शक्त्याअशक्त्याअथवा बुद्ध्या समृद्ध्या च यदात्मने ।
अघं कुर्वन्ति हि यथा देशावस्थानुसारतः ॥११॥
झालिया चंद्रसूर्यग्रहण । शक्तें स्नान न करितां दूषण ।
बाळक वृद्ध आतुर जन । न करितां स्नान दोष नाहीं ॥२२॥
पुत्र जन्मलिया देख । स्वगोत्रज जे सकळिक ।
त्यांसी जाण आवश्यक । बाधी सूतक दहा दिवस ॥२३॥
तेंचि स्थळांतरीं पुत्रश्रवण । सूतकाअंतीं झाल्या जाण ।
त्या सूतकाचें बंधन । न बाधी जाण सर्वथा ॥२४॥
पूर्वदिनीं गोत्रज मरे । तें स्वगोत्रीं सूतक भरे ।
येरे दिवशीं दुसरा जैं मरे । तैं सूतकें सूतक उतरे दोहींचेंही ॥२५॥
जेणें घेतलें होय विख । त्यासी सर्पु लाविलिया देख ।
तेणें विखें उतरे विख । तेवीं सूतकें सूतक निवारे ॥२६॥
जें बुद्धीपूर्वक केलें आपण । तें अवश्य भोगावें पापपुण्य ।
जें बुद्धीसी नाही विद्यमान । तें अहेतुकपणें बाधिना ॥२७॥
आपुलें जें अंतःकरण । त्यासी पवित्र करी निजज्ञान ।
हे `बुद्धीची शुद्धि' जाण । विवेकसंपन्न वैराग्यें ॥२८॥
जो धनवंत अतिसंपन्न । त्यासी जुनें वस्त्र अपावन ।
शिविलें दंडिलें तेंही जाण । नव्हे पावन समर्था ॥२९॥
तेंचि दुर्बळाप्रति जाण । अतिशयें परम पावन ।
हे वेदवाद अतिगहन । स्मृतिकारीं जाण प्रकाशिले ॥१३०॥
समर्थासी असाक्षी भोजन । तें जाणावें अशुद्धान्न ।
दुर्बळासी एकल्या अशन । परम पावन श्रुत्यर्थें ॥३१॥
स्वयें न करितां पंचयज्ञ । भोजन तें पापभक्षण ।
सकळ सुकृतासी नागवण । जैं पराङ्मुखपण अतिथीसी ॥३२॥
स्वग्रामीं सर्वही स्वाचार । ग्रामांतरीं अर्थ आचार ।
पुरीं पट्टणीं पादमात्र । मार्गीं कर्मादर संगानुसारें ॥३३॥
विचारोनि देशावस्था । हे धर्ममर्यादा तत्त्वतां ।
याहूनि अन्यथा करितां । दोष सर्वथा कर्त्यासी ॥३४॥
पाटव्य असतां स्वदेहासी । कर्म न करी तो महादोषी ।
रोगें व्यापिल्या शरीरासी । कर्मकर्त्यासी अतिदोष ॥३५॥
पूर्वीं द्रव्याद्रव्यशुद्धी । सांगितली यथाविधी ।
तेचि मागुतेनि प्रतिपादी । धर्मशास्त्रसिद्धी वेदोक्त ॥३६॥