अग्न्यादिभिर्न हन्येत मुनेर्योगमयं वपुः ।
मद्योगशान्तचित्तस्य यादसामुदकं यथा ॥२९॥
अतिप्रयास करितां चित्त । मजसी योगातें झालें प्राप्त ।
तेणें योगें शरीर योगयुक्त । अबाधित महाद्वंद्वीं ॥५३॥
त्यासी बाधीना शीत उष्ण । मृदु आणिक कठिण ।
अग्नि लागलियाही जाण । देह दहन नव्हे त्याचा ॥५४॥
ते अग्निमाजीं विश्रांति त्यासी । जेवीं कां जळीं जळचरांसी ।
अद्वंद्वतासिद्धी ऐसी । साधकासी उपतिष्ठे ॥५५॥
येचि सिद्धीच्या धारणा । प्रतिष्टंभसिद्धी प्रकटे जाणा ।
ऐक तिच्याही लक्षणा । जिचे तोडरीं जाणा सकळ बाधा ॥५६॥
त्यासी बाह्य वायूचेनि झडाडें । बाधकता कदा न घडे ।
प्राण जिंतोनि आंतुलीकडे । करी रोकडे दासी त्यासी ॥५७॥
देंठ फेडूनि सुमनसेजे । जेवीं कां सुखें निद्रा कीजे ।
तेवीं इंगळावरी हा निजे । बाधा नुपजे अग्नीची ॥५८॥
शीतळ जळीं शीतकाळीं । सिद्ध बुडविल्या कौतुकें जळीं ।
तो बाहेरी निघावया न तळमळी । जळीं मासोळी जेवीं क्रीडे ॥५९॥
ग्रीष्मकाळींचें निदाघ उष्ण । त्यामाजीं सिद्ध घातल्या जाण ।
रविकरीं पद्म उल्हासे गहन । तैंसे लागतां उष्ण तो टवटवी ॥६०॥
यापरी अर्कबाधकता । त्यासी बाधीना सर्वथा ।
तैशींच सिद्धासी शस्त्रें लागतां । शस्त्रघाता नातुडे तो ॥६१॥
आकाश खोचूं जातां पाहें । शस्त्रेंसीं घावो वायां जाये ।
तेवीं सिद्धासी न लागती घाये । शस्त्रउपाये सुनाट ॥६२॥
सिद्धासी दिधलिया विख । विखही नव्हे त्या बाधक ।
जेवीं विखकिडे विखीं देख । यथासुख क्रीडती ॥६३॥
छाया पर्वतातळीं दडपितां । ते दाटेना जेवीं पर्वता ।
तेवीं अग्नि अर्क विष अंबु वाता । सिद्धासी सर्वथा बाधेना ॥६४॥
ऐकोनि सिद्धींची कथा । उल्हासू जरी माने चित्ता ।
तरी माझे प्राप्तीसी तत्त्वतां । सिद्धी सर्वथा बाधक ॥६५॥
माझें स्वरूप शुद्ध अद्वैत । तेथ सिद्धींचें जे मनोरथ ।
लोकरंजन समस्त । नाहीं परमार्थ सिद्धींमाजीं ॥६६॥
मागिलेचि श्लोकसंधीं । परचित्ताभिज्ञतेचि सिद्धी ।
ध्वनित सुचविली त्रिशुद्धी । तिचाही विधी अवधारीं ॥६७॥
तेच श्लोकीं व्याख्यान । करितां भगवंताचें ध्यान ।
प्रकृतिनियंता आपण । साक्षी जाणा सर्वांचा ॥६८॥
ऐसें ईश्वरत्व दृढ ध्यातां । चित्तचालकता ये त्याच्या हाता ।
तेव्हां चित्ताची अभिज्ञता । स्वभावतां उपतिष्ठे ॥६९॥
तेव्हां जीवाची स्वप्नावस्था । हा साक्षित्वें देखता ।
जो जो संकल्प त्याच्या चित्ता । तो स्वभावतां हा जाणे ॥७०॥
जिव्हारींची जे आवडी मोटी । ते हा अवलीला सांगे गोष्टी ।
एवढी सिद्धीची कसवटी । उठाउठी तो लाभे ॥७१॥