ।
भक्त शिराणा शिरोमणी ॥१६॥
हे खुण सद्गुरु मुखे । ओळखवी अपार सुखे ।
अनओळखी या दुःखे । वाटे देख संसारी ॥१७॥
संसारिया खुणा । वागती संत सज्जना ।
भुलता पै जाणा । शिव आपण सांभाळी ॥१८॥
घेवोनिया भूत घोंगडी । सदा अंगा लाविती वेडी ।
चिंध्या वेचुनी बापुडी । जगदेव मानिती ॥१९॥
धन्य संकट पडले होते माते । तेणे धावा केला तूते ।
ध्यानी रोकडा आतौते ।
संतभूति ओळखण हरा ॥२०॥
संकटहरा साधुपदा । वोळंगणा करी सदा ।
स्वानंदी शिव सुधा ।
ओविया छंदा नामी पढिये ॥२१॥
जो गाईल वाचील । ऐकोनी कानी चुकेल ।
तयासी शिव उद्धरील ।
प्रसंगी बोलो पुढलीया ॥२२॥
इति श्री संकट हरणी शिव ग्रंथ ।
भावे प्रार्थिला कैलासनाथ ।
श्रोता सावध चित्त । प्रसंग वडवाळसिद्ध नागेश ।