यतो यतो निवर्तेत विमुच्येत ततस्ततः ।
एष धर्मो नृणां क्षेमः शोकमोहभयापहः ॥१८॥
माझिया वेदाचें मनोगत । विषयीं व्हावें निवृत्त ।
यालागीं गुणदोष दावित । विषयत्यागार्थ उपावो ॥२००॥checked
एकाएकीं सकळ विषयांसी । त्याग न करवे प्राण्यासी ।
यालागीं निषेधें निंदूनि त्यांसी । शनैःशनैः विषयांसी त्यागावी ॥१॥
जों जों विषयांची निवृत्ती । तों तों निजसुखाची प्राप्ती ।
पूर्ण बाणल्या विरक्ती । साधक होती मद्रूप ॥२॥
मद्रूपतेचिये प्राप्तीं । अडवी असे विषयासक्ती ।
ते झालिया विषयनिवृत्ती । साधक होती मद्रूप ॥३॥
जेथ माझिया स्वरूपाची प्राप्ती । तेथ निःशेष निमे अहंकृती ।
तेव्हा शोकमोहाची होय शांती । जाय निश्चितीं अविद्या ॥४॥
अविद्यानाशासवें जाण । नाशती जन्मभाव दारुण ।
तेव्हां मरणासीच ये मरण । हारपे जीवपण जीवाचें ॥५॥
अविद्या निमाल्या जीवेंसीं । ठावो नाहीं भवभयासी ।
जेवीं सबळबळें अंधारेंसीं । नुरेचि निशी दिनोदयीं ॥६॥
जेवीं कां मृगजळाचा पूर । न साहे दृष्टीचा निर्धार ।
तेवीं भवभयेंसीं संसार । झाला साचार वाउगा ॥७॥
प्राणी पावावया कल्याण । हे वेदोक्त स्वधर्माचरण ।
विषयत्यागालागीं जाण । केलें निरूपण गुणदोषां ॥८॥
जे साच वेदार्थातें नेणती । ते वेदा प्रवृत्तिपर म्हणती ।
परी वेदें द्योतिली विरक्ती । विषयासक्तिच्छेदक ॥९॥
वेदोक्त स्वधर्मस्तिथीं । होय विषयांची विरक्ती ।
प्राणी निजमोक्ष पावती । हे वेदोक्ती पैं माझी ॥२१०॥
हे सांडोनियां वेदस्थिती । केवळ विषयांची आसक्ति ।
प्राणी अतिदुःख पावती । ऐक तुजप्रती सांगेन ॥११॥
प्रवृत्ति तितुकी अनर्थहेतु । येचि अर्थींचा वृत्तांतु ।
चौं श्लोकीं श्रीभगवंतु । असे सांगतु उद्धवा ॥१२॥