एकनाथी भागवत - श्लोक १० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यदा भजति मां भक्त्या निरपेक्षः स्वकर्मभिः ।

तं सत्त्वप्रकृतिं विद्यात्पुरुषं स्त्रियमेव वा ॥१०॥

स्वकर्मी वांछित फळ । तेंचि मायेचें दृढ पडळ ।

ते फळाशा सांडोनि केवळ । जे भजनशीळ मद्रूपीं ॥६१॥

करुनि फळाशेचें शून्य । स्वधर्में करिती माझें भजन ।

पुरुष अथवा स्त्रिया जाण । ते सत्वसंपन्न निश्चित ॥६३॥

देहावयवलिंगदर्शन । तेणें स्त्रीपुरुषनामाभिधान ।

परी आत्मा आत्मीं नाहीं जाण । जीवत्म समान स्त्रीपुरुषीं ॥६४॥

चित्तवृत्तिक्रियाचरण । त्या नांव गा कर्म जाण ।

तेथ निरपेक्ष तें माझें भजन । स्वधर्म संपूर्ण या नांव ॥६५॥

ऐशिया स्वधर्मवृत्ती । जेथ प्रगटे माझी भक्ती ।

ते ते सात्विक प्रकृती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६६॥

आशंका ॥ कर्म करितां फळाश वाढे ॥ तो फळभोग भोगणें पडे ।

स्वकर्में भक्ति केवीं घडे । कर्म तें कुडें अत्यंत ॥६७॥

कर्म करितां फळ बाधक । न करितां प्रत्यवाय नरक ।

कर्में कर्मबद्ध लोक । केले देख संसारीं ॥६८॥

जीव होता जो स्वतंत्र । तो कर्में केला परतंत्र ।

एवढें कर्माचें चरित्र । अतिविचित्र बाधक ॥६९॥

स्वकर्में भगवद्भक्ती । म्हणशी घडे कैशा रीतीं ।

तेचि अर्थीची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥१७०॥

सर्प धांवोनि धरिल्या तोंडीं । तो सर्वांगीं घाली आढी ।

तेणें धाकें जो सोडी । तरी तो विभांडी महाविखें ॥७१॥

ते सर्पबाधेची सांकडी । निवारी मंत्रवादी गारुडी ।

तेवीं कर्मी कर्मबाधा गाढी । निवारी रोकडी गुरुरावो ॥७२॥

रिघतां सद्गुरुसी शरण । कर्म करवी ब्रह्मार्पण ।

हेंचि निरपेक्षलक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥७३॥

ब्रह्म कर्माचें प्रकाशक । कर्म तितुकें ब्रह्मात्मक ।

हेंचि मर्दपण चोख । माझें भजन देख या रीतीं ॥७४॥

सर्वेंद्रियीं ज्ञानस्फूर्ती । ते ब्रह्मींची ब्रह्मशक्ती ।

ऐसेनि निश्चयें कर्मस्थिती । स्वकर्मभक्ति या नांव ॥७५॥

ऐसेनि स्वकर्में स्वाभाविक । जे मज भजती भाविक ।

ते ते शुद्ध सात्विक लोक । जाण निष्टंक उद्धवा ॥७६॥

स्वधर्म सर्वथा निष्फळ । म्हणती ते मूर्ख केवळ ।

स्वधर्म निरसी चित्तमळ । कर्म समूळ निर्दळी ॥७७॥

एवढी स्वधर्माची जोडी । सांडूनि वांछिती विषयगोडी ।

तें तें राजसें बापुडीं । केवळ वेडीं विषयार्थी ॥७८॥

विषयफळ वांछितां देख । देह धरणें आवश्यक ।

देहसंभव दुःखदायक । स्वर्गनरकफळ भोगी ॥७९॥

यापरी जनीं दुःखदाती । राजसतामसप्रकृती ।

ऐक त्या दोनी गुणवृत्ती । विशद तुजप्रती सांगेन ॥१८०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP