॥श्रीगणेशाय नमः ॥श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु वैकुंठनाथा । स्वानंदवैकुंठीं सदा वसता ।
तुझे ऐश्वर्य स्वभावतां । न कळे अनंता अव्यया ॥१॥
तुझ्या निजबोधाचा गरुड । कर जोडूनि उभा दृढ ।
ज्याच्या पाखांचा झडाड । उन्मळी सुदृढ भववृक्षा ॥२॥
तुझें स्वानुभवैकचक्र । लखलखित तेजाकार ।
द्वैतदळणीं सतेजधार । अतिदुर्धर महामारी ॥३॥
कैसा पांचजन्य अगाध । निःशब्दीं उठवी महाशब्द ।
वेदानुवादें गर्जे शुद्ध । तोचि प्रसिद्ध शंख तुझा ॥४॥
झळफळित सर्वदा । निजतेजें मिरवे सदा ।
करी मानाभिमानांचा चेंदा । ते तुझी गदा गंभीर ॥५॥
अतिमनोहर केवळ । देखतां उपजती सुखकल्लोळ ।
परमानंदें आमोद बहळ । तें लीलाकमळ झेलिसी ॥६॥
जीव शिव समसमानी । जय विजय नांवें देउनी ।
तेचि द्वारपाळ दोनी । आज्ञापूनी स्थापिले ॥७॥
तुझी निजशक्ति साजिरी । रमारूपें अतिसुंदरी ।
अखंड चरणसेवा करी । अत्यादरीं सादर ॥८॥
तुझे लोकींचे निवासी जाण । अवघे तुजचिसमान ।
तेथ नाहीं मानापमान । देहाभिमान असेना ॥९॥
तेथ काळाचा रिगमु नाहीं । कर्माचें न चले कांहीं ।
जन्ममरणाचें भय नाहीं । ऐशिया ठायीं तूं स्वामी ॥१०॥
जेथ कामक्रोधांचा घात । क्षुधेतृषेचा प्रांत ।
निजानंदें नित्यतृप्त । निजभक्त तुझेनि ॥११॥
तुझेनि कृपाकटाक्षें । अलक्ष न लक्षितां लक्षें ।
तुझे चरणसेवापक्षें । नित्य निरपेक्षें नांदविसी ॥१२॥
साम्यतेचें सिंहासन । ऐक्यतेची गादी जाण ।
त्यावरी तुझें सहजासन । परिपूर्ण स्वभावें ॥१३॥
तन्मयतेचें निजच्छत्र । संतोषाचें आतपत्र ।
ज्ञानविज्ञानयुग्म चामर । सहजें निरंतर ढळताती ॥१४॥
तेथ चारी वेद तुझे भाट । कीर्ति वर्णिती उद्भट ।
अठरा मागध अतिश्रेष्ठ । वर्णिती चोखट वंशावळी ॥१५॥
तेथ साही जणां वेवाद । नानाकुसरीं बोलती शब्द ।
युक्तिप्रयुक्तीं देती बाध । दाविती विनोद जाणीव ॥१६॥
एक भावार्थी तुजलागुनी । स्तुति करिती न बोलुनी ।
तेणें स्तवनें संतोषोनी । निजासनीं बैसविसी ॥१७॥
ऐसा सद्गुरु महाविष्णु । जो चिद्रूपें सम सहिष्णु ।
जो भ्राजमानें भ्राजिष्णु । जनीं जनार्दनु तो एक ॥१८॥
जनीं जनार्दनुचि एकला । तेथ एकपणें एका मीनला ।
तेणें एकपणाचाही ग्रास केला । ऐसा झाला महाबोध ॥१९॥
या महाबोधाचें बोधांजन । हातेंवीण लेववी जनार्दन ।
तेणें सर्वांगीं निघाले नयन । देखणेंपण सर्वत्र ॥२०॥
परी सर्वत्र देखतां जन । देखणेनि दिसे जनार्दन ।
ऐंशी पूर्ण कृपा करून । एकपण सांडविलें ॥२१॥
ऐसा तुष्टोनि भगवंत । माझेनि हातें श्रीभागवत ।
अर्थविलें जी यथार्थ । शेखीं प्राकृत देशभाषा ॥२२॥
श्रीभागवतीं संस्कृत । उपाय असतांही बहुत ।
काय नेणों आवडलें येथ । करवी प्राकृत प्रबोधें ॥२३॥
म्यां करणें कां न करणें । हेंही हिरूनि नेलें जनार्दनें ।
आतां ग्रंथार्थनिरूपणें । माझें बोलणें तो बोले ॥२४॥
तेणें बोलोनि निजगौरवा । वेदविभागसद्भावा ।
तो एकादशीं विसावा । उद्धवासी बरवा निरूपिला ॥२५॥
तेथ भक्त आणि सज्ञान । त्यासी पावली वेदार्थखूण ।
कर्मठीं देखतां दोषगुण । संशयीं जाण ते पडिले ॥२६॥
त्या संशयाचें निरसन । करावया श्रीकृष्ण ।
एकविसावा निरूपण । गुणदोषलक्षण स्वयें सांगे ॥२७॥
त्या गुणदोषांचा विभाग । सांगोनिया विषयत्याग ।
करावया श्रीरंग । निरूपण साङ्ग सांगत ॥२८॥