शुद्ध्यशुद्धी विधीयेते समानेष्वपि वस्तुषु ।
द्रव्यस्य विचिकित्सार्थं गुणदोषौ शुंभाशुभौ ॥३॥
पंचभूतें समान जाण । वस्तु सर्वत्र समसमान ।
तेथ गुणदोष अप्रमाण । परी केलें प्रमाण या हेतू ॥४६॥
न प्रेरितां श्रुतिस्मृती । आविद्यक विषयप्रवृत्ती ।
अनिवार सकळ भूतीं । सहजस्थितिस्वभावें ॥४७॥
ऐसी स्वाभाविक विषयस्थिती । तिची करावया उपरती ।
नाना गुणदोष बोले श्रुती । विषयनिवृत्तीलागुनी ॥४८॥
हें एक शुद्ध एक अशुद्ध । पैल शुभ हें विरुद्ध ।
मीचि बोलिलों वेदानुवाद । विषयबाध छेदावया ॥४९॥
विषयांची जे निवृत्ती । तिची वेदरुपें म्यां केली स्तुति ।
निंदिली विषयप्रवृत्ती । चिळसी चित्तीं उपजावया ॥५०॥
चालतां कर्मप्रवृत्ती । हो विषयांची निवृत्ती ।
ऐशी वेदद्वारें केली युक्ती । ऐक तुजप्रती सांगेन ॥५१॥