हे सिद्धलिंगाचे चिरंजीव होत. हे वामन पंडिताच्या समकालीन होते. हे नागनाथांचे पूर्ण भक्त होते. हे मोठे योगी असून मोठ्या योग्यतेचे सत्पुरुष होते. यांचे वडील सिद्धलिंगबाबा हे एकदा आरती करीत असता त्यांची नागोजीबुवांनी चूक काढली. तेव्हा वडिलांना तू वेडा आहेस असे म्हणले, तेव्हा पासून आपल्या नावामागे त्यांनी वेडा हे पद जोडण्यास सुरुवात केली, त्यांचे नागनाथांवरील प्रेम दुणावले. गुरुबद्दलचे प्रेम कोणास भूषवणार नाही ? यांनी काही पदे केली आहेत. त्यातील भाषा फारच कळकळीची दिसते. अदभूत कथा ज्या प्रचलित आहेत त्यावरून हे फारच मोठ्या योग्यतेचे होते असे दिसते. यांची काही अध्यात्मपर व काही उपदेशपर पदे आहेत.
उदाहरणार्थ
आता तरी सावध होई मूढा ॥
संसार गेला पाण्याचा बुडबुडा हो ॥ध्रु॥
बालपणी अज्ञानपण गेले ॥
तेथे स्वहित काहीच नाही झाले ।
एवढे देवा तुम्हीच माफ केले हो ॥१॥
तरुणपणी बहु धरियेला थाट ।
विषय छंदे फिरसी दाहीवाट ।
पुढे पहा मोडतील सर्पकाट ॥२॥
वृद्धपणी बहु सूटसेला चळ ॥
बोबडी वाचा न धरियेता ताल ॥
नाही जपला अंतरी राम नाम हो ॥३॥
गेले गेले आयुष्य हातो हाती ।
तुझे सखे दडपितील तोंडे माती ।
उत्तम नरदेह दीधला काळा हाती हो ॥४॥
अधो मुख टांगतील वरती पाय ।
यम दूत मारतील दंड घाय ।
सांडसाने तोडतील लिंग देह हो ॥५॥
वेडा नागा विनविती लहान थोरा ।
सद्गुरुचरण बळकट तुम्ही धरा ।
तेणे चुकेल चौर्यायंशी लक्ष फेरा हो ॥६॥