एकनाथी भागवत - श्लोक ४ था

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


द्वावेव चिन्तया मुक्तौ परमानन्द आप्लुतौ ।

यो विमुग्धो जडो बालो यो गुणेभ्यः परं गतः ॥४॥

थोर चिंतेचा आवर्त । जेथ ब्रह्मादिक बुडत ।

ते आवर्तीं दोघे मुक्त । परीस निश्चित यदुवीरा ॥७४॥

दोघां नाहीं द्वैतभान । दोघे नेणती मानापमान ।

दोघे सुखें सुखसंपन्न । दोघे मनेंवीण वर्तती ॥७५॥

एकासी पुढे भेटले दुःख । दुजेनि जिंतिलें सुखदुःख ।

एकासी मुग्धतेचें सुख । दुज्या देख निजज्ञान ॥७६॥

पाहतां बाळकाचे ठायीं । गुप्तवासना असे देहीं ।

ते अंकुरीजोनि पाही । अवश्य अपायीं घालील ॥७७॥

तैसा नव्हे योगिया गुणातीत । जो पूर्णानंदें पूर्ण भरित ।

त्यासी सुखदुःखाची मात । नाहीं जगांत सर्वथा ॥७८॥

देहीं दिसे जीव वर्तत । तो केवीं झाला गुणातीत ।

ऐसे म्हणसी तो वृत्तांत । ऐक साद्यंत सांगेन ॥७९॥

साधकें सेवूनि साधुजन । वाढविला सत्त्वगुण ।

वाढलेनि सत्त्वें जाण । ज्ञानसमाधान साधिलें ॥८०॥

साधिलेनि ज्ञानसाधनें । छेदी रजतमांचीं विंदानें ।

जें मोहममतेचीं दारुणें । उभय भोगजन्यें कर्मठां ॥८१॥

एवं वाढलेनि सत्त्वोत्तमें । निर्दळलीं रजतमें ।

सत्त्व एकलेपणें निमे । स्वयें उपशमें तें जाणा ॥८२॥

जंव जंव काष्ठसंभार असे । तंव तंव अग्नि जाळी उल्हासें ।

सरलेनि काष्ठलेशें । अग्नि प्रवेशे निजतेजीं ॥८३॥

ऐसी जिणोनि गुणावस्था । योगी पावला गुणातीतता ।

त्यासी न बाधी भवव्यथा । प्रलयकल्पांता जालिया ॥८४॥

ज्या सुखासी नाहीं अंत । तें सुख स्वरूपें जालें प्राप्त ।

ते देहीं वर्ततां देहातीत । चिंताआवर्त त्यां नाहीं ॥८५॥

एकाकी जाहल्यावीण तत्त्वतां । ते अवस्था न चढे हाता ।

येचिविशीं नृपनाथा । कुमारीगुरुकथा सांगेन ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP