॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो श्रीजनार्दन । सकळ सिद्धींचें सिद्धस्थान ।
सकळ ऋद्धींचें परम निधान । तुझे श्रीचरण सर्वार्थी ॥१॥
निधान साधावया अंजन । नयनीं काळिमा घालिती जन ।
तेणें काळवंडले नयन । थितें निधान दिसेना ॥२॥
तैसे नव्हती तुझे चरण । करितां चरणरजवंदन ।
निःशेष काळिमा निरसे जाण । पूर्ण निधान दाविसी ॥३॥
अंजनें साधितां निधान । तेथ छळावया पावे विघ्न ।
बळी देऊनि साधिल्या जाण । नश्वरपण तयासी ॥४॥
तैसे नव्हती तुझे चरण । अवलीळा करितां स्मरण ।
नित्य सिद्ध अव्यय जाण । निजनिधान ठसावे ॥५॥
हें साधूनियां निधान । झाले सनकादिक संपन्न ।
नारदाचें उदारपण । येणेंचि जाण वाखाणे ॥६॥
वज्रकवच प्रल्हादासी । हेंचि भांडवल गांठी त्यासी ।
शुकादि वामदेवांसी । महिमा येणेंसीं पावले ते ॥७॥
व्यासवाल्मीकि महावेव्हारे । येणेंचि भांडवलें झाले खरे ।
त्यांचेनि भांडवलें लहान थोरें । छेदूनि दरिद्रें नांदती ॥८॥
त्या सद्गुरूचे श्रीचरण । परम निधींचें निधान ।
एका जनार्दना शरण । हें आम्हां परिपूर्ण भांडवल ॥९॥
येणेंचि भांडवलें प्रस्तुत । प्राप्त झालें श्रीभागवत ।
तेथ उद्धवासी श्रीअनंत । ज्ञानमथितार्थ सांगत ॥१०॥
त्या दोघांची एकान्त मातू । प्रकट जाहली जगाआंतू ।
हा परीक्षितीचा विख्यातू । उपकार लोकांतू थोर झाला ॥११॥
ज्याचे श्रद्धेच्या आवडीं । शुक पावला लवडसवडी ।
तेणें गुह्य ज्ञानाची गोडी । प्रकट उघडी दाखविली ॥१२॥
त्या शुकाचें नवल महिमान । कानीं न सांगतां गुह्य ज्ञान ।
श्रवणें तोडोनि भवबंधन । परीक्षिती जाण उद्धरिला ॥१३॥
एथवरी श्रवणाची गोडी । प्रसिद्ध दाविली उघडी ।
तरी अभाग्यु दांतखिळी पाडी । कानाची नुघडी निमटली मिठी ॥१४॥
श्रवणीं घालितां वाडेंकोडें । कथासारामृत बाहेरी सांडे ।
श्रवणाआंतौता थेंबही न पडे । यालागीं रडे विषयांसी ॥१५॥
असो हे श्रोत्यांची कथा । कथा सांगे जो वक्ता ।
तोही तैसाचि रिता । घोटु आंतौता पावों नेदी ॥१६॥
जैसा गुळउंसाचा घाणा । रसु बाहेरी जाये मांदणा ।
फिकेपणें करकरी गहना । ते गती वदना वक्त्याचे ॥१७॥
जें कथामृताचें गोडपण । तें सद्गुरूवीण चाखवी कोण ।
यालागीं जनार्दना शरण । जेणें गोडपण चाखविलें ॥१८॥
परी चाखविली उणखूण । तेही अभिनव आहे जाण ।
स्वाद स्वादिता आपण । होऊनि गोडपण चाखवी ॥१९॥
बाळकाहातीं दिधल्या फळा । खावें हें न कळे त्या अबळा ।
त्याचे मुखीं घालूनि गळाळा । गोडीचा जिव्हाळा जनक दावी ॥२०॥
गोडी लागल्या बाळकासी । तेंचि फळ खाय अहर्निशीं ।
तेवीं जनार्दनें आम्हांसी । गोडी श्रीभागवतासी लाविली ॥२१॥
ऐसी लाविली गोडी चढोवडी । तेणें झाली नवलपरवडी ।
मज सांडितांही ते गोडी । गोडी न सोडी मजलागीं ॥२२॥
ते गोडीनें गिळिलें मातें । मीपण गेलें गोडीआंतौतें ।
ते गोडीचें उथळलें भरितें । सबाह्य रितें उरों नेदी ॥२३॥
हें शुकमुखींचें श्रेष्ठ फळ । गोडपणें अतिरसाळ ।
त्वचा आंठोळीवीण केवळ । गोडीच सकळ फळरूपें ॥२४॥
ते श्रीभागवतींची गोडी । श्रीकृष्णें निजआवडीं ।
उद्धवासी कडोविकडी । भक्ति चोखडी चाखविली ॥२५॥
करितां माझें भजन । धरितां माझे मूर्तीचे ध्यान ।
समाधिपर्यंत साधन । उद्धवासी संपूर्ण सांगीतलें ॥२६॥
ते कृष्णामुखींची मातू । ऐकोनि चौदाव्या अध्यायांतू ।
उद्धव हरिखला अद्भुतू । माझा निजस्वार्थू फावला ॥२७॥
मज कृष्णमूर्तीचें ध्यान । सहजें सदा असे जाण ।
तेणेंच होय समाधि समाधान । तरी कां प्रश्न करूं आतां ॥२८॥
ऐकोनि चौदावा अध्यायो । झाला उद्धवासी हा दृढ भावो ।
हें देखोनि स्वयें देवो । पुढील अभिप्रावो सूचितू ॥२९॥
दृढ विश्वसेंसीं जाण । करितां माझें भजन ध्यान ।
पुढां उपजे सिद्धींचें विघ्न । ते अर्थीं श्रीकृष्ण उपदेशी ॥३०॥
पंधरावे अध्यायीं निरूपण । भक्तीं माझें करितां भजन ।
अवश्य सिद्धी उपजती जाण । त्या त्यागवी विघ्न म्हणोनी ॥३१॥