समानकर्माचरणं पतितानां न पातकम् ।
औत्पत्तिको गुणः सङ्गो न शयानः पतत्यधः ॥१७॥
स्वकर्में पतित जाहले जाण । डोंब भिल्ल कैवर्तक जन ।
त्यांसी मद्यपानादिदोषीं जाण । नाहीं पतन पतितांसी ॥८५॥
जें नीळीमाजीं काळें केलें । त्यासी काय बाधावें काजळें ।
कां अंधारासी मसीं मखिलें । तेणें काय मळलें तयाचें ॥८६॥
जो स्वभावें जन्मला चांडाळ । त्यासी कोणाचा बाधी विटाळ ।
हो कां काळें करवें काजळ । ऐसें नाहीं बळ कीटासी ॥८७॥
निर्जीवा दीधलें विख । तेणें कोणासी द्यावें दुःख ।
तेवीं पतितासी पातक । नव्हे बाधक सर्वथा ॥८८॥
जो केवळ खालें निजेला । त्यासी पडण्याचा भेवो गेला ।
तेवीं देहाभिमाना जो आला । तो नीचाचा झाला अतिनीच ॥८९॥
रजतमादि गुणसंगीं । जो लोलंगत विषयांलागीं ।
त्यासी तिळगुळादि कामभोगीं । नव्हे नवी आंगीं देहबुद्धी ॥१९०॥
जो कनकबीजें भुलला । तो गाये नाचे हरिखेला ।
परी संचितार्थ चोरीं नेला । हा नेणेचि आपुला निजस्वार्थ ॥९१॥
तेवीं देहाभिमानें उन्मत्त । अतिकामें कामासक्त ।
तो नेणे बुडाला निजस्वार्थ । आपुला अपघात देखेना ॥९२॥
ज्यासी चढला विखाचा बासटा । त्यासी पाजावी सूकरविष्ठा ।
तेवीं अतिकामी पापिष्ठा । म्यां स्वदारानिष्ठा नेमिली ॥९३॥
ज्यासी विख चढलें गहन । त्यासी सूकरविष्ठेचें पान ।
हें ते काळींचें विधान । स्वयें सज्ञान बोलती ॥९४॥
तेवीं जेथवरी स्त्रीपुरुषव्यक्ती । तेथवरी स्वेच्छा कामासक्ती ।
त्याची करावया निवृत्ति । स्वदारास्थिति नेमिली वेदें ॥९५॥
वेदें निरोप दिधला आपण । तैं दिवारातीं दारागमन ।
हेंही वेदें नेमिलें जाण । स्वदारागमन ऋतुकाळीं ॥९६॥
तेथ जन्मलिया पुत्रासी । `आत्मा वै पुत्रनामाऽसी' ।
येणें वेदवचनें पुरुषासी । स्त्रीकामासी निवर्तवी ॥९७॥
निःशेष विष उतरल्यावरी । तो सूकरविष्ठा हातीं न धरीं ।
तेवीं विरक्ति उपजल्या अंतरीं । स्वदारा दूरी त्यागिती ॥९८॥
यापरी विषयनिवृत्ती । माझ्या वेदाची वेदोक्ती ।
दावूनि गुणदोषांची उक्ती । विषयासक्ती सांडावी ॥९९॥