परमाणुमये चित्तं भूतानां मयि रञ्जयन् ।
कालसूक्ष्मार्थतां योगी लघिमानमवाप्नुयात् ॥१२॥
वाय्वादि प्राणप्रमाण । जेणें काळसूत्राचें गणन ।
तो परमाणुरूप भगवंत जाण । त्याचेंचि दृढ ध्यान सदा जो करी ॥७५॥
परमाणुधारणेचा महिमा । त्याचा देहासी ये अतिलघिमा ।
तो मस्तकीं चढोनि पाहे मा । उडे व्योमामाजीं सुखें ॥७६॥
अणिमादि तीनी धारणा । या देहींच्या सिद्धी जाणा ।
लहान थोर हळूपणा । देहलक्षणां उपजवी ॥७७॥
उरल्या ज्या पंचमहासिद्धी । त्यांच्या धारणेचा विधी ।
तोही सांगेन त्रिशुद्धी । ऐक सुबुद्धी उद्धवा ॥७८॥