बालगीत - हासरा, नाचरा जरासा लाजर...
पाण्यात खेळायला आणि पावसात भिजायला न आवडणारं मूल कुणीच पाहिलं नसेल.
हासरा, नाचरा
जरासा लाजरा
सुंदर साजरा
श्रावण आला.
तांबूस कोमल
पाउले टाकीत
भिजल्या मातीत
श्रावण आला.
घुमटी लावत
सोनेरी निशाणे
आकाश वाटेने
श्रावण आला.
नौकांच्या संगती
खेळत लाटांशी
झिम्झिम् धारांशी
श्रावण आला.
लपत छपत
हिरव्या रानात
केशर शिंपीत
श्रावण आला.
इंद्रधनुष्याच्या
बांधीत कमानी
संध्येच्या गगनी
श्रावण आला.
लपे ढगामागे
धावे माळावर
असा खेळकर
श्रावण आला.
सृष्टीत सुखाची
करीत पेरणी
आनंदाचा धनी
श्रावण आला.
N/A
References :
कवी - कुसुमाग्रज
Last Updated : December 23, 2007
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP