पहिला अभंग
त्रिभुवनाचा स्वामी आला चंद्रमौळीसी ।
तारक विश्वाचा प्रसन्न झाला भक्तासी ।
भक्तमृत्युलोकी हेगरस परियेसी ।
आण वद्य चवतीसी आला चैत्रमासासी ।
आण चंद्राविण चांदण कृपा केली भक्तासी ।
रिद्धिसिद्धीचा दातार आला चंद्रमौळीसी ।
दाविले निजरुप सिद्धि विंधली तयासी ।
मग जिकडे तिकडे अवघा नागेश प्रकाशु ।
अवघा भुजंगु प्रकाशु ।
मग हेगरस पुत्र गेला पाचारु तयासी ।
मग नागेश बोलिले तै पुत्रासी ।
प्रकृतीचे अंगी कार्य संपादणे बैसी ।
मग उठा उठा हो स्वामी तुम्ही पितृकार्यास ।
मग आम्हासि कैचा पित्रु तूच आमुचा जगदीश ।
मग उठला नागेश मग उठला भुजंग भडंग घेतला भेस । चर्माची वस्त्रे शोभती तयास ।
स्वर्गाहून विमान आले चंद्रमौळीसी ।
नागोबा दयाळ भुजंग दयाळ आला चंद्रमौळीसी ।
मग सकळ संताचा दास विनवी चवंडालिंग चिद्धनासी ।
- चवंडा
दुसरा अभंग -
धन्य धन्य ते मोहोळ ।
हेचि मोक्षाचिये स्थळ ॥१॥
वेद वाखाणिता शिनला ।
साही शास्त्र भांबावला ॥२॥
नागेश त्रैलोकीचा राजा ।
आलासे भक्ताचिया काजा ॥३॥
तेथे हेगरस उपकार ।
तया नसेचि पारावार ॥४॥
वसतसे सोळा सिद्धथोर ।
तेथे चैतन्याचे माहेर ॥५॥
दैवे लाधली संपत्ती ।
अपार सुखाची प्राप्ती ॥६॥
बाबा सिद्धलिंग सद्गुरु ।
तोचि तारक भवसागरु ॥७॥
तेथे नसेचि जन्म मरण ।
चवंडा धरी गुरु चरण ॥८॥