एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसम्भवान्ते मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीरः ।

तूर्णं यतेत न पतेदनुमृत्यु यावन्निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतः स्यात् ॥२९॥

चौर्‍यांशीं लक्षयोनींप्रती । जैं कोटिकोटि फेरे होती ।

तैं नरदेहाची प्राप्ती । अवचटें लाहती निजभाग्यें ॥३२॥

जो मनुष्यदेही जन्मला । तो परमार्थासी लिगटला ।

एवढा अलभ्य लाभ जाला । पितरीं मांडिला उत्साहो ॥३३॥

झालिया मनुष्यदेहप्राप्ती । परमार्थ साधूं भोगाअंतीं ।

एवढी येत नाहीं निश्चिती । मृत्युप्राप्ति अनिवार ॥३४॥

मृत्यु न विचारी गुण दोष । न म्हणे देश विदेश ।

न पाहे रात्र-दिवस । करीत नाश तत्काळ ॥३५॥

देह जैंपासोनि झाला । तैंपासूनि मृत्यु लागला ।

जेवीं सापें बेडूक धरिला । गिळूं लागला लवनिमिषें ॥३६॥

साप बेडुकातें गिळी । बेडूक मुखें माशातें कवळी ।

तैशीं मृत्युमुखीं पडलीं । विषयभुलीं झोंबतीं ॥३७॥

येथ आळसु जेणें केला । तो सर्वस्वें नागवला ।

थिता परमार्थ हातींचा गेला । आवर्ती पडला भवचक्रीं ॥३८॥

ऐसें जाणोनि यदुराया । देहाचिया लवलाह्या ।

परमार्थ साधावया । ब्रह्मोपाया उद्यत व्हावें ॥३९॥

छेदोनियां आळसासी । दवडूनियां निद्रेसी ।

आत्मचिंतन अहर्निशीं । अविश्रमेंसीं साधावें ॥३४०॥

रणीं रिघालिया शूरासी । न जिणतां परचक्रासी ।

विसांवा नाहीं क्षत्रियांसी । तेणें वेगेंसीं साधावें ॥४१॥

साधावया आत्मलग्न । सावधान बिजवराचें मन ।

तेणें साक्षेपें आपण । सायुज्यलग्न साधावें ॥४२॥

रायाचें एकुलतें एक । चुकल्या अवचटें बाळक ।

तो जेवीं शोधी सकळ लोक । तेवीं निजसुख साधावें ॥४३॥

काळाचा चपेटघात । जंव वाजला नाहीं येथ ।

तंव साधावया परमार्थ । आयुष्य व्यर्थ न करावें ॥४४॥

नरदेहींचेनि आयुष्यें । प्रपंचाचेनि हरूषें ।

विषयाचेनि विलासें । भोगपिसे नर जाले ॥४५॥

पश्वादियोनींच्या ठायीं । विषयांवांचोनि आन नाहीं ।

तेचि विषयो नरदेहीं । वाढविल्या कायी हित झालें ॥४६॥

विचारितां विवेकदृष्टीं । विषयांसी प्रारब्धें भेटी ।

वृथा करितां आटाटी । मुद्दलतुटी नरदेहा ॥४७॥

नरदेह परम पावन । पावोनि न साधी ब्रह्मज्ञान ।

तो लांडा गर्दभ जाण । पुच्छेंवीण दुपायी ॥४८॥

अपरोक्षज्ञानेंवीण वांझट । उदरार्थ दंभ खटपट ।

जेवीं मदिरापानी मर्कट । उडे उद्भट तडतडां ॥४९॥

ब्रह्मज्ञानेंवीण शास्त्रज्ञ । ते अंधारींचे खद्योत जाण ।

अज्ञाननिशीमाजीं तेज गहन । सूर्योदयीं कोण त्यां देखे ॥३५०॥

ब्रह्मज्ञानेंवीण संन्यासी । नटाच्या ऐसें मुंडण त्यांसी ।

सोकले मिष्टान्नभिक्षेसी । वृथा गेरूसी नाशिलें ॥५१॥

मनीं विषयांचें अभिलाषण । धरूनि करिती वेदाध्ययन ।

ते वर्षाकाळींचे दर्दुर जाण । कर्दमपानें जल्पती ॥५२॥

विषयप्राप्तीलागीं मौन । तें बकाचें बकध्यान ।

विषयबुद्धी जें गायन । तें खरी देखोन खर भुंके ॥५३॥

विषयालागीं उपन्यास । नाना युक्तींचे विलास ।

जेवीं पिंड देखोनि वायस । करिती बहुवस अतिशब्द ॥५४॥

पोट भरावया भांड । सैरा वाजविती तोंड ।

तैसें विषयांलागीं वितंड । शास्त्रपाखंड बोलती ॥५५॥

विषयवासना धरूनि थोर । बाह्य मिरविती आचार ।

जेवीं कागाचा शौचाचार । विष्ठातत्पर मानसीं ॥५६॥

हृदयीं धरूनि जीविका चांग । करिती अग्निहोत्रयाग ।

जेवीं वेश्या विकोनि अंग । चालवी सांग संसारा ॥५७॥

नरदेहींचा हाचि स्वार्थ । साधावा चौथा पुरुषार्थ ।

तो न करितां जो का अर्थ । तो अनर्थ जाणावा ॥५८॥

साधीना देहीं ब्रह्मज्ञान । तो श्वानसूकरांसमान ।

अथवा त्याहोनि हीन । तें विवेचन परियेसीं ॥५९॥

पशूसी हाणिल्या लाथा । द्वेष न धरी सर्वथा ।

मनुष्यासी 'तूं' म्हणतां । जीवघाता प्रवर्ते ॥३६०॥

पशूसी लोभ नाहीं संग्रहता । एक आहार होय भक्षिता ।

मग उरलिया अर्था । त्यागी सर्वथा तत्काळ ॥६१॥

मनुष्याचें लोभिष्ठपण । गांठीं असल्या कोटि धन ।

पोटा न खाय आपण । मा त्यागितां प्राण त्यजील ॥६२॥

सायंप्रातर्चिंता । पशूसी नाहीं सर्वथा ।

मनुष्याची चिंता पाहतां । जन्मशतां न राहे ॥६३॥

अमित धन असतां गांठीं । तरी चिंता अनिवार मोठी ।

नाथिलेंचि भय घे पोटीं । अविश्वासी सृष्टीं नरदेही ॥६४॥

जरी मरों टेंकलें शरीर । तरी व्यवहारीं साधी वृत्तिक्षेत्र ।

पाया शोधोनि बांधी घर । पुत्रपौत्र नांदावया ॥६५॥

ऐसी दुस्तर चिंता । पशूसी नाहीं सर्वथा ।

आतां मैथुनाची कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥६६॥

पशूसी ऋतुकाळीं मैथुन । मग स्त्रियेसी नातळे आपण ।

पुरुषासी नित्य स्त्रीसेवन । गरोदरही जाण न सोडी ॥६७॥

काम क्रोध सलोभता । चिंता निंदा अतिगर्वता ।

हें मनुष्याचेचि माथां । पशूसी सर्वथा असेना ॥६८॥

न साधितां आत्मज्ञान । केवळ जे विषयी जन ।

ते श्वानसूकरांपरीस हीन । माणुसपण त्यां नाहीं ॥६९॥

विषयाचें जें सुख जाण । तें स्वर्गी नरकीं समान ।

जें इहलोकीं भोगी श्वान । तें स्वर्गी जाण इंद्रासी ॥३७०॥

मनुष्यदेहावांचोनी । पशुपक्ष्यादि नाना योनी ।

त्या विषयभोगालागोनी । विषयच्छेदनीं नरदेह ॥७१॥

तो नरदेह कैसेनि जोडे । ते प्राप्तीचें कठिण गाढें ।

तें सांगेन तुजपुढें । परिस निवाडें विभागु ॥७२॥

अत्यंत सुकृतें स्वर्गी चढे । अत्यंत पापें अधोगती घडे ।

पापपुण्य निःशेष झडे । तैं आतुडे निजमुक्ति ॥७३॥

जैं पापपुण्य समान समीं । तैं मनुष्यदेह आक्रमी ।

जन्म पावे कर्मभूमीं । आश्रयधर्मी सुमेधा ॥७४॥

साक्षेपें मनुष्यदेह जोडे । ऐसें करितां तंव न घडे ।

अवचट हाता चढे । भाग्य चोखडें जयाचें ॥७५॥

मोलें अनर्घ्य रत्‍नें येती । तैसा चिंतामणी न ये हातीं ।

तेवी बहुत योनिये जन्म होती । परी मनुष्यदेहप्राप्ती दुर्लभ ॥७६॥

ऐसा नरदेह पावोनि देख । जो न साधीचि ब्रह्मसुख ।

तो जनांमाजीं परम मूर्ख । विश्वासघातक देवाचा ॥७७॥

निजात्मप्राप्तीलागोनी । देवें केली मनुष्ययोनी ।

तो देवाचा विश्वास बुडवुनी । विषयसेवनीं निजपतन ॥७८॥

होतें पितरांचें मनोगत । पुत्र होईल हरिभक्त ।

कुळ उद्धरील समस्त । विषयीं प्रतिहत तें केलें ॥७९॥

हो का सकळ भाग्याचें फळ । मनुष्यदेह गा केवळ ।

तें करावया सफळ । वैराग्य अढळ म्यां केलें ॥३८०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP