सप्तैव धातव इति, तत्रार्थाः पञ्च खादयः ।
ज्ञानमात्मोभयाधारस्ततो देहेन्द्रियासवः ॥१९॥
पंचवीस सव्वीस तत्त्वगणन । मागां सांगितलें निरुपण ।
आतां साता तत्त्वांचें लक्षण । ऐक सुलक्षण सांगेन ॥९१॥
महाभूतें जीव शिव । हा सातां तत्त्वांचा जाण भाव ।
प्राणेंद्रियसमुदाव । याचिपासाव पैं होत ॥९२॥
महाभूतें अचेतन । यांसी चेतविता जीव जाण ।
त्याचाही द्रष्टा परिपूर्ण । ईश्वर जाण सातवा ॥९३॥
माया महत्तत्त्व अहं जें येथ । हें सूक्ष्मकारणें निश्चित ।
यांपासोनि स्थूळ भूतें होत । कारणें कार्यांत सबाह्य ॥९४॥
मनइंद्रियादि जें कां येथें । तेंही यांत अंतर्भूतें ।
एवं जाण येणें मतें । पांच महाभूतें नेमिलीं ॥९५॥
यांसी चेतविता जीव । सर्वनियंता सदाशिव ।
एवं सप्ततत्त्वसमुदाव । तो हा उगव उद्धवा ॥९६॥;
आतां सहा तत्त्वें ये पक्षीं जाण । तुज मी सांगेन निरुपण ।
जें बोलिले ऋषिजन । तें विवंचन अवधारीं ॥९७॥