अहमात्माऽऽन्तरो बाह्योऽनावृतः सर्वदेहिनाम् ।
यथा भूतानि भूतेषु बहिरन्तः स्वयं तथा ॥३६॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे पञ्चदशोऽध्यायः ॥१५॥
जीवांच्या जीवामाजीं माझा वास । जीव मजमाजीं सावकाश ।
माझें स्वरूप गा असमास । गुणमायेस अनावृत ॥२७॥
जेवीं घटाची वस्ती आकाशीं । आकाश सबाह्य त्या घटासी ।
तेवीं मी जीवमात्रांसी । सबाह्य हृषीकेशी परिपूर्ण ॥२८॥
जैशीं महाभूतें भौतिकांसी । सबाह्य असती सर्वांसी ।
तेवीं मी सकळ जगासी । सबाह्य हृषीकेशी पूर्णत्वें पूर्ण ॥२९॥
जीवन जैसें तरंगासी । कां गोडी जैसी गुळासी ।
तेवीं अनंतकोटि ब्रह्मांडांसी । मी पूर्णत्वेंसी परिपूर्ण ॥२३०॥
मज पूर्णाची पूर्ण प्राप्ती । निकट येतयेतां हातीं ।
ते संधीं सिद्धी नागविती । भोगसंपत्तीउपचारें ॥३१॥
ज्याचें रायापाशीं पूर्ण चलन । त्याचे हाता ये लांचु संपूर्ण ।
तेणेंचि तो पावे मरण । तैशा सिद्धी जाण घातका ॥३२॥
ये अध्यायींचें निरूपण । सांगावया हेंचि गा कारण ।
माझे प्राप्तीस सिद्धी विघ्न । उद्धवा जाण निश्चितीं ॥३३॥
एकाग्र भजनें माझी प्राप्ती । होतां ते संधीसी सिद्धी येती ।
त्या भुलवोनियां भोगासक्तीं । नागविती साधकां ॥३४॥
जे नेणती माझें निजसुख । ऐसे जे कां केवळ मूर्ख ।
त्यांसीच सिद्धींचें कौतुक । अलोकिक भोगलिप्सा ॥३५॥
जैसे वेश्येचे हावभाव । तैसें सिद्धींचें वैभव ।
हें त्यागावया गा सर्व । देवें हा अध्याव निरूपिला ॥३६॥
ज्यासी प्राप्त माझें निजसुख । त्यासी सिद्धी तुच्छप्राय देख ।
न देखती जन्ममरणांचें मुख । माझा पूर्ण हरिख कोंदाटे ॥३७॥
सेवितां सद्गुरुचरण । कोंदाटे ब्रह्म परिपूर्ण ।
तेथ सिद्धींसी पुसे कोण । हे जाणती खूण हरिभक्त ॥३८॥
हरिभक्तीसी विकीला भावो । भजनें फिटला अहंभावो ।
तेथ सिद्धींचा भोगसंदेहो । निपुजे पहा हो सर्वथा ॥३९॥
भुक्ति मुक्ति ऋद्धि सिद्धी । सद्गुरुचरणीं गा त्रिशुद्धी ।
हें नेणती जे मंदबुद्धी । ते नाना सिद्धी वांछिती ॥२४०॥
सकळ सिद्धींचें साधन । निरपेक्षता सत्य जाण ।
निरपेक्षाचें अंगण । सिद्धी संपूर्ण ओळंगती ॥४१॥
सिद्धींची अपेक्षा ज्यांचे चित्तीं । सिद्धी त्यांकडे न थुंकिती ।
निरपेक्षाचे पायींची माती । सिद्धी वंदिती सर्वदा ॥४२॥
ज्ञानवैराग्यभक्तीचे माथां । सत्य जाण पां निरपेक्षता ।
ते निरपेक्षता आलिया हाता । मुक्ति सायुज्यता पायां लागे ॥४३॥
निरपेक्षतेपाशीं सर्व सिद्धी । निरपेक्षतेपाशीं विधी ।
निरपेक्षतेपाशीं सुबुद्धी । चरण वंदी अहर्निशीं ॥४४॥
निरपेक्षता तेथ निर्वाहो । निरपेक्षता तेथ सद्भावो ।
निरपेक्षतेपाशीं भगवद्भावो । यथार्थ पहा वो तिष्ठतू ॥४५॥
निरपेक्षतेपाशीं उपनिषद्भागू । निरपेक्षतेपाशीं साचार योगू ।
निरपेक्षता स्वानंद भोगू । सांपडे श्रीरंगू निरपेक्षा ॥४६॥
एका जनार्दना शरण । त्याचे वंदितां श्रीचरण ।
चढती निरपेक्षता जाण । सदा संपूर्ण स्वानंदें ॥४७॥
आम्हां स्वानंदाचा निजबोधू । हा सद्गुरुचरणींचा प्रसादू ।
महासुखाचा विनोदू । आनंदकंदू श्रीचरणीं ॥४८॥
गुरुचरणीं करितां भक्ती । अनायासें प्राप्त चारी मुक्ती ।
निजशांतीसी विरक्ती । सेवा मागती गुरुभक्त ॥४९॥
एका जनार्दना शरण । त्याचे कृपेस्तव जाण ।
श्रीभागवताचें निरूपण । झाला संपूर्ण पंधरावा ॥२५०॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे
श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां सिद्धीनिरूपणयोगो नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोकसंख्या ॥३६॥ ओंव्या ॥२५०॥