मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय बाविसावा|
आरंभ

एकनाथी भागवत - आरंभ

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्गुरु खांबसूत्री । चौर्‍यायशीं लक्ष पुतळ्या यंत्रीं ।

नाचविशी निजतंत्रीं । प्राचीनदोरीस्वभावें ॥१॥

दोरी धरिली दिसों न देशी । परी पुतळ्या स्वयें नाचविशी ।

नवल लाघवी कैसा होशी । अलिप्ततेंसीं सर्वदा ॥२॥

तेथ जैशी ज्याची पूर्वगती । तें भूत नाचे तैशा रीतीं ।

ते नाचविती चेतनाशक्ती । तुझ्या हातीं वीणहस्तें ॥३॥

जेवीं कां अचेतन लोहातें । चुंबक खेळवी निजसामर्थ्यें ।

तेवीं तूं सकळ भूतांतें । निजसत्तें नाचविशी ॥४॥

ऐशीं सदा नाचतीं परतंत्र । तरी अभिमानाचें बळ थोर ।

सत्य मानोनि देहाकार । आम्ही स्वतंत्र म्हणविती ॥५॥

आम्ही सज्ञान अतिज्ञाते । आम्ही कर्मकुशल कर्मकर्ते ।

इतर मूर्खें समस्तें । ऐशा अभिमानातें वाढविती ॥६॥

एवं देहाभिमानाचेनि हातें । विसरोनि आपुल्या अकर्तृत्वातें ।

स्वयें पावले कर्मबंधातें । जेवीं स्वप्नावस्थे विषबाधा ॥७॥

स्वप्नीं अतिशय चढलें विख । आतां उतरलें निःशेख ।

तेवीं बंधमोक्ष देख । सत्यत्वें मूर्ख मानिती ॥८॥

हे तुझे खांबसूत्रींची कळा । मिथ्या सत्यत्वें दाविशी डोळां ।

हा अतिशयें अगाध सोहळा । तुझी अतर्क्य लीळा तर्केना ॥९॥

अचेतनीं चेतनधर्म । प्रत्यक्ष दाविशी तूं सुगम ।

हेंचि तुझें न कळे वर्म । करोनि कर्म अकर्ता ॥१०॥

अकर्ताचि तूं होशी कर्ता । कर्ता होत्साता अकर्ता ।

हे तुझी खांबसूत्रता । न कळे सर्वथा कोणातें ॥११॥

तुझी माया पाहों जातां । तोचि मायेनें ग्रासिला तत्त्वतां ।

असो तुजचि पाहों म्हणतां । तेही सत्त्वावस्था मायेची ॥१२॥

ऐसें तुझें खांबसूत्र । अकळ न कळे गा तुझें चरित्र ।

देखों नेदितां निजसूत्र । भूतें विचित्र नाचविशी ॥१३॥

तुझेनि जग होय जाये । परी म्यां केलें हें ठावें नोहे ।

ऐसा तुझा खेळ पाहें । कोणें काये लक्षावा ॥१४॥

यापरी खेळ वाढविशी । सवेंचि विकल्पोनि मोडिशी ।

विकार महत्तत्त्वीं सांठविशी । हेंही कर्तृत्व अंगासी न लगत गेलें ॥१५॥

याचें मुख्यत्वें मूळ लक्षण । तुझे कृपेवीण न कळे जाण ।

तुझी कृपा झालिया पूर्ण । जनीं जनार्दन प्रकटे पैं ॥१६॥

जनीं प्रगटल्या जनार्दन । तद्रुप होइजे आपण ।

हे मूळींची निजखूण । तेथ मीतूंपण रिगेना ॥१७॥

मीतूंपणेंवीण प्रसिद्ध । जनीं जनार्दन निजानंद ।

त्याचे कृपेस्तव विशद । श्रीभागवत शुद्ध वाखाणिलें ॥१८॥

तेथ एकविसाव्याचे अंतीं । वेद विक्रांड लक्ष्यार्थस्थिती ।

ब्रह्म एकचि निश्चितीं । अद्वयस्थिती अविनाशी ॥१९॥

हें वेदार्थसारनिरुपण । ऐकतां उद्धवा बाणली खूण ।

ब्रह्म एकाकी परिपूर्ण । दुजेनवीण संचलें ॥२०॥

वेदवाद्यें ब्रह्म एक । स्वानुभवें तैसेंचि देख ।

तरी ज्ञाते ऋषिजन लोक । केवीं तत्त्वें अनेक बोलती ॥२१॥

येचि आशंकेलागीं जाण । उद्धवें स्वयें मांडिला प्रश्न ।

परी पोटांतील भिन्न खूण । उगा श्रीकृष्णा न रहावा ॥२२॥

मी झालों जी ब्रह्मसंपन्न । हें ऐकतां माझें वचन ।

निजधामा निघेल श्रीकृष्ण । मग हें दर्शन मज कैंचें ॥२३॥

ऐशिया काकुळतीं जाण । संशयेवीण करी प्रश्न ।

ते आयकोनि श्रीकृष्ण । सुखसमाधान भोगित ॥२४॥

तंव कृष्णाचे मनीं आणिक । उद्धव मी दोघे एक ।

मिथ्या वियोगाचें दुःख । हें कळे तंव देख प्रश्न सांगों ॥२५॥

बाविसावे अध्यायीं देख । तत्त्वसंख्या सांगेल आवश्यक ।

प्रकृतिपुरुषविवेक । जन्ममरणद्योतक प्रकारु ॥२६॥

आत्मा एक कीं अनेक । आणि तत्त्वसंख्याविवेक ।

हें कळावया निष्टंक । उद्धव देख पूसत ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP