मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|प्रल्हाद केशव अत्रे|झेंडूची फुले|
अयि नरांग -मल -शोणित -भक्...

प्र.के.अत्रे - अयि नरांग -मल -शोणित -भक्...

प्रल्हाद केशव अत्रे (१३ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, पत्रकार, राजकारणी, हजरजबाबी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक प्रमुख नेते होते.


अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,

जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके!

असु-परीक्षित-हारक-तक्षिके,

'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

या प्रभातसमयास मंगल,

चमकती दंवमौक्तिक निर्मल,

गात पक्षिगण हा गगनी फिरे,

पण दशा तव काय अर-अरे!

ओसरीवरुनि या तव मैत्रिणी

गात स्वैर फिरतात सुलक्षणी

परि तुला न बघती मुळि ढुंकुनी

'संकटी जगि कुणा न असे कुणी!'

मंडई नव्हति का तुज मोकळी,

की मिठाइ 'मघुरा-भुवनांतली,

नव्हति का 'उपहार-गृहे' खुली,

म्हणुनि आलिस शहरातिल बोळ ते,

मनुजवस्तित आलिस का इथे!

करीत 'दत्तु-भट' काय तपासणी

म्हणुनि घाबरुनि आलिस तू झणी!

शर्कराकण येथिल सांडले

सेवुनी न तुज सौख्य जाहले?

की 'यमी' करिंचे गुळखोबरे,

शमवि भूक न काय तुझी बरे?

पेय बोलुनिचालुनि घातकी,

बुडविते बघ भारतियास की,

या अशा व्यसनात विलायती,

अडकता फळ दारुण शेवटी !

नर जसा बुडतो भवडोही

तेवि खालिवर जासि अयाई!

काडि वाचवि जरी बुडत्याला,

काडिचा न परि आश्रय गे तुला!

स्थिति तुझी करुणास्पद ही अशी.

बघु तरी उघड्या नयनी कशी?

अंगि तेवि भरले भयकापरे,

आणि त्यात निवला न चहा बरे!

हाय! सोडुनि जाशिल ना अम्हा,

छे, सले नुसती मनि कल्पना?

समिप पाउसकाळहि पातला,

आणि तू निघुनि जाशिच आजला!

अहह, आम्रफल-मोसम येईल,

अम्हि असू परि तू नसशील!

फेकु सालटि चोखुनि चोखुनि,

तुजविना पण जातिल वाळुनी

तुजविना कवि-मुखे दिसतील की,

भृंगहीन कमळांसम ती फिकी,

कौन्सिलात, सभासद आणी,

मारतील कवणा तुजवाचुनी?

राजकारण रोज नवे नवे,

राष्ट्रभक्त करण्यास तयार हे.

शिंकुनि अहह! देइल त्यापुढे,

त्या इशारत कोण तरी गडे?

यापरी नव-तरंग मनात

येउनी ह्रदय होय कंपित.

पेयपृष्ठि उठली इतुक्यात,

मंद-श्वास,-लहरीसह लाट!

फड फड फड पंखा हालवी ती तराया,

तडफड बहु केली जाहले कष्ट वाया,

मिटवुनि इवलेसे पाय, ती शांत झाली,

अहह, तडक आणी खालती खोल गेली!

टाकुनी लांब सुस्कार, उमाळा दाबुनी उरी,

चहा तो शांत चित्ताने प्राशिला वरचेवरी.

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP