एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तदैवमात्मन्यवरुद्धचित्तो न वेद किञ्चिद् बहिरन्तरं वा ।

यथेषुकारो नृपतिं व्रजन्तमिषौ गतात्मा न ददर्श पार्श्वे ॥१३॥

ऐसी चिन्मात्र परिपूर्णता । तेथ निरोधूनि आणितां चित्ता ।

चित्त पावे चैतन्यता । जाण सर्वथा नरवीरा ॥४७॥

तेव्हां अंतरीं चैतन्यघन । बाह्य चिन्मात्र परिपूर्ण ।

आणिक न दिसे गा जाण । वृत्तीनें आण वाहिली ॥४८॥

पाहतां ध्येय ध्याता ध्यान । जेथ उल्हासें विगुंतलें मन ।

ते संप्रज्ञातसमाधी जाण । गुणेंवीण भोगिती ॥४९॥

तेथ निःशेष समरसे मन । झाला सुखरूप चिद्‍घन ।

ते समाधी परम कारण । विचक्षण बोलती ॥१५०॥

ब्रह्म इंद्रियां गोचर नसे । गुण गेलिया डोळां दिसे ।

हे अनुभव्यासीचि भासे । बोलावें ऐसें तें नव्हे ॥५१॥

येथ शास्त्रें विषम झालीं वादें । 'नेति नेति' म्हणितलें वेदें ।

थोटावलीं योगिवृंदें । अनुभवी निजबोधें जाणती ॥५२॥

तेथ हेतुमातु दृष्टांतू । समूळ बुडाला समस्तू ।

अद्वैतवादाची मातू । ज्या ठायांतु गांजिली ॥५३॥

सबाह्य समदर्शन । हे अनुभवाची निर्वाणखूण ।

शरकार गुरु केला जाण । हेंचि लक्षण लक्षूनि ॥५४॥

तावूनि उजू करितां बाण । दृढ लागलें अनुसंधान ।

इतुकेन प्रपंचाचें भान । खुंटलें जाण तयाचें ॥५५॥

निशाण भेरी वाजंतरें । रथ गज सैन्य संभारें ।

राजा गेला अतिगजरें । नेणिजे शरकारें शरदृष्टीं ॥५६॥

मागूनि रायाचा हडपी आला । तो पुसे ये मार्गी राजा गेला ।

येरु म्हणे नाहीं देखिला । गेला कीं न गेला कोण जाणे ॥५७॥

तो शरकारू देखिला दृष्टीं । हे ऐकोनि तयाची गोष्टी ।

जगीं एकाग्रता मोटी । प्रपंच दृष्टीं येवों नेदी ॥५८॥

हेंचि साधावया साधन । गहारंभेंवीण एकपण ।

सर्प गुरु केला जाण । हेंचि लक्षण देखोनि ॥५९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP