मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|प्रल्हाद केशव अत्रे|झेंडूची फुले|
शाई , कागद , टांक , रूळ ,...

प्र.के.अत्रे - शाई , कागद , टांक , रूळ ,...

प्रल्हाद केशव अत्रे (१३ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, पत्रकार, राजकारणी, हजरजबाबी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक प्रमुख नेते होते.


शाई, कागद, टांक, रूळ, रबरे इत्यादि लेखायुधे

(काड्या आणि विड्या तशा!) जमवुनी खोलीत तो बैसला!

स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला-

"काव्याची उठवीन मी दसकडी या बैठकीला!" वदे!

टाकी बंद करून सर्व खिडक्या-जाळ्या, झरोके तसे

दारालाहि तशीच लावित कडी आतूनबाहेरुनी!

दोस्ताला कुठल्यातरी बसविले दारावरी राखणी;

"काव्याची बघतो मिजास!" वदला अस्पष्ट काही असे!

आता कंबर बांधुनीच कवने 'पाडावया' तो बसे

वार्ता ही वणव्यासमान पसरे गल्लीत चोहीकडे!

आले धावुनि लोक सर्व! दुसरे कोणा सुचावे कसे?

चिंताक्रान्त मुखे करूनि बसले निःस्तब्ध दारापुढे!

झाला तब्बल तास! चाहुल परी काही न ये आतुनी,

सर्वांचा अगदीच धीर सुटला! कोमेजले चेहरे!

भाळी लावुनि हात कोणि वदती "मजी प्रभूची बऽऽरे!"

दृष्टी खिन्नपणे नभी वळवुनी निःश्वास टाकी कुणी!

गंभीर ध्वनि तोच आतुनि निघे! उंचावली मस्तके!

श्वासोच्छ्वास क्षणैक थांबत! मुखे रुंदावली कौतुके!!

डोकावूनि बघे फटींतुनि कुणी-तो त्या दिसे अद्‌भुत!

होता बाड उरी धरून पडला निश्चित तो घोरत!!

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP