मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय बाविसावा|
श्लोक २६ वा

एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


उद्धव उवाच -

प्रकृतिः पुरुषश्चोभौ यद्यप्यात्माविलक्षणौ ।

अन्योन्यापाश्रयात्कृष्ण दृश्यते न भिदा तयोः ।

प्रकृतौ लक्ष्यते ह्यात्मा प्रकृतिश्च तथात्मनि ॥२६॥

प्रकृति पुरुष भिन्नभिन्न । येचि अर्थीं उद्धवें जाण ।

साडेतीन श्र्लोकीं अगाध प्रश्न । देवासी आपण पुसत ॥३१॥

प्रकृतीहूनि पुरुष भिन्न । हें ऐकोनि देवाचें वचन ।

प्रकृतिपुरुषांवेगळा श्रीकृष्ण । हा द्रष्टा संपूर्ण दोहींचा ॥३२॥

म्हणे ऐक श्रीकृष्णा श्रेष्ठा । हे प्रकृतिपुरुषांची चेष्टा ।

तूं वेगळेपणें देखणा द्रष्टा । सुरवरिष्ठा श्रीपती ।३३॥

प्रकृति पुरुष दोनी भिन्न । एक जड एक चेतन ।

हें मजही कळतसे जाण । परी वेगळेपण लक्षेना ॥३४॥

जैसा तप्तलोहाचा गोळ । दिसे अग्नीचि केवळ ।

तेवीं प्रकृतिपुरुषांचा मेळ । दिसे सबळ एकत्वें ॥३५॥

जेवीं बीज धरोनियां पोटेंसीं । निकणू कोंडा वाढे कणेंसीं ।

तेवीं प्रकृति जाण पुरुषेंसीं । अभिन्नतेसीं जडलीसे ॥३६॥

कां नारळ चोख धरोनि पोटीं । निरस कठिण वाढे नरोटी ।

तेवीं पुरुषयोगें प्रकृति लाठी । झाली सृष्टी अनिवार ॥३७॥

कणावेगळा कोंडा न वाढे । तेवीं पुरुषावेगळी प्रकृति नातुडे ।

हें प्रकृतिपुरुषांचें बिरडें । तुजवेगळें निवाडें निवडेना ॥३८॥

जेवीं कां शिंपीचे अंगीं । जडली रुपेपणाची झगी ।

तेवीं पुरुषाच्या संयोगीं । प्रकृति जगीं भासत ॥३९॥

तीक्ष्ण रविकरसंबंधीं । भासे मृगजळाची महानदी ।

तेवीं पुरुषाच्या संबंधीं । प्रकृति त्रिशुद्धी आभासे ॥२४०॥

जेवीं कां नभीं नीलिमा । वेगळी न दिसे सांडूनि व्योमा ।

तेवीं प्रकृति-पुरुषोत्तमां । वेगळीक आम्हां दिसेना ॥४१॥

मुख्य देहाचें जें देहपण । तेंचि प्रकृतीचें बाधकत्व जाण ।

या देहाहोनियां भिन्न । पुरुषाचें भान दिसेना ॥४२॥

अहंप्रत्ययें आत्मा म्हणती । तेही देहाकारें स्फुरे स्फूर्ती ।

देहावेगळी आत्मप्रतीती । न दिसे निश्चितीं गोविंदा ॥४३॥

डोळा सांडूनि दृष्टि उरे । वातीवेगळा दीप थारे ।

तैं देहावेगळा आत्मा स्फुरे । साचोकारें गोविंदा ॥४४॥

जिव्हेवीण रसस्वादू । श्रोत्रेंवीण ऐकवे शब्दू ।

तैं देहावेगळा आत्मबोधू । होय विशदू गोविंदा ॥४५॥

कांटेवीण फणस आतुडे । कां सोपटेंवीण ऊंस वाढे ।

तैं देहावेगळा आत्मा जोडे । वाडेंकोडें गोविंदा ॥४६॥

तुम्हींच सांगीतली निजात्मखूण । नरदेह ब्रह्मप्राप्तीचें कारण ।

शेखीं देहावेगळें आत्मदर्शन । केवीं आपण प्रतिपादां ॥४७॥

आणि आत्मावेगळी प्रकृती । सर्व प्रकारें न ये व्यक्ती ।

रुपावेगळी छाया केउती । कैशा रीतीं आभासे ॥४८॥

गोडीवेगळी साकर होये । परिमळावेगळा कापूर राहे ।

तैं आत्म्यावेगळी पाहें । प्रकृति लाहे अभिव्यक्ती ॥४९॥

गगनावेगळा घट राहे । तंतूवेगळा पट होये ।

तैं आत्म्यावेगळी पाहें । प्रकृति लाहे अभिव्यक्ती ॥२५०॥

गोडीवेगळा वाढें ऊंस । कणेंवीण जैं वाढे भूस ।

तैं आत्म्यावेगळी रुपस । माया सावकाश व्यक्तीसी ये ॥५१॥

प्रकृतिलक्षणीं आत्मा लक्षिजे । आत्मेनि प्रकृतीसी प्रकाशिजे ।

अनादि दोनी इये योग जे । वेगळा लाहिजे बोध केवीं ॥५२॥

प्रकृतीहुनि आत्मा भिन्न । सर्वथा आम्हां न दिसे जाण ।

येचि अर्थींची विनवण । उद्धव आपण करीतसे ॥५३॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP