व्यर्थोऽपि नैवोपरमेत पुंसां मत्तः परावृत्तधियां स्वलोकात् ॥३३॥
मूळीं समूळ मिथ्या अज्ञान । अज्ञानजन्य विषयभान ।
तें देखोनि भुलले जन । पडिलें विस्मरण स्वस्वरुपीं ॥९८॥
मी परमात्मा हृदयस्थ सन्निधी । त्या मजपासोनि उपरमे बुद्धी ।
मग विषयासक्ति त्रिशुद्धी । आवडे उपाधि देह गेह दारा ॥९९॥
जें स्वस्वरुपाचें विस्मरण । तें वाढवी तीव्र विषयध्यान ।
तेणें जीवासी जन्ममरण । अनिवार जाण देहाभिमानें ॥४००॥
तो नासावया देहाभिमान । वैराग्ययुक्त ज्ञानध्यान ।
मीचि बोलिलों साधन । समूळ अज्ञानच्छेदक ॥१॥
जंववरी अंगीं देहाभिमान । तंव अवश्य पाहिजे साधन ।
निःशेष निरसल्या अज्ञान । वृथा साधन मीही मानीं ॥२॥
म्हणशी तें कोण पां अज्ञान । जें शुद्धासी लावी जीवपण ।
त्या जीवाअंगीं जन्ममरण । अनिवार जाण वाढवी ॥३॥
स्वस्वरुप विसरोनि जाण । देहीं स्फुरे जें मीपण ।
अत्यंत दृढतर अज्ञान । तो देहाभिमान उद्धवा ॥४॥
गौण नांव त्याचें अज्ञान । येर्हवीं मुख्यत्वें देहाभिमान ।
हें ऐकोनि देवाचें वचन । दचकलें मन उद्धवाचें ॥५॥
तेचि अर्थींचा प्रश्न । देवासी पुसे आपण ।
कोण्या युक्तीं देहाभिमान । जन्ममरण भोगवी ॥६॥;