थांबीव एकदा सारंगी ही चल जा, येथुन दूर! ॥ध्रु०॥
काम करुनी देह थकला,
प्राण अगदी कंठि आला,
शेजेस पाठ ना कुठे लागली, तोच निघे तव सूर.
गुंतला हा जीव आधी,
गुंतवाया त्यास नादी,
निवडून वेळ तू अचुक काढिशी, दिसशी खूप चतूर.
जीवनाची रागदारी,
ऐकुनीया ये शिसारी,
या विटल्या कानी संगीताची आता कुठुन जरूर?
कापर्या या घेशि ताना,
डोलवीशी आणि माना,
दाविशी कराची सहज सफाई, गज चाले चौखूर!
फिरति तारांवरुनि बोटे,
नाद वरचे वरति उमटे,
वाहते ह्रदय त्यातून कुठे? ते बिदागीस आतूर?
आग पेटे आत पोटी
शांतता हि वदनि खोटी,
हे सूर कशाचे? जळजळीत हा लोहरसाचा पूर.
आतड्याच्या पिळुनि तारा,
काढशी या गीतधारा,
ऐकून भयानक राग तयाचा हसे रात्र भेसूर.
याचनेचा सूर रडका,
त्यास कसला ताल-ठेका?
घाबर्या मनी उठविते उलट हे भलभलते काहूर.
लाकडी हे वाद्य दुबळे
मानवी त्या हेतु न कळे,
नातरी तडकुनी दुभंग होइल खास तयाचा ऊर!
हाति येता चार तुकडे,
टाकसी का वाद्य उपडे?
करितोस कलेची पोटासाठी विटंबना मगरूर!
जे हरीचे लाल हौशी,
जीव हळवे की विलासी,
जा, तया कुशलता दाव! तयांचे खिसे खोल भरपूर.
जीव निद्रेमाजि रंगे,
स्वप्नसृष्टीतून गुंगे,
जा, देऊ नको क्षणमात्र जगाची तयासि जाणिव क्रूर.