जन्मौषधितपोमन्त्रैः यावतीरिह सिद्धयः ।
योगेनाप्नोति ताः सर्वा नान्यैर्योगगतिं व्रजेत् ॥३४॥
सिद्धींचे प्राप्तीचें कारण । जन्मौषधि मंत्र तप जाण ।
कां साधल्या प्राणापान । सकळ सिद्धी जाण योगाभ्यासीं ॥९९॥
एकी जन्मास्तव सहज सिद्धी । एकी त्या साधिती औषधी ।
एकी त्या तपादि महाविधी । एकी त्या त्रिशुद्धि मंत्रद्वारा ॥२००॥
सर्पासी वायुधारण । मीनासी जळतरण ।
पक्ष्यासी नभोगमन । हे जन्मसिद्धी जाण स्वाभाविक ॥१॥
हंस निवडी क्षीरनीर । कोकिळेसी मधुर स्वर ।
चंद्रामृत सेवी चकोर । हे सिद्धी साचार जन्मास्तव ॥२॥
जन्मास्तव सहज सिद्धी । त्या म्यां सांगीतल्या सुबुद्धी ।
आतां साधिलिया औषधी । लाभती सिद्धी त्या ऐक ॥३॥
श्वेतमांदारीं गजानन । अंगारकचतुर्थी साधिल्या जाण ।
सकल विद्यांचें होय ज्ञान । धनधान्यसमृद्धी ॥४॥
अजानवृक्षाची वोळखण । त्याचीं फळें श्वानमुखें जाण ।
त्याचें घडल्या क्षीरपान । होय आपण अजरामर ॥५॥
पिचुमंद नित्य सेविल्या देख । त्यासी बाधीना कोणी विख ।
पाताळगरूडीचें प्राशिल्या मुख । त्यासी देहदुःख बाधीना ॥६॥
पूतिकावृक्षाचे मूळीं । असे महाशक्तीची पुतळी ।
ते साधल्या अप्सरांचे मेळीं । क्रीडे तत्काळीं साधक ॥७॥
अनंत औषधी अनंत सिद्धी । त्यांची साधना कठिण त्रिशुद्धी ।
तपादि सिद्धींची विधी । ऐक सुबुद्धी उद्धवा ॥८॥
कृच्छ्र पराक चांद्रायण । आसार जलाशय धूम्रपान ।
तप करी जें जे भावून । ते ते सिद्धी जाण तो पावे ॥९॥
ऐक मंत्रसिद्धीचें लक्षण । प्रेतावरी बैसोनि आपण ।
एक रात्र केल्या अनुष्ठान । प्रेतदेवता संपूर्ण प्रसन्न होय ॥२१०॥
तेणें भूत भविष्य वर्तमान । ते सिद्धी प्राप्त होय जाण ।
करितां सूर्यमंत्रविधान । दूरदर्शनसिद्धी उपजे ॥११॥
जैसा मंत्र जैसी बुद्धी । तैसी त्यास प्रकटे सिद्धी ।
या सकळ सिद्धींची समृद्धी । योगधारणाविधीमाजीं असती ॥१२॥
नेहटूनियां आसना । ऐक्य करोनि प्राणापानां ।
जो धरी योगधारणा । सकळ सिद्धी जाणा ते ठायीं ॥१३॥
म्यां सांगीतली सिद्धींची कथा । झालिया प्राणापानसमता ।
आलिया योगधारणा हाता । तैं सिद्धी समस्ता प्रकटती ॥१४॥
प्राणापान समान न करितां । योगधारणाही न धरितां ।
मज एकातें हृदयीं धरितां । सिद्धी समस्ता दासी होती ॥१५॥
मज पावावया तत्त्वतां । मज एकातें स्मरतां ध्यातां ।
पावो देऊन सिद्धींचे माथां । चारी मुक्ति स्वभावतां दासी होती ॥१६॥
नाना सिद्धींची धारणा धरितां । माझी सलोकता समीपता ।
हाता न ये गा सरूपता । मग सायुज्यता ते कैंची ॥१७॥
माझे अतिशयें शुद्ध भक्त । ते मुक्तीसी दूर दवडित ।
माझेनि भावार्थें नित्यतृप्त । ते पूज्य होत मजलागीं ॥१८॥
जो सकळ सिद्धींचा ईश्वरू । तो मी लागें त्यांची पूजा करूं ।
तेथिला जो सिद्धींचा संभारू । घेऊनि निजवेव्हारू पळताती ॥१९॥
सकळ सिद्धींच्या स्वामित्वेंसीं । मी भगवंत तिष्ठें भक्तांपाशीं ।
तेंचि श्लोकार्थें हृषीकेशी । उद्धवासी सांगत ॥२२०॥